Soybean Rate : सोयाबीन तेजीतच राहण्याचा अंदाज

देशातील सोयाबीन हंगाम सुरू होऊन आता जवळपास दीड महिना होत आला. तसं पाहिले तर यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादकांसाठी आव्हानात्मकच ठरला.
Soybean Rate
Soybean RateAgrowon
Published on
Updated on

देशातील सोयाबीन हंगाम (Soybean Season) सुरू होऊन आता जवळपास दीड महिना होत आला. तसं पाहिले तर यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादकांसाठी (Soybean Production) आव्हानात्मकच ठरला. जून महिन्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) राज्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. बहुतेक ठिकाणी पेरण्या जुलै महिन्यात झाल्या. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात काही दिवस सलग पाऊस झाला. पीक ऐन फुलोऱ्यात असल्याने तेव्हापासून पिकाला फटका (Soybean Crop Damage) बसला.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काही दिवस पाण्याखाली होते. मात्र यंदा पेरण्या उशिरा झाल्याचा काहीसा फायदाही झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारण ऑक्टोबर महिन्यात सलग २० दिवस पाऊस झाला. नेमके याच काळात वेळेवर पेरणी केलेले सोयाबीन काढणीला आले होते. या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सतत पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब आले. शेंगा सडल्या. दाणे काळे पडले होते. पण उशिरा पेरणी झालेल्या पिकाच्या काढणी आता सुरू आहे. त्यामुळे उशिराचे सोयाबीन पावसाच्या तडाख्यातून वाचलं. याचा मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळतो आहे.

Soybean Rate
Soybean Rate : लातूरला सोयाबीनची आवक आणि दरही चढेच

बाजाराची नजर कुठे?

जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनात ब्राझीलने २०१९-२० मध्ये अमेरिकेला मागे टाकले. आजपर्यंत अमेरिकेला सोयाबीन उत्पादनात भरारी घेऊन प्रथम क्रमांक परत मिळवता आला नाही. अमेरिकेचा सोयाबीन हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान सुरू होतो. भारतातही याच काळात सोयाबीन पीक बाजारात यायला सुरुवात होते. यंदा अमेरिकेत गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तर भारतातही सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर पुन्हा वाढत आहेत. रशियाने युक्रेनमधून होणारी शेतीमाल वाहतूक पुन्हा बंद केली. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेलाचा पुरवठा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. त्यामुळे खाद्यतेल आणि तेलबियांच्या दरात वाढ झाली. अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन घटले, त्यामुळे बाजाराला आधार मिळाला. मात्र बाजाराची खरी नजर ही लागवडी सुरु असलेल्या ब्राझील आणि अर्जेंटीनाकडे आहे.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीन बाजाराची नजर ब्राझीलकडे का?

यंदा या दोन्ही देशांमधील सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. ब्राझीलमध्ये यंदा विक्री १ हजार ५२० लाख टनांवर सोयाबीन उत्पादन पोचेल, असा युएसडीएचा अंदाज आहे. मात्र बाजारातील अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही. ब्राझीलमध्ये यंदा पेरा वाढत असला तरी ला निनो च्या स्थितीमुळे पुढील काळात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. हीच परिस्थिती अर्जेंटिनातही उद्भवणार आहे. एकूणच काय तर सध्या ब्राझील आणि अर्जेंटिनात विक्रमी उत्पादनाचे अंदाज असले, तरी अंतिम उत्पादन कमी राहण्याचाच अंदाज बहुतेक अभ्यासक व्यक्त करत आहेत.

जागतिक उत्पादनाचा अंदाज

यूएसडीएने जगातील सोयाबीन उत्पादन वाढीचाही अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षी जगात ३५२ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. ते यंदा ३९० दशलक्ष टनांवर पोचेल, असे यूएसडीएने म्हटले आहे. म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढेल. मागील हंगामात जागतिक खाद्यतेल बाजार तेजीत आली होती. याचा फायदा सोयाबीनलाही मिळाला. परिणामी, दर तेजीत आले.

Soybean Rate
China Soybean : चीनची सोयाबीन आयात यंदा वाढणार

ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना या देशातील शेतकऱ्यांना मागील वर्षभरात चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. तसेच जागतिक सोयाबीन गाळपही यंदा अधिक राहण्याची शक्यता आहे. यंदा अमेरिका आणि भारतातही सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अमेरिकेतील सोयाबीन पिकाला पाऊस आणि दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहीले. मागील हंगामात जगात ३१३.७ दशलक्ष टन सोयाबीनचे गाळप झाले होते. मात्र यंदा ते ३२७ दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

भारतातील उत्पादनाचा अंदाज

भारताचा विचार करता मागील पाच वर्षांत सोयाबीन उत्पादनात चढ-उतार पाहायला मिळाले. यंदा देशातील सोयाबीन उत्पादन ११५ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला. मागील हंगामात देशातील उत्पादन ११९ लाख टनांवर पोहोचले होते. तर २०२०-२१ मधील उत्पादन १०४ लाख टनांपर्यंत झाले होते. देशातील सोयाबीन गाळप मात्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात ९७ लाख टन सोयाबीन गाळप झाले होते. ते यंदा १०० दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

Soybean Rate
Soybean Production : जगाचं सोयाबीन उत्पादन खरंच वाढणार का?

