Jalgaon News : उष्णतेच्या लाटेत कमी झालेली खानदेशातील पपईची आवक मागील काही दिवसांत काहीशी वाढली आहे. पपईचे दर सध्या शेतकऱ्यांना जागेवर १२ ते १५ रुपये प्रतिकिलो मिळत आहेत.
पपई उष्णतेत सेवन करणे ग्राहक टाळतात. थंड प्रदेशात याची मागणी असते. अर्थात खानदेशात ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपईची आवक जोमात असते. यंदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेरीस प्रतिदिन सरासरी ८० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) एवढी पपईची आवक होती.
या काळात प्रतिकिलो सरासरी ११ रुपये प्रतिकिलोचा दर थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला. डिसेंबर ते फेब्रुवारीअखेरीस प्रतिदिन सरासरी १२० ट्रक पपईची आवक होती. या काळात दर कमी-अधिक झाले. डिसेंबरमध्ये दर दबावात होते. कारण, या काळात आवक अधिक होती. परंतु जानेवारीच्या मध्यानंतर आवक कमी झाली. ती फेब्रुवारीतही कमीच होती. यामुळे या दरम्यान दर स्थिर होते.
यंदा मार्चमध्येही फारशी उष्णता खानदेशात नव्हती. यामुळे पपईला मार्चमध्येही उठाव होता. परंतु त्यावेळी पीक हवे तसे उत्पादनक्षम राहिले नाही. फक्त काही वाणांचे पीक उत्पादनक्षम होते. या क्षेत्रातून आवक सुरू होती. मार्चमध्ये प्रतिदिन सरासरी ४० ट्रक पपईची आवक खानदेशात झाली. पण एप्रिलमध्ये आवक आणखी घटली. मे महिन्यातही प्रतिदिन सहा ते सात ट्रक आवक होत होती. या महिन्यातील आवक तीन ट्रक एवढीच दिसत आहे.
पपईचे दर मार्चमध्ये सात रुपये प्रतिकिलो सरासरी राहिले. एप्रिलमध्ये दर कमी झाले. मे ते जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत प्रतिदिन नऊ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) पपईची आवक होती. त्यात वाढ दिसत नाही. सध्या आगाप लागवडीच्या व दीर्घ काळ उत्पादन देणाऱ्या बागांमधून आवक सुरू असून, पाठवणूक दिल्ली, पंजाब येथे केली जात आहे. दरही स्थिर आहे.
उत्तरेकडूनही मागणी
उत्तरेकडील पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्ली, काश्मीर आदी भागांत खानदेशातून पपईची पाठवणूक केली जाते. मागील १० ते १२ दिवसांत उत्तरेकडे पाठवणूक रखडत सुरू आहे. कारण आवक कमी व मागणीही कमीच आहे. राज्यात नागपूर, मुंबई येथेही काही प्रमाणात पपईची पाठवणूक अधून-मधून केली जाते, अशी माहिती मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.