
Cotton Market Condition : कापूस बाजारात काही घटक भाववाढीला पोषक आहेत. पण आवकेचा दबाव आणखी काही आठवडे राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात कापूस दर एका मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. कापूस दरवाढीसाठी काही पोषक घटक आहेत. सोबतच दरवाढीच्या वाटेत अडथळा निर्माण करणारेही काही घटक आहे. पण बाजार पुढच्या काळात कमी आवकेच्या टप्प्यात जाईल तेव्हा मात्र दराला आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या दरावर परिणाम करणारे नेमके घटक कोणते? दरवाढीला ब्रेक लावणारे घटक कोणते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कापूस दरवाढीला आधार देणारा पहिला घटक म्हणजे देशातील कमी उत्पादन. हंगाम जसजसा पुढे तसे देशातील उत्पादनाचे अंदाज स्पष्ट होतील. देशातील कापूस उत्पादनात यंदा घट होणार, असा अंदाज देशातील सर्व संस्थांसह सरकारनेही व्यक्त केला. सरकारने आपल्या पहिल्या अंदाजात देशात २९९ लाख गाठी उत्पादन होईल, असे म्हटले आहे. कापूस उत्पादन आणि वापर समितीनेही यंदा २९९ लाख गाठींचाच अंदाज दिला.
यूएसडीएने मात्र डिसेंबरच्या आपल्या अंदाजात भारताच्या उत्पादनाचा अंदाज ४ टक्क्यांनी वाढवून ३२० लाख गाठी केला आहे. मात्र देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचे उद्योग आणि विश्लेषक संस्थांनी आधीपासूनच सांगितले आहे. कारण एकतर देशात यंदा लागवडच कमी झाली होती. लागवडीत १० टक्के घट आली होती. तर पावसाचाही पिकाला फटका बसला आहे. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही यंदा कापूस पिकाला पावसाचा फटका आहे. त्यामुळेच यंदा देशात उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील, असा अंदाज सर्व आघाड्यांवर व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे कापसाचा वापर मात्र चांगला राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात कापसाचा वापर ३२० ते ३३० लाख गाठींच्या दरम्यान होईल. म्हणजेच उत्पादनापेक्षा यंदा वापर जास्त असणार आहे. ही एक बाजू कापूस बाजारात सकारात्मक संकेत देणारी आहे. यूएसडीएने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या अंदाज भारताच्या कापूस उत्पादनाच्या अंदाज वाढ केली. तसेच वापरही वाढेल, असे म्हटले आहे. तसेच पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये कापूस वापर वाढणार, असाही आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेविषयी मात्र काहीशी चिंता आहे.
भारतातून सध्या कापूस निर्यात ठप्प असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. पण यंदा आपल्याला दरवर्षीप्रमाणे कापूस निर्यातीची चिंता नसेल. कारण यंदाच्या हंगामात भारत निर्यातदार म्हणून नाही तर आयातदार म्हणून बाजारात उतरत आहे. भारत यंदा विक्रमी कापूस आयात करणार आहे. त्यामुळे कापूस निर्यात यंदा कमीच राहणार आहे. भारतात कापसाचे भाव जास्त असल्याने निर्यात होत नाही, अशीही चर्चा बाजारात आहे. त्यात तथ्यही आहे. पण देशात आंतरराष्ट्रीय बाजारातपेक्षा भाव जास्त आहेत आणि ते टिकूनही आहेत एका कारणामुळे, ते म्हणजे यंदा आपले उत्पादन कमी आणि आपल्याला आयात जास्त करावी लागणार आहे. त्यामुळे देशातील कापूस आवक शिगेला पोहोचलेली असतानाही कापसाचे भाव टिकून आहेत.
सरकीचा भावही गेल्या काही आठवड्यांपासून टिकून आहे. सरकीला सध्या ३ हजार १०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सरकीची उपलब्धता जास्त असतानाही भावाला एक आधार आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरकी तेलाचे भाव. गेल्या तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. महत्त्वाच्या तेलांपैकी पाम तेलाचे भाव खूपच वाढले आहेत. सध्या पामतेल सोयातेल आणि सूर्यफूल तेलापेक्षा महाग आहे. त्यामुळे सर्वच खाद्यतेलाचे भाव वाढले आहे.
खाद्यतेलाचे भाव पुढच्या काळातही तेजीत राहतील, अशी समीकरणे आहेत. याचा आधार सरकी तेलालाही मिळत आहे. सरकीचे तेल तेजीत आले आहे. पुढच्या काळातही तेलातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. नेमके त्या काळात बाजारात सरकीची आवक कमी होईल. त्यामुळे सरकीला आणखी आधार मिळेल, अशी परिस्थिती. कापसाच्या भावासाठी सरकीचे भाव महत्त्वाचे असतात. कारण कापसात ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. सरकीचे भाव सुधारल्याचा आधार नक्कीच कापसाला मिळेल.