भारतीय शेतकऱ्यांना संधी

सोयाबीन ही जागतिक कमोडिटी आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील घडामोडींचा देशातील सोयाबीन बाजारावर परिणाम होत असतो. परिणामी देशातील दर हे जागतिक बाजारातील दरावर अवलंबून असतात. सध्या आधी चर्चा केलेल्या घटकांमुळे जागतिक बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडेचे दर वाढलेले आहेत. ते टिकून राहील, असाही अंदाज व्यक्त होत आहे. तर देशातही सध्या सोयाबीनचे दर वाढलेले आहेत.

अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा कमाल दर ६ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. पण कमाल दर हा मोजक्याच म्हणजेच नगण्य मालाला मिळत असतो. जास्तीत जास्त माल हा सरासरी दराने विकला जातो. सध्या सोयाबीनचा सरासरी दर हा ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काळात सोयाबीनचे दर वाढूही शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांना लेगच सोयाबीन विकण्याची घाई आहे, त्यांनी काही माल सध्या भावात विकण्यास हरकत नाही. मात्र एकाच भावात सर्व माल विकण्यापेक्षा मालाचे टप्पे पाडून विक्री केल्यास फायदेशीर ठरेल.

देशातील उत्पादन

आणि गाळपाचा अंदाज (लाख टन)

वर्ष उत्पादन गाळप

२०१८-१९ १०९ ९६

२०१९-२० ९३ ८४

२०२०-२१ १०४ ९५

२०२१-२२ ११९ ९७

२०२२-२३ ११५ १००

आशादायक स्थिती का?

जागतिक खाद्यतेल बाजाराचा विचार करता पाम तेलाचा वापर सर्वाधिक होतो. मागील हंगामात जगात जवळपास २ हजार १०० लाख टन खाद्यतेलाचा वापर झाला. त्यापैकी ७३९ लाख टन पाम तेल होते. तर सोयाबीन तेलाचा वाटा ६०२ लाख टनांचा होता. त्यानंतर मोहरी तेलाचा क्रमांक लागतो. मागील हंगामात जगात २८८ लाख टन मोहरी तेलाचा वापर झाला. तर सूर्यफूल तेलाचा वापर २०५ लाख टनांवर होता.

 जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पाम तेलाचे मुख्य उत्पादक इंडोनेशिया आणि मलेशिया आहेत. मात्र यंदा या दोन्ही देशांतील पाम तेल निर्मितीला पाऊस आणि पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पाम तेलाचे दरही वाढले आहेत.

 दुसरीकडे सूर्यफूल तेल उत्पादनात रशिया आणि युक्रेनचा वाटा निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यातही युक्रेनमध्ये जवळपास ३० टक्के सूर्यफूल तेल उत्पादन होते. मात्र रशियाने आक्रमण केल्यानंतर येथील सूर्यफूल तेल उत्पादन घटले. तसेच निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे जागतिक बाजारात यंदाही सूर्यफूल तेलाची उपलब्धता कमीच असेल. त्यामुळे सहाजिकच पामतेल आणि सोयाबीन तेलाला मागणी वाढेल.

 ब्राझीलने २०२२ पासून १० टक्के बायोडिझेल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार पावले टाकणार असल्याचे वृत्त अलीकडेच आले होते. ब्राझीलने १० मिश्रणाचे धोरण राबविल्यास यात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. असे झाल्यास जागतिक बाजारातील सोयाबीन वापर वाढेल. या सर्व परिस्थितीमुळे यंदा सोयाबीनला चांगली मागणी राहू शकते. तसेच सोयाबीन तेलाचा वापरही वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अमेरिकेतील उत्पादन आणि निर्यात

अमेरिकेतील सोयाबीन काढणी आता अंतिम टप्प्यात आहे. यूएसडीएने ऑक्टोबरच्या अंदाजाच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात काहीशी वाढ झाल्याचे म्हटले आहे. पण उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी कमी राहील असं म्हटले आहे. यूएसडीएने चालू महिन्यातील आपल्या अहवालात अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन १ हजार १८२ लाख टनांवर पोहोचेल असे म्हटले आहे. तर व्यापारी संस्थांचा अंदाज १ हजार १७६ लाख टनांचा होता. ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणी सुरू असताना ‘यूएसडीए‘ने अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन यंदा १ हजार १७३ लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज जाहीर केला होता. मात्र आता काढणी पूर्ण होत आल्याने उत्पादकतेची स्थिती पुढे आली आहे. ‘यूएसडीए‘च्या मते यंदा अमेरिकेत ८६६ लाख एकरावरील सोयाबीनची काढणी झाली.

