सांगली ः यंदाच्या डाळिंब हंगामाला (Pomegranate Season) पावसाचा अडसर ठरला असला, तरी देशातून डाळिंब निर्यातीसाठी (Pomegranate Export) शेतकरी पुढे आले असल्याचे चित्र आहे. देशातून आतापर्यंत ४ हजार ७१४ शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी अपेडावर (APEDA) (कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) नोंदणी केली असल्याची माहिती डाळिंब संघाच्या सूत्रांनी दिली आहे.
देशातील आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून डाळिंब युरोपसह अन्य देशात डाळिंबाची निर्यात केली जाते. गतवर्षी देशातून २४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यंदाच्या हंगामात देशातून डाळिंब युरोपसह आखाती देशात डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी गुजरात राज्यातून २१ शेतकरी डाळिंब निर्यातीसाठी पुढे आले होते. मात्र, यंदाच्या हंगामात गुजरात राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसते आहे.
दरम्यान, यंदाच्या डाळिंब बागांचा हंगाम धरण्यापासून डाळिंबाला पोषक असे वातावरण होते. मात्र त्यानंतर फुलकळी, लिंबू आकाराचे फळ असताना देशातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम डाळिंब सेटिंग होण्यावर झाला.
त्यातच तेलकट, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हा पाऊस डाळिंब हंगामाला अडसर ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात डाळिंबाची निर्यात होण्याची शक्यता नसल्याचे डाळिंब उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
डाळिंब उत्पादक शेतकरी काटेकोर नियोजन करत डाळिंबाच्या बागा साधत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत देशातून डाळिंब निर्यात करण्यासाठी ४ हजार ४१७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी देशातून डाळिंब निर्यात करण्यासाठी २ हजार ४३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली केली होती.
मात्र गेल्या वर्षीदेखील डाळिंबाला पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे डाळिंब युरोपसह आखाती देशात निर्यात घटली होती. यंदा डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी संख्या वाढली असली तरी दर्जेदार रेसिड्यू फ्री डाळिंबाचे उत्पादन घटल्याने युरोपसह अन्य आखाती देशात निर्यातीत मोठी घट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
गुजरातमधून यंदा डाळिंबाची निर्यात नाही
गुजरात राज्यातून दरवर्षी डाळिंबाची निर्यात होते. यंदाच्या हंगामात राज्यातील डाळिंबाला फटका बसला. यामुळे फुलोरावस्थेत असलेल्या डाळिंबाचे सेटिंग झाले नसल्याने सुमारे ५० टक्के बागांचे नुकसान झाले आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात गुजरातमधून डाळिंब निर्यातीसाठी शेतकरी पुढे आले नाहीत. त्यामुळे यंदाच्या हंगामात गुजरात राज्यातून डाळिंबाची निर्यात होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यनिहाय डाळिंब निर्यातीसाठी झालेली नोंदणी
राज्य.....नूतनीकरण....नवीन....एकूण
महाराष्ट्र....४६५....४१७०...४६३५
आंध्र प्रदेश...०००...३८...३८
कर्नाटक...०००...११...११
तेलंगणा...७...२३....३०
एकूण...४७२...४२४७...४७१४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.