Pune News : जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने खरिपातील कांदा लागवड घटली होती. पण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कांदा उत्पादक भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याने कांदा लागवडींनाही वेग आला.
कर्नाटकातील काही भागांमध्ये कांदा लागवडीला जास्त उशीर होत असल्याने काढणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होऊ शकते. परिणामी बाजारातील आवक मर्यादीत राहून कांदा दराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सध्या देशातील बाजारात कांदा आवक घटली आहे. आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये २४ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर सरासरी दर १ हजार ४०० रुपयांवर पोचला. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात या बाजारातील सरासरी भाव ८०० रुपये होता.
खरिपातील लागवडींवर यंदा कमी पाऊसमानाचा परिणाम जाणवत होता. पण मागील आठवडाभरात देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक पट्ट्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कांदा लागवडीने वेग घेतला.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात १४ जुलैपर्यंत ३२ हजार हेक्टवर कांदा लागवड झाली. मागील हंगामात याच काळातील लागवड ३६ हजार हेक्टरवर होती. यंदा सरकारने खरिपात ३ लाख ४१ हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दीष्ट ठेवले आहे. मागील हंगामात ३ लाख २९ हजार हेक्टरवर लागवड झाली होती.
कर्नाटकात चित्रदुर्ग भागात कांदा लागवड जास्त होते. यंदा सरकारने या भागात २६ हजार हेक्टरवर कांदा लागवडीचे उद्दीष्ट ठेवले होते. तर आतापर्यंत १३ हजार हेक्टरवर लागवड झाली. आता सर्वच भागात पाऊस झाल्याने लागवड वेगाने सुरु आहे. उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कूरनूल भागात लागवडी सुरु झाल्या.
त्यामुळे ऑगस्टच्या मध्यापर्यंत लागवड आणखी वाढेल. पण पाऊसमान कसे राहते यावर उत्पादन अवलंबून आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कांदा पिकाला पावसाचा फटका बसत आहे.
महाराष्ट्रातही महत्वाच्या कांदा उत्पादक भागात पाऊस झाल्याने लागवडीला वेग आला. खरिपातील लागवडी सुरु झाल्या तरी राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामातील माल आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपातील लागवडीसाठी रब्बीतील कांदा विकला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात अद्यापही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दर नाहीत.
मागील हंगामातही शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. त्यामुळे रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी इतर पिकांना पसंती दिली. तसेच पावसामुळे कांद्याचे नुकसानही झाले. परिणामी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कांद्याची टंचाई जाणवू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.