Onion Market Update नाशिक : यंदा जानेवारी अखेरपासून कांद्याने शेतकऱ्यांना रडविले आहे. उत्पादन खर्चाच्या खाली दर (Onion Rate) मिळत असल्याने आर्थिक गणिते कोलमडली आहेत.
शासनाचे अनुदान (Onion Rate) मिळविण्यासाठी कांदा विक्री करण्याची शुक्रवारी (ता.३१) अंतिम मुदत होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस आणला.
त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेत अवघ्या २५ पैशांची बोली प्रतिकिलो कांद्यास लावली. त्यामुळे दिलासा तर दूरच मात्र शेतकऱ्यांची मोठी लूट करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची थट्टाच केली.
कांदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा रोष पाहता अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ मार्च रोजी केली. त्यानंतर अनुदान देण्यासंबंधी २७ मार्च रोजी शासन निर्णय आला. त्यामध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान कांदा विक्रीची मुदत देण्यात आली .त्यानंतर अवघे ४ दिवस शिल्लक असताना कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. मात्र त्याचा फायदा व्यापाऱ्यांनीच घेतला आहे.
एकीकडे कांद्याला भाव नसल्याने अनुदानाची रक्कम पदरी पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात शिल्लक कांदा बाजारात विक्रीची घाई केली. त्यामुळे २८ ते ३१ मार्च दरम्यान बाजार समित्यांमध्ये आवक वाढली. मात्र शेतकरी दराची अपेक्षा करत असताना व्यापारी त्यावर टपूनच होते.
त्यांनी संधी साधून पडत्या दराने खरेदी करून शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेतला आहे. नांदगाव येथे अवघा २५ पैसे, सटाणा व सिन्नर येथे ५० पैसे, तर करंजाड, येवला आणि कळवण येथे १ रुपया प्रतिकिलो असा मातीमोल किमान दर कांद्यास मिळाला.
हा प्रकार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीतून समोर आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात मिळालेला सरासरी दर ४ ते ६ रुपये प्रति किलो होता.
एकीकडे कांद्याचा उत्पादन खर्च प्रतिकिलो १२ ते १४ रुपये येत आहे. त्यामुळे मिळणाऱ्या दराची स्थिती खर्चाच्या निम्म्यापेक्षा कमी आहे. मिळणारी अनुदानाची रक्कम व मिळालेला दर एकत्र बेरीज करूनही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघू शकणार नाही, अशी स्थिती आहे.
एकीकडे रद्दीला चांगला भाव आहे; मात्र शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या कांद्याला भाव नाही, अशी वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दर ठरविण्याची कुठलीही यंत्रणा नसल्याने खुल्या लिलावाच्या नावाखाली दर पाडून व्यापाऱ्यांनी लूट केली, असा संताप शेतकऱ्यांमध्ये आहे.
बाजार समित्यांमधील आवक, दर स्थिती
बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी
लासलगाव...१६,२२८...३००...८००...६५१
पिंपळगाव बसवंत...१७,९७१...२००...८२५...६५०
येवला...९,५९८...१००...६०१...४००
चांदवड...१९,०००...२००...८०२...५५०
नांदगांव...५६,८२७...२५...८५०...४५०
उमराणे...६५,३००...३५१...७६०...६५०
सिन्नर...१०,३२९...५०...७८६...५००
नांदूर शिंगोटे (उपबाजार)...२३,९५०...१५०...१०००...६५०
देवळा...५५,०००...२००...६००...४००
करंजाड उपबाजार (नामपूर)...१५,०००...१००...७९०...६००
मनमाड...२३,०००...२००...७१९...५५०
नाशिक...३,१९२...३५०...८५१...६००
सटाणा...९,४५०...५०...७५०...५६५
कळवण...६,९००...१००...७१०...४५०
शासन निर्णय जाहीर करण्याची वेळ चुकली?
शासनाने २७ मार्च रोजी कांदा अनुदान देण्यासंबंधी अटी-शर्ती जाहीर केल्या. मात्र पुढे लाभ घेण्यासाठी चार दिवस विक्रीची मुदत शिल्लक होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकदाच गर्दी केली. या परिस्थितीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मातीमोल दराने खरेदी केली. त्यामुळे शासन निर्णय जाहीर करण्याची वेळ चुकली का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मार्चअखेर बाजार समित्यांमधील स्थिती
- उमराणे, नांदगाव, देवळा येथे कांद्याची विक्रमी आवक
- नांदगाव येथे २५ तर सटाणा येथे अवघा ५० पैसे प्रतिकिलो किमान दर
- खुल्या लिलावात मनमानी बोली लावून व्यापाऱ्यांकडून खरेदी
- मुंगसे येथे लिलाव बंद असल्याने शेजारच्या बाजार आवारात गर्दी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.