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन देखील होत आहे. रुपयाचे अवमूल्यान झाल्याचा फायदा देशातील बाजारात होत असतो. या परिस्थितीत कापसाची निर्यात स्वस्त होईल आणि आयात महाग होईल. आयात महाग झाल्यानंतर देशातील कापूस बाजारालाही आधार मिळेल. तसेच बाजारात सीसीआय कापूस खरेदीत आहे. सीसीआयची खरेदी यंदा सुरळीत सुरू असल्याचे दिसते. सीसीआयला कापूसही मिळत आहे. सीसीआय यंदा ७० ते ८० लाख गाठी कापूस खरेदी करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सीसीआयच्या खरेदीने बाजाराला एक बेंचमार्क तयार करून दिला आहे. कापूस आवकेचा दबाव असेपर्यंत सीसीआय बाजारात असेल. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर जेव्हा खुल्या बाजारातही हमीभावाच्या जवळ बाजारभाव पोहोचेल, तेव्हा सीसीआयला कापूस मिळणार नाही. सीसीआयची खरेदी जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राहण्याचा अंदाज आहे. आवक कमी झाल्यानंतर सीसीआय बाजारातून बाहेर पडल्यानंतर कापूस दराला चांगला आधार मिळू शकतो.
दुसरीकडे सुताला आणि कापसाला उठाव नसल्याने कापसाच्या भावात सुधारणा होणार नाही, अशी चर्चाही सुरू आहे. पण खरेदीदारांच्या दृष्टीने कमी भावात माल मिळवण्याचा हाच कालावधी असतो. शेतकऱ्यांनी माल मागे ठेवला तर स्वस्त माल मिळणार नाही. त्यामुळे दरवर्षी आपल्याला बाजारात नवा कापूस दाखल झाल्यानंतर कापसाला यंदा मागणी नाही, उद्योगाची परिस्थिती बिकट आहे, अशा बातम्या दिसतात. यंदाही तेच होत आहे. सध्या कापूस आवकेचा आणि कापूस गाठी, सूत उत्पादनाचा महत्त्वाचा कालावधी आहे. त्यामुळे उत्पादनाच्या तुलनेत मागणी कमीच राहणार.
तसेच बांगलादेश, पाकिस्तान आणि चीन या देशांमधील आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे कापूस निर्यातीला मागणी नाही, असे चर्चा आहे. या चर्चेत काही प्रमाणात तथ्यही आहे. पण जर यंदा आपल्याला निर्यातीपेक्षा आयात जास्त करायची आहे तर या परिस्थितीचा जास्त बाऊ करण्यात अर्थ नाही. वेगवेगळ्या अंदाजानुसार या देशांमध्ये कापूस वापर गेल्या वर्षी एवढा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व परिस्थिती गृहीत धरूनच सध्या हे बाजारभाव आहेत. उद्या या देशांची मागणी आपल्यानंतर सहाजिकच कापूस दरालाही आधार मिळेल.
दुसरे म्हणजे कॉटन कापडापेक्षा मानवनिर्मित पॉलिस्टरसारख्या कापडाला जास्त मागणी आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर याचा परिणाम होणार, अशाही चर्चा आहे. हे काही आताच घडत नाही. ही परिस्थिती मागील ३ वर्षांपासून आहे. हा घटक पहिल्यांदाच बाजारावर परिणाम करत नाही. अशी परिस्थिती आहे हे गृहीत धरूनच बाजार चालत आहे. त्यामुळे ही परिस्थिती नव्याने निर्माण झाली असे नाही.
या सर्व परिस्थितीमुळे देशातील बाजारात सकारात्मक घडामोडी घडण्यास अनुकूल वातावरण आहे. पण शेतकऱ्यांना दोन वर्षापूर्वी आलेल्या तेजीची जी अपेक्षा आहे ती मात्र दिसत नाही. कापूस दरात जानेवारीनंतर सुधारणा अपेक्षित आहे. कापूस बाजार ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या पातळीत पोचण्याचा अंदाज आहे. मात्र शेतकरी जी अपेक्षा बोलून दाखवत आहेत ९ हजार, १० हजार भाव यंदा दिसणार नाही, याची दाट शक्यता आहे. पण शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावात कापसाची विक्री करू नये.
आवकेचा दबाव असल्याने खुल्या बाजारात भाव कमी आहेत. पण विक्रीसाठी सीसीआयचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विकावा. यामुळे किमान हमीभाव मिळेल. जे शेतकरी थांबू शकतात त्यांनी थांबायला हरकत नाही. मात्र आपला माल टप्प्याटप्प्याने गरजेप्रणाने विकावा. वेगवेगळ्या टप्प्यात माल विकल्यानंतर बाजारात ज्या अनपेक्षित घडामोडी घडतात त्यामुळे होणारे नुकसान टळते आणि एक एक चांगला सरासरी भाव पदरात पडू शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचा भाव दबावातच आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भाव सध्या कमी आहेत. पण या देशांमध्ये कापसाचा वापर होत नसल्यात जमा आहे. त्यांना जे उत्पादन होईल ते निर्यात करायचे आहे. आपले तसे नाही. आपण यंदा आपल्या उत्पादनापेक्षा आयात करून वापर करणार आहोत. जेव्हा या कापूस निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या देशात नवा माल बाजारात येतो तेव्हा त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर होतच असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात असताना आणि देशात कापूस आवक शिगेला पोचलेली असताना आपल्याकडे बाजारभाव सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
(लेखक अॅग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमडिया कन्टेन्ट प्रोड्यूसर (मार्केट इन्टेलिजन्स) आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.