Egg Rate : राज्यात अंडी, चिकनला मागणी वाढल्याने दरात झाली सुधारणा
नगर ः राज्यासह देशातील बहुतांश ठिकाणी थंडीचा (Clod Weather) कडाका वाढला असून, ही थंडी कुक्कुट उत्पादकांना (Poultry Farmer) लाभदायक ठरत आहे. थंडीमुळे अंडी, चिकनच्या मागणीत (Egg Chicken Demand) वाढल्याने दरात काहीशी वाढ झाली आहे. सध्या ठोक दरात अंड्याला प्रति शेकडा साडेपाचशे रुपये, तर चिकनच्या दरात प्रति किलो ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे.
राज्यात दर महिन्याला सुमारे चार कोटी ब्रॉयलर कोंबड्याचे उत्पादन होते. याशिवाय ८० लाखांच्या जवळपास देशी कोंबड्याचे उत्पादन होते. तीन लाखांच्या जवळपास शेतकरी कुक्कुट उद्योगावर आधारित आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सतत अडचणीत येत आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून उत्पादन कमी झाले आहे. ब्रॉयलर कोंबड्याचे सध्या नेहमीच्या तुलनेत ७० टक्के उत्पादन होत असून, गावरान कोंबड्याचे पन्नास टक्के उत्पादन होत आहे
सध्याही मागणी असली तरी खाद्याचे दर व इतर वेगवेगळ्या कारणाने हा व्यवसाय सततच्या अडचणीमुळे बेभरवशाचा झाल्यासारखा आहे. कोरोना काळात झालेले नुकसान व त्यानंतरही आलेल्या या व्यवसायावरील संकटामुळे कुक्कुट उत्पादक सतत हतबल आहेत.
अनेक शेतकरी या व्यवसायापासून बाजूला गेले. राज्यात एकूण कुक्कुटपालनातील ४० टक्के शेतकरी अंड्याचे उत्पादन करतात.
दररोज राज्यात दोन कोटींच्या जवळपास अंड्याचे उत्पादन होते. सध्या मात्र दररोज तीन कोटी अंड्यांना मागणी असून, उर्वरित अंडी कर्नाटक व अन्य राज्यांतून येत आहेत.
आठ दिवसांपासून देशभरात थंडीचा कडाका आहे. थंडीत अंडी खाणे आरोग्यासाठी हितकारक असल्याचे आरोग्य सल्लागार सांगत असल्याने अंड्याची मागणी वाढली आहे.
राज्यात मागणी असल्याने अंडीच्या दरात गेल्या महिनाभराचा विचार करता एक ते दीड रुपयाने वाढ झाली आहे. सध्या प्रति शेकडा सरासरी ५५० दर मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी हा दर ३७५ ते ४०० रुपये होता असा होता.
राज्यात असलेली मागणी आणि पुरवठा यातील तफावतीमुळे एक कोटी रुपयांच्या जवळपास अंडी तेलंगण आणि कर्नाटक राज्यांतून मागणी होत आहे. देशी कोंबडीची अंडी स्थानिक पातळीवर विकली जात आहेत. सध्या देशी कोंबडीच्या अंड्याला प्रति नग दहा ते बारा रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
चिकनच्या दरातही वाढ झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ब्रॉयलर चिकनला ९० ते १०० रुपये दर होता. तो दर आता १०० ते ११० रुपये झाला आहे. थंडीमुळे चिकन, अंडीच्या दरात वाढ झाली असली तरी वैयक्तिक पातळीवर मात्र उत्पादन कमी झाले आहे.
खाद्य दर वाढलेले
कुक्कुटपालन उद्योग सातत्याने अडचणीत आहे. आता दर मिळत असले तरी ही दरवाढ तात्पुरती आहे. खाद्याचे दरही वाढतच आहेत. तीन महिन्यांपूर्वीपेक्षा आता खाद्यदरात वाढ झाली असून, मक्याला चोवीस रुपये, सोया डीओसीला ५० रुपये किलो दर पडतो आहे. त्यामुळे पूर्वी साडेतीन रुपये प्रति अंडी उत्पादन खर्च होता, आता दर साडेचार रुपये आहे. चिकनला पूर्वी ६० रुपये प्रति किलो दर होता तो आता ८५ रुपये आहे.
चिकन, अंड्याला दर चांगला मिळत आहे. पुढील काही दिवस हा दर वाढतच राहील, मात्र मागील काळात झालेला धोका पाहता वैयक्तिक पातळीवर उत्पादन कमी झाले आहे.
- संतोष कानडे, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नगर जिल्हा
राज्यासह देशभरात अंड्याला चांगली मागणी असल्याने दरही चांगले मिळत आहेत. थंडी अशीच राहिली तर दरात वाढ होऊ शकते.
- श्याम भगत, अध्यक्ष, महाराष्ट्र ब्रॉयलर ब्रीडर असोसिएशन
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.