Parbhani News : चालू आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) पहिल्या सहा महिन्यांत (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२४) परभणी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयांतर्गत पूर्णा (जि.परभणी) येथील रेशीम कोष मार्केटमध्ये २२३ शेतकऱ्यांकडून १६.१०१ टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले. या कोषाची किंमत ६१ लाख ४९ हजार १०० रुपये एवढी होती, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.
शाश्वत उत्पन्न मिळत असल्यामुळे मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेडसह अन्य जिल्ह्यांतील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. पूर्णा येथे रेशीम मार्केट सुरू होण्यापूर्वी या भागातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना कर्नाटकातील बंगळूर जवळील रामनगर येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी न्यावे लागत असत.
सिंकदराबाद ते मनमाड या रेल्वेमार्गावरील पूर्णा जंक्शन (जि. परभणी) येथे २०१९ मध्ये रेशीम कोष मार्केट सुरू झाले. नजीकचे मार्केट उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चासह वेळेची बचत होत आहे. पूर्णा येथील समर्थ रेशीम कोष बाजारपेठेत मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांसह विदर्भातील यवतमाळ, वर्धा येथे कोषाची आवक होते.
चालू आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेर २४ खरेदीदारांनी २२३ शेतकऱ्यांचे १६.१०१ टन रेशीम कोष खरेदी केले. रेशीम कोषाला प्रतिकिलो किमान ३१० ते कमाल ५३० रुपये, तर सरासरी ४२० रुपये दर मिळाले. एप्रिल ते सप्टेंबर काळात कोषाची आवक कमी असते. त्यानंतर आवकेत वाढ होते, असे मार्केटमधील सूत्रांनी सांगितले.
पूर्णा मार्केट रेशीम कोष खरेदी स्थिती
(खरेदी टनांमध्ये, रक्कम लाखांत)
महिना शेतकरी संख्या कोष खरेदी रक्कम
एप्रिल ४८ ३.९४ १५.७९
मे २९ १.०५६ ४.३२९
जून १ ०.१०४ ०.४४
जुलै २३ २.१२६ ८.३३
ऑगस्ट ८८ ७.००१ २५.६६
सप्टेंबर ३४ १.८७४ ६.९४२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.