Soybean Market : सोयाबीन उत्पादकांची साडेसाती संपणार का?

Soybean Procurement : महाराष्ट्रासहित इतर राज्यांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांत सोयाबीन आणि उडदाच्या हमीभाव खरेदीला परवानगी दिली आहे.
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

Soybean MSP Procurement : मागील महिन्यात आपण या स्तंभातून सोयाबीनमध्ये आलेल्या मंदीबाबत स्थानिक आणि वैश्‍विक बाजारातील घटकांची चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच सोयाबीनच्या दराने ४००० रुपये क्विंटल च्या पातळीला अंधुकसा का होईना परंतु स्पर्श केला. अमेरिकेतील भरघोस उत्पादन, पुढील काळात ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये देखील मोठ्या उत्पादनवाढीची शक्यता, आणि त्यामानाने निर्यातीत वाढ कमी असणे अशा विविध गोष्टींचा परिणाम म्हणून सोयाबीनने अमेरिकन वायदे बाजारात ९.३ डॉलर्स प्रति बुशेल ही अनेक वर्षांतील नीचांकी पातळी गाठली.

अशा परिस्थितीत पुढे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण आपल्या देशात महिन्याभरात सोयाबीनची काढणी सुरू होईल. नेहमीप्रमाणे काढणीपूर्वी किमती कमी होऊ लागतात. त्यामुळे आता सोयाबीन ४००० रुपयांखाली जाईल का हा प्रश्‍न सर्वांना भेडसावत आहे. तसे झाले तर मागील एक-दोन वर्षे साठे करून बसलेल्या व्यापारी आणि शेतकरी यांचा संयम सुटून एक ‘पॅनिक सेलिंग’ची लाट येईल का असंही विचारलं जात आहे.

अत्यल्प काळासाठी असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत निश्‍चित असे उत्तर नाही. कारण बाजार हा कुणाच्या सल्ल्याने किंवा अंदाजाने चालत नसतो. तरीही परंपरागत शहाणपण आणि बाजारातील ऐतिहासिक कल यांचा अभ्यास केल्यावर काही गोष्टींची स्पष्टता दिसू लागते.

बाजाराचा तळ कोणता?

बाजाराची चाल नेहमी काळाच्या काही महिने पुढे असते, असे मागील काही वर्षांत वारंवार दिसून आले आहे. म्हणजे बाजारातील कल हा अनेकदा पुढील किमान दोन-तीन महिन्यांत येऊ घातलेल्या परिस्थितीचे प्रतिबिंब असते. त्यामुळे सोयाबीनचा अमेरिकेतील ९.३ डॉलर्स प्रति बुशेल हा वायदे बाजारातील दर किंवा भारतातील ४०००-४१०० रुपये प्रति क्विंटल हा भाव अमेरिका खंडातील सोयाबीन उत्पादनातील अपेक्षित मोठ्या वाढीचे प्रतिबिंब होते.

परंतु अलीकडील काही दिवसांत हवामानविषयक घटक चांगलेच बदलले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजांमध्ये मोठे बदल घडतील, अशी परिस्थिति निर्माण झाली आहे. आणि असे केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका खंडात देखील घडत आहे. असे असेल तर आता नोव्हेंबर-डिसेंबर या काळात येऊ घातलेल्या परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागेल.

Soybean
Soybean Procurement : तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करणार

अतिपाऊस आणि पीक नुकसान

भारतात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात मागील पंधरवड्यात अतिवृष्टीच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष करून महाराष्ट्र आणि गुजरात येथील सोयाबीन क्षेत्रात ढगफुटीसदृश पावसामुळे प्रचंड पूर आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पीक नष्ट झाल्याचे किंवा खूप खराब झाल्याचे दिसून आले आहे. एकट्या मराठवाड्यात सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यात सोयाबीनसह सर्वच पिकांचा समावेश आहे. पंचनामे झाल्यावर याबाबत अधिकृत आकडेवारी येईलच. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनबरोबरच अनेक खरीप पिकांना ऐन काढणीच्या हंगामात मोठा धोका निर्माण झाला आहे. कदाचित ‘ला-निना’चा उद्‌भव सप्टेंबरमध्ये सुरू झाल्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

‘ला-निना’ आणि ब्राझील, अर्जेंटिना

हवामानाचा फटका केवळ भारतालाच बसला आहे असे नाही तर ब्राझीलमध्येही गेल्या ४० वर्षांतील सर्वांत तीव्र दुष्काळ दिसून येत आहे. त्यामुळे अनेक पिकांचे उत्पादन घटणार आहे. अलीकडील काळात एका आगीत ६० हजार हेक्टर ऊस जळून खाक झाला असून, त्यामुळे १४-१६ लाख टन साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. एकंदर एप्रिल ते ऑगस्ट या काळात तेथील मुख्य कृषी विभागांमध्ये कमी पाऊस आणि तीव्र उन्हाळा यांचा सामना करावा लागत आहे.