यात १३.६६ क्विंटल उतारा मिळाला. म्हणजेच यूएसडीएच्या मते यंदा सोयाबीनचा उतारा वाढला. मात्र अमेरिकेतील जाणकारांनी ‘यूएसडीए‘च्या या दाव्यावर आश्‍चर्य व्यक्त केले. व्यापारी जगताला अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाबाबतचा मागील अंदाज राहील, असं वाटत होतं. पण उत्पादकतेतील वाढ आश्‍चर्यकारक आहे. पण यंदाही अमेरिकेतील सोयाबीन पुरवठा जास्त राहणार नाही. पण आता जागतिक सोयाबीन बाजाराच्या नजरा ब्राझील आणि अर्जेंटिनातील उत्पादनाकडे असतील. या दोन्ही देशांमध्ये आता पेरण्या जवळपास संपल्या आहेत, असंही येथील अभ्यासकांनी म्हटले आहे.

उत्पादन आणि निर्यात (लाख टन)

वर्ष उत्पादन निर्यात

२०१८-१९ १२०५ ४७६

२०१९-२० ९६६ ४५६

२०२०-२१ ११४७ ६१६

२०२१-२२ १२१५ ५८७

२०२२-२३ ११८२ ५५६

ब्राझीलमधील उत्पादन आणि निर्यात

ब्राझील जागतिक सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे. यंदा ब्राझीलमध्ये कमी पाऊस असूनही येथील कोनाब आणि यूएसडीएने गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्पादन राहील, असा अंदाज जाहीर केला आहे. आता कुठे ब्राझीलमधील सोयाबीन पेरणी जोमात सुरू झाली. अनेक भागांत पाऊस झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. मात्र येथील पीक मार्चच्या शेवटी काढणीला येईल. तोपर्यंत पाऊस कसा पडतो यावर येथील पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ब्राझीलचे सोयाबीन उत्पादन किती राहील, हे आताच निश्‍चित सांगता येणार नाही.

उत्पादन आणि निर्यात (लाख टन)

वर्ष उत्पादन निर्यात

२०१८-१९ ११९७ ७४५

२०१९-२० १२६० ९२४

२०२०-२१ १३९५ ८१६

२०२१-२२ १२७० ७९३

२०२२-२३ १५२० ८९५

अर्जेंटिनामधील उत्पादन आणि निर्यात

अर्जेंटिना सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे नोव्हेंबरपासून सोयाबीनची पेरणी सुरू होते. डिसेंबरमध्ये पेरा जवळपास आटोपतो. तर मार्चच्या शेवटी पीक कापणीला येते. अर्जेंटिना आणि ब्राझील मधील पीक भारत आणि अमेरिकेप्रमाणे थोड्याफार फरकाने बाजारात येत असते. गेल्यावर्षी अर्जेंटिनात ४३९ लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते. तर ‘यूएसडीए‘च्या मते यंदा ४९५ लाख टन उत्पादन होईल. म्हणजेच उत्पादनात ५६ लाख टनांनी वाढ होईल. पण हे अंदाज लागवडीच्या काळातील आहेत. त्यात नंतर बदल होऊ शकतात.

उत्पादन आणि निर्यात (लाख टन)

वर्ष उत्पादन निर्यात

२०१८-१९ ५५३ ९१

२०१९-२० ४९० १००

२०२०-२१ ४६२ ५२

२०२१-२२ ४३९ २८

२०२२-२३ ४९५ ७२

चीन सोयाबीनचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे. चीन सरकारने यंदा देशातील तेलबिया उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे यंदा चीनमधील सोयाबीन उत्पादन १९० लाख टनांवर पोहोचेल, असा विश्‍वास चीनच्या सरकारला आहे. मात्र ‘यूएसडीए‘च्या अंदाजानुसार चीनमधील सोयाबीन उत्पादन १८४ लाख टनांवर स्थिरावेल. मात्र चीनची सोयाबीन आयात ९८० लाख टनांवर पोहोचेल, असेही यूएसडीएने म्हटले आहे. मागील हंगामात कोरोना आणि वाढत्या दरामुळे चीनची सोयाबीन आयात घटली होती. मात्र यंदा चीनमधील वराहपालन, पोल्ट्री आणि खाद्यतेल उद्योगाकडून मागणी चांगली आहे. तसेच चीनमधील लॉकडाउन शिथिल होत आहे. त्यामुळे यंदा चीन विक्रमी सोयाबीन आयात करेल, असा अंदाज व्यक्त होत होता.

उत्पादन आणि निर्यात

(लाख टन)

वर्ष उत्पादन निर्यात

२०१८-१९ १५८ ८२५

२०१९-२० १८१ ९७४

२०२०-२१ १९६ ९९७

२०२१-२२ १६४ ९१६

२०२२-२३ १८४ ९८०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com