Nashik Grape Export : युरोपमध्ये द्राक्ष निर्यात करताना 'अपेडा'च्या 'ग्रेपनेट' प्रणालीत द्राक्ष बागांची नोंदणी आवश्यक असते.
त्यानुसार २०२२-२३च्या हंगामात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून ४४ हजार ६५२ बागांची नोंदणी करण्यात आली. आत्तापर्यंतची ही विक्रमी नोंदणी आहे.
यंदा सांगली, सोलापूर, नगर व उस्मानाबाद जिल्ह्यांतून वाढ दिसून आली आहे. राज्यात नव्याने ८ हजार ६८७ नवीन बागांची नोंदणी झाली आहे.
मात्र द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणी कमी झाली आहे.
जानेवारीअखेर नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. ही मुदत फेब्रुवारीअखेर वाढविण्यात आल्याने यात अजून वाढ होण्याचा अंदाज आहे.
डिसेंबर-२०२२ मध्ये निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी रखडलेली होती. मात्र जानेवारी महिन्यात नोंदणीमध्ये गती घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे ही बागांची नोंदणी पूर्ण होऊ शकली आहे.
चालु हंगामात अतिवृष्टी, मॉन्सूनोत्तर पाऊस व अवकाळी अशा अडचणींमुळे द्राक्ष गोडीबहर छाटण्या जवळपास एक महिना लांबणीवर गेल्या. परिणामी हंगाम प्रभावित झाल्याची स्थिती होती.
छाटणीची कामे एकदाच दाटल्याने अनेक भागांत मजुरांची टंचाई दिसून आली. अशा आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात शेतकऱ्यांनी हंगाम मोठ्या कष्टाने उभा केला आहे.
राज्यभरात अनेक जिल्ह्यात शेतकरी उत्कृष्ट कृषी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून प्रयोगशीलतेने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेत आहेत. मात्र हंगामात सप्टेंबरमध्ये छाटलेल्या काही बागांमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यात घड जिरणे, निघणाऱ्या एकसारखेपणा नसणे अशा अडचणी दिसून आल्या.
२५ ऑक्टोबरअखेर छाटलेल्या बागांचे नुकसान कमी होते. तर १५ नोव्हेंबरपर्यंत उशिरा छाटलेल्या बागांमध्ये माल निघण्यासह जिरण्याची समस्या दिसून आली होती. वाढलेला उत्पादन खर्च, मजुर टंचाई ही आव्हाने कायम आहेत.
मात्र समस्यांवर मात करत बागायतदार पुन्हा उमेदीने संघर्ष करत पुढे येत आहेत.
मराठवाडा, विदर्भ, कोकणही येतोय निर्यातीत पुढे
मराठवाड्यात लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अनुक्रमे १०८ व ५७ बागांची नोंदणी नव्याने झाली आहे. त्यामुळे मराठवाडा भाग निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात पुढे येत असल्याचे चित्र आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात किरकोळ ७ बागांची तर विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात ६ बागांची नव्याने नोंदणी झाली आहे. तर कोकणातही ठाणे जिल्ह्यात नव्याने ३ बागांची नोंदणी झाली आहे.
राज्यनिहाय द्राक्ष बागा नोंदणीची स्थिती : (२ फेब्रुवारीअखेर)
राज्य ...नूतनीकरण...नवी नोंदणी...एकूण
महाराष्ट्र...३६,८८६...८,६८६...४४,५७२
कर्नाटक...५६...२४...८०
एकूण...३५,९४२...८,७१०...४४,६५२
राज्यातील नोंदणीची स्थिती:
जिल्हा...नूतनीकरण...नवी नोंदणी...एकूण
अहमदनगर...६५४...४०४...१०५८
औरंगाबाद...१...१...२
बीड...२...०...२
बुलडाणा...७६...६...८२
धुळे...०...७...७
जालना...१९...१...२०
लातूर...११३...१०८...२२१
नाशिक...२६,८१९...३,६६८...३०,४८७
उस्मानाबाद...५५०...५७...६०७
पुणे...७६८...२१८...९८६
सांगली...५,३९१...४,०६७...९,४५८
सातारा...३७३.. ४६...४१९
सोलापूर...१,११७...१००...१,२१७
ठाणे...०...३...३
वाशीम...३...०...३
नाशिकमध्ये नोंदणी घटली
देशभरात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी ३४ हजार २९५ बागांची नोंदणी झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत ३० हजार ४८७ बागांची नोंदणी झाली आहे.
त्यामुळे आकडेवारीत ३ हजार ८०८ बागा नोंदणीची तफावत दिसून येत आहे. मुदतवाढ दिल्याने बाकी शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल.
या बागांची नोंदणी केल्यास किमान रासायनिक अंश पातळी असलेल्या द्राक्ष मालाला युरोपसह, इतर आयातदार देशात चांगली संधी असेल.
चालुवर्षी ८ हजार शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा हंगामात द्राक्ष निर्यात एप्रिलअखेरपर्यंत होत राहील. नोंदणीची मुदत फेब्रुवारीअखेर असल्याने आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणी बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी.
- गोविंद हांडे, कृषी निर्यात सल्लागार, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान, कृषी आयुक्तालय, पुणे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.