अर्थात, तेथे सोयाबीन पिकाची पेरणी महिनाखेर सुरू होऊन पुढील दोन-अडीच महिने पेरण्या चालू राहतील. परंतु त्या काळातही हवामान उष्ण राहील आणि पावसाचे प्रमाण कमीच राहील असे सध्याचे अंदाज आहेत. त्यामुळे यापूर्वी व्यक्त करण्यात आलेले विक्रमी पिकाचे अंदाज येत्या काळात फोल ठरण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

ब्राझीलपाठोपाठ अर्जेंटिनामध्ये सोयाबीन हंगाम सुरू होतो. जर ब्राझीलमध्ये पाऊस कमी राहिला तर अर्जेंटिनामध्येही पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे. तसेही या दोन्ही दक्षिण अमेरिकन देशांत ला-निना काळात दुष्काळ पडतो असे इतिहास दर्शवतो. त्यामुळे या दोन्ही देशातील सोयाबीन उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप कमी राहील असे म्हटले जात आहे. याकरिता दर महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या अमेरिकी कृषी खात्याच्या (यूएसडीए) कृषी उत्पादन अहवालावर लक्ष ठेवावे लागेल. सप्टेंबरचा अहवाल येत्या गुरुवारी प्रसिद्ध होणार आहे.

अर्थात, वरील प्रतिकूल हवामानाचा सोयाबीन बाजारपेठेवर परिणाम दिसून आला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या किमतीत २५०-३०० रुपयांची वाढ मागील दहा दिवसांत दिसून आली आहे. तर अमेरिकी बाजारपेठेत सोयाबीन १०.३ डॉलर्सवर गेले आहे, म्हणजे एक डॉलरने वाढले. अर्थात शुक्रवार अखेर आठवड्याअखेरची नफावसुली झाल्यामुळे सोयाबीन थोडे स्वस्त झाले असले, तरी अजूनही १० डॉलर्सवर बंद झाले आहे. गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या अमेरिकी कृषी खात्याच्या अहवालावर आता बाजाराचे लक्ष लागले आहे.

Soybean
Soybean Rate : सोयाबीनची भाववाढ होताच खरेदीदारांचा हमीभावाचा फंडा

जागतिक मंदी आणि खनीज तेलातील घसरण

एकीकडे सोयाबीनमधील मंदीला अटकाव करणारी परिस्थिती तयार होत असली तरी दुसरीकडे अमेरिकी अर्थव्यवस्थेची गती अपेक्षेपेक्षा अधिक मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर सोयाबीनचा जगातील सर्वांत मोठा ग्राहक चीनदेखील मंदीच्या विळख्यात सापडला आहे. याचा परिपाक म्हणून खनीज तेलाच्या किमती १३ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आल्या आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही आश्‍वासक गोष्ट असली तरी शेतीमाल किमती खनिज तेलाबरोबर चालत असतात हा इतिहास आहे. विशेष म्हणजे खनिज तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले असताना देखील किमती पडत आहेत ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे खनिज तेलातील मंदी कुठपर्यंत चालते हे देखील पाहावे लागेल.

हमीभाव खरेदी आणि बाजारभाव

वरील परिस्थिती सोयाबीनसाठी फार तेजीपूरक नसली तरी मंदीचा तळ यापूर्वीच गाठला गेला असावा, असे निश्‍चित म्हणता येईल. मात्र देशांतर्गत बाजारपेठेतील वातावरण सोयाबीनसाठी सकारात्मक होत आहे. कारण महाराष्ट्रासहित इतर राज्यांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांत सोयाबीन आणि उडदाच्या हमीभाव खरेदीला परवानगी दिली आहे. सोयाबीनची हमीभाव खरेदी ४८९२ रुपयांनी होणार असल्याने सध्याच्या ४३००-४४०० रुपयांवरून वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

अर्थात, यात ‘सेंटिमेंट’चा भाग जास्त आहे. कारण एकूण फक्त १,०३,००० टन सोयाबीनच्या खरेदीचीच परवानगी आहे. त्यात वाढ केली जाईल का किंवा मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्येही खरेदी केली जाईल का, याबाबत अधिक स्पष्टता पुढील १५ दिवसांत येईल. तेव्हा या खरेदीचा बाजारावर नक्की किती परिणाम होईल हे समजेल. एक गोष्ट मात्र नक्की. ४०००-४३०० रुपये या कक्षेत अनेक स्तरांतून सोयाबीन साठवणूक केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनाकलनीय आणि अनपेक्षित घटनेचे परिणाम वगळता सोयाबीन उत्पादकांची साडेसाती संपण्यास सुरुवात झाल्याचे मानता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com