
Sangli News राज्यातील बेदाणा हंगाम (Raisin Season) अंतिम टप्प्यात आला असून यंदाच्या हंगामात सुमारे २ लाख २० ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन (Raisin Production) होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत. येत्या काळातही दर टिकून राहतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील (Raisin Industry) जाणकारांनी व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी राज्यात १ लाख ८० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. राज्यात सर्वाधिक बेदाणा सांगली जिल्ह्यात तयार होतो. यंदा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. सुरुवातीच्या काळात बेदाणा निर्मितीला गती नव्हती. त्यानंतर गती आली.
यंदाच्या हंगामात द्राक्षाला अपेक्षित दर मिळत नसल्याने टेबल ग्रेप्सपासून बेदाणा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा बेदाणा निर्मितीकडे कल वाढला आहे. सांगलीसह अन्य ठिकाणी बेदाणा निर्मितीसाठी धांदल सुरू झाली आहे.
Raisinयंदा कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरासह इतर भागातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्याचे काम सुरू आहे.
सध्या बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. एप्रिलअखेर बेदाणा निर्मिती सुरू राहील, अशी शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या हंगामात सुमारे २ लाख २० हजार ते २ लाख ३० हजार टन बेदाण्याचे उत्पादन म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ४० ते ५० हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन वाढेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
निसर्गाची साथ
वास्तविक पाहता, बेदाणा हंगाम सुरू झाला की वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो. त्यामुळे बेदाण्याचे मोठे नुकसान होते. यंदा पाऊस झाला नाही.
त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. यंदा जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीच्या पट्ट्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे बेदाण्याचा दर्जा घसरला आहे. बेदाणा काळा पडला आहे. बेदाणा निर्मितीला निसर्गाची साथ मिळाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समानाधाचे वातावरण आहे.
बेदाणा दर प्रति किलो
हिरवा बेदाणा ः १५० ते २००
पिवळा बेदाणा ः १५० ते १९०
काळा बेदाणा ः ३० ते ६०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.