
Pune Fruit Market : सध्या पावसाळी हंगाम सुरू आहे. उन्हाळ्यात यंदा तापमानात मोठी वाढ झाली होती. तर मागील महिन्यात पूर्वहंगामी पावसाने मोठे नुकसानही केले. या पार्श्वभूमीवर पुणे- गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार समितीमध्ये फळांची आवक तुलनेने कमी आहे. मात्र मागणी चांगली असून दरांत वाढ झाली आहे.
पपईला वाढतेय मागणी
पपईला तुलनेने मोठी मागणी व दररोज २० ते २५ टन आवक आहे. पुणे जिल्हा, कर्नाटकातील गुलबर्गा, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांतून पपई पुणे मार्केटला येत आहे. उन्हाळ्याचा मार्च ते मे हा कालावधी वगळता पपईला तशी वर्षभर चांगली मागणी असते. थंडीच्या कालावधीत अधिक उठाव होतो. त्या वेळी दरांतही चांगली वाढ असते.
तैवान पपईच्या तुलनेत पंधरा नंबरच्या वाणाला प्रति किलो ८ ते १५ रुपये दर मिळतो आहे. येत्या काळात हा दर २५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या वाणाची पपई आकाराने लांब, गोडी जास्त, लवकर पक्व होणारी आहे. पांढऱ्या कागदी पॅकिंगमधील आकर्षक पपईस ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे व्यापारी राