
हिंगोली ः सोयाबीनचे वायदे बाजार (Soybean Future Market) सुरू करावेत. हळदीचे वायदे बाजार बंद (Soybean Future Ban) करू नयेत, अशी मागणी सातेफळ (ता. वसमत) येथील सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड यांनी सिक्युरिटी आणि एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्षा माधवी पुरी बूच यांच्याकडे केली आहे.
बोरगड म्हणाले, की शेतकऱ्यांचे सोयाबीन कमी दराने खरेदी करता यावे या उद्देशाने ‘सोपा’ने (सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन आॅफ इंडिया) कृषी वायदे बाजार बंद ठेवण्याची मागणी केली आहे. ‘सोपा’कडून प्रक्रिया उद्योगांच्या फायद्यासाठी सोयाबीनचे उत्पादन वाढ दर्शविली जाते. यंदा पेरणीच्या वेळी सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल १० हजार रुपये होते. परंतु यंदाच्या हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू होण्यापूर्वीच दर प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.
शेतकऱ्यांचे सोयाबीन प्रतिक्विंटल ४ हजार रुपये दराने खरेदीचे सोपाचे इरादे आहेत. त्यामुळे सोपाच्या मागणीकडे लक्ष देऊ नये. शेतकऱ्यांना भविष्यातील शेतीमालाच्या दराची माहिती वायदे बाजारामुळे मिळते. त्यामुळे शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी योग्य निर्णय घेऊ शकतात. वायदे बाजारात शेतीमालाचे भाव जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. शेतीमालाला योग्य किंमत मिळते. फ्यूचर मार्केट ही काळाची गरज आहे. त्यामुळे सोयाबीनचे वायदे बाजार तत्काळ सुरू करावेत.
वायदे बाजारातील हळदीचे व्यापार बंद करण्याच्या मागणीसाठी हिंगोली, वसमत कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे लिलाव बंद ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वायदे बाजारातून हळदीला वगळण्याची व्यापाऱ्याची मागणी योग्य नाही. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ‘एनसीडीएक्स’ने हळदीच्या निकषात सुधारणा करण्याची गरज आहे.
राज्यातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीन आणि हळद ही वायदे बाजारात राहावी म्हणून सेबीला पत्रव्यवहार करावा. सरकारही त्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतीमाल विपणन प्रक्रियेत व्यापाऱ्यांची एकाधिकारशाही चालणार नाही. ही धोक्याची घंटा समोर दिसत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी खूप मोठे षड्यंत्र चालवले आहे. जर ते त्यामध्ये यशस्वी झाले तर शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. मागील वर्षीचे शिल्लक सोयाबीन फ्यूचर मार्केटचा अंदाज न आल्यामुळे खूप मोठे नुकसान सहन करून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अभ्यास करावा. शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी, असे बोरगड यांनी नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.