Poultry Vaccination : कुक्कुटपालनातील लसीकरणाचे महत्त्व

कोंबड्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करावे. लसीकरणामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध रोगांपासून त्यांचा बचाव होतो. लसीकरणाच्या अगोदर बॅच नंबर, लसीचे नाव, कंपनी, वापरण्याची अंतिम मुदत व मात्रा यांच्या नोंदी ठेवाव्यात.
Poultry Vaccination
Poultry VaccinationAgrowon

जिवाणू व विषाणूजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणारे प्रतिबंधात्मक औषध म्हणजेच ‘लस’ (Vaccine) होय. या प्रक्रियेला ‘लसीकरण’ (Vaccination) असे म्हणतात. कोंबड्यांमध्ये (Poultry Vaccination) निरनिराळ्या वयोगटात निरनिराळ्या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.

या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून मरतुक कमी होऊन संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येते. वेळेवर प्रतिबंधात्मक लसीकरण हेच यशस्वी कुक्कुटपालन व्यवसायाचे (Poultry Farming) सूत्र आहे.

Poultry Vaccination
Poultry Management : वातावरण बदलानुसार कोंबड्याचे व्यवस्थापन

लसीची खरेदी व वाहतूक

लस खरेदी करताना लसीच्या बाटलीवरील माहिती काळजीपूर्वक वाचावी. लस वापरण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.

लसीच्या बाटलीवर वापराची तारीख लिहिलेली असते. ती काळजीपूर्वक पाहावी. लसीकरणाची तारीख संपून गेलेली असल्यास अशी लस खरेदी करू नये.

लसीकरणाचे योग्य परिणाम साधण्यासाठी लसीच्या बाटल्या कायम थंड तापमानामध्ये (२ ते ८ अंश सेल्सिअस) ठेवणे आवश्यक आहे.

लस खरेदी करताना विक्रेत्याने ती लस थंड तापमानात (२ ते ८ अंश सेल्सिअस) ठेवली होती काय, याची खात्री करावी.

लसीची वाहतूक कंपनीपासून वापरण्याच्या जागेपर्यंत थर्मासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून करावी. योग्य प्रकारे वाहतूक नसेल तर लसीचा फायदा होणार नाही.

लसीच्या बाटलीचे किंवा थर्मासचे झाकण उघडे राहणार नाही याची काळजी घ्यावी.

लस खरेदी करताना लसीच्या प्रतीची पशुवैद्यकांकडून योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.

लसीकरण पद्धती

अ) डोळ्यांतून किंवा नाकाद्वारे लसीकरण

राणीखेत व गंबोरो या रोगाच्या लसी डोळ्यांतून किंवा नाकाद्वारे दिल्या जातात.

नाकातून किंवा डोळ्यांतून लसीकरण करताना ती लस तशी देता येते का, याची खात्री करावी.

या पद्धतीद्वारे लसीकरण करण्यासाठी लसीची योग्य मात्रा (थेंब) डोळ्यात किंवा नाकात पडण्यासाठी निर्जंतुक ड्रॉपरचा वापर करावा.

लस उत्पादकाच्या सूचनेनुसार लसीची मात्रा १ किंवा २ थेंब, एका किंवा दोन्ही डोळ्यांत किंवा नाकपुड्यांत द्यावयाची हे ठरवावे.

ब) पिण्याच्या पाण्यातून देणे

लसीकरणासाठी शुद्ध व थंड पाणी वापरावे. पाणी गरम असल्यास त्यात बर्फ टाकावा. उष्ण पाण्यामुळे विशेषत: उन्हाळ्यात लस निरुपयोगी होते.

पाण्यामधून लस देण्याच्या २ तास अगोदर पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी देऊ नये. उन्हाळ्यात उष्णता अधिक असेल तेव्हा किमान एक तास अगोदर पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी देऊ नये.

लस पाण्यात मिसळण्यापूर्वी त्या पाण्यात इतर कोणतेही औषध (क्लोरिन, ब्लिचिंग पावडर) मिसळले नसल्याची खात्री करावी.

Poultry Vaccination
Poultry Diseases : कोंबड्यांमध्ये या मार्गाने होतो रोगप्रसार

पाण्यामध्ये लस मिसळताना त्यासोबत इतर कोणतेही औषध वापर करू नये. जेणेकरून लसीची गुणवत्ता उत्तम राहण्यास मदत होते.

लस देण्यापूर्वी पाण्याची भांडी ब्रशने किंवा हाताने चांगली घासून घ्यावीत. त्यामुळे भांड्यात पाण्यामध्ये जमा झालेली घाण, गाळ किंवा पक्ष्यांची विष्ठा निघून जाईल.

लसीकरणासाठी वापरावयाच्या पाण्यात दूध पावडर ३ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळावी.

लस पिण्याच्या पाण्यात मिसळण्यापूर्वी थोड्या पाण्यात मिसळून घ्यावी आणि नंतरच ते लस मिश्रित पाणी वापरावे.

लस मिश्रित पाणी पक्ष्यांनी अर्ध्या ते एक तासात पिणे आवश्यक आहे.

ब्रॉयलर कोंबड्यांसाठी लसीकरण वेळापत्रक

वय लसीचे नाव मात्रा लस द्यावयाची पद्धत

१) ६ दिवस लासोटा एक किंवा दोन थेंब डोळ्यांतून किंवा नाकातून

२) १० दिवस गंबोरो एक किंवा दोन थेंब डोळ्यांतून किंवा तोंडातून

३) २० दिवस बुस्टर गंबोरो उत्पादकाच्या सूचनेनुसार थंड पाण्यातून

४) २ दिवस बुस्टर लासोटा उत्पादकाच्या सूचनेनुसार थंड पाण्यातून

(टीप ः तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोंबड्यांना लसीकरण करावे.)

Poultry Vaccination
Poultry Diseases: कोंबड्यांतील रोगप्रसार कसा रोखायचा?

लसीकरण करताना घ्यावयाची काळजी

लसीची बाटली फोडताना लस जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी.

लसीच्या बाटलीसोबत दिलेले द्रावण किंवा निर्जंतुक पाणी लसीकरणापूर्वी लसीमध्ये मिसळून घ्यावे. त्यानंतर लस हलवून एकजीव होईल याची खात्री करावी.

लसीकरणास तयार झालेली लस बर्फ असलेल्या भांड्यात ठेवावी.

संपूर्ण लसीकरण होईपर्यंत लस ठेवलेल्या भांड्याचे तापमान थंड राहील याची काळजी घ्यावी.

कोंबड्यांना लसीकरणाचा अतिरिक्त ताण पडू नये म्हणून लसीकरण साधारणत: सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे.

लसीकरण करताना पक्ष्यांची योग्य हाताळणी करावी. लसीकरण झालेले पक्षी वेगळ्या बाजूस ठेवावेत. जेणेकरून लसीकरण न झालेले पक्षी सहज ओळखता येतील.

लसीकरण झालेले पक्षी फेकू नयेत.

लसीकरणासाठी योग्य पद्धतीचा (डोळ्यांतून, नाकातून अथवा तोंडातून) वापर करावा. लसीकरण पद्धतीनुसार योग्य काळजी घ्यावी.

लसीच्या बाटलीवर उत्पादकांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळाव्यात.

कालबाह्य झालेली लस वापरू नये. अशा लसी वापरल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

लसीच्या बाटलीवर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.

कोणत्याही लसीचे अपेक्षित परिणाम हे प्रशिक्षित व्यक्तीने लसीकरण केल्यानंतर किंवा प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली इतर व्यक्तींनी लसीकरण केल्यानंतरच मिळतो हे लक्षात ठेवावे.

आजारी पक्ष्यांना लसीकरण करू नये. आजारी पक्ष्यांवर योग्य औषधोपचार करून ते बरे झाल्यानंतरच लसीकरण करावे.

लसीकरणानंतरची काळजी

लसीकरणानंतर किमान ३ दिवस दिवसातून एक वेळ पाण्यातून जीवनसत्त्व अ, ड, ई व सी ची मात्रा द्यावी. जेणेकरून पक्ष्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.

लसयुक्त पाणी संपल्यानंतर पक्ष्यांना ताजे व स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.

लसीकरणासाठी वापरलेले साहित्य, लसीच्या बाटल्या, त्यांची झाकणे इत्यादी व्यवस्थित जाळून नष्ट करावे.

लसीकरणाच्या अगोदर लसीचे नाव, बॅच क्रमांक, लस उत्पादक कंपनी, लस वापराची शेवटची तारीख, लसीकरणाची तारीख, वेळ इत्यादी बाबींची नोंद ठेवावी. तसेच लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पक्ष्यांना रोगाची कोणती लक्षणे दिसल्यास त्याची नोंद व ते किती पक्ष्यांमध्ये दिसली, काही मरतुक झाली का? इत्यादी गोष्टींच्या अचूक नोंदी ठेवणे अनिवार्य आहे.

बऱ्याच वेळा लसीकरण प्रक्रियेमुळे पक्ष्यांवर ताण येतो. त्यासाठी लसीकरणानंतर लगेच पक्ष्यांच्या व्यवस्थापनामध्ये काही बदल करून हा ताण कमी करता येईल. जसे की, ब्रूडरचे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा ५० फॅरानहाइटने (२.८० सेल्सिअस) वाढवावे. हे तापमान पक्षी स्थिर होईपर्यंत ठेवावे. तसेच ताण कमी करणारी औषधे ही पाण्यामधून आवश्यकतेनुसार द्यावीत.

- डॉ. संतोष मोरेगावकर, ९९३०६८२४२१

(पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com