
सांगली ः देशात दरवर्षी सुमारे ८० ते ९० हजार हेक्टरवर डाळिंबाचा (Pomegranate) मृग बहर धरला जातो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster), पाऊस आणि रोगराईचा (Pomegranate Disease) फटका देशातील मृग बहरामधील डाळिंबाला (Pomegranate) बसत आहे. परिणामी, डाळिंब पीक धोक्यात (Pomegranate Crop In Crisis) आले आहे. यंदाच्या हंगामात डाळिंबाचा मृग बहर ५० टक्क्यांनी घटला आहे. सध्या डाळिंबावर काही प्रमाणात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तरीही परतीच्या पावसावर डाळिंबाची भिस्त अवलंबून आहे. डाळिंबाला पावसाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सुमारे २० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी चिंता डाळिंब संघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील डाळिंब बाजारपेठेत उशिरा येण्याची शक्यता आहे.
देशात मृग बहरातील डाळिंबांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी हा बहर धरण्यात निपुण आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मृग हंगामातील डाळिंबाला पावसाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे शेतकरी मृग बहर घेण्याऐवजी हस्त, आंबिया बहराकडे वळाले आहेत. परिणामी, मृग बहरातील डाळिंबाचे क्षेत्र कमी होत आहे. यंदाच्या हंगामात देशात सुमारे ४० हजार हेक्टरवर मृग बहर धरण्यात आला आहे. परंतु अति उष्णता आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचे सेटिंग व्यवस्थित झाले नसल्याचे चित्र आहे. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत बहर साधला आहे. सध्या डाळिंबाचा आकार लिंबू आणि पेरूच्या फळा इतका म्हणजे ५० ते १०० ग्रॅमच्या आकाराचा आहे. मात्र सततचा आणि अति पाऊस यामुळे काही प्रमाणात डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील म्हणजे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांत डाळिंबाचे पीक चांगले साधले आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाडा, नगर या जिल्ह्यांत डाळिंबाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातही पावसाचा फटका डाळिंबाला बसला आहे.
- देशात सुमारे ४० हजार हेक्टरवर मृग बहर धरला
- यंदा डाळिंब उशिरा बाजारपेठेत येण्याची शक्यता
- परतीच्या पावसावर हंगामाची भिस्त
- विदर्भ, मराठवाडा, नगर जिल्ह्यांत मोठे नुकसान
- बदलत्या वातावरणामुळे सेटिंग होण्यास विलंब
डाळिंबाचा आकार वाढण्यास होणार उशीर
मृग बहरातील डाळिंब सर्वसाधारणपणे दसरा, दिवाळीच्या दरम्यान बाजारपेठेत विक्रीला येतात. बदलत्या वातावरणामुळे सेटिंग होण्यास विलंब झाला आहे. परिणामी, डाळिंब फळाचा आकार वाढण्यास उशीर होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात डाळिंब विक्रीस येण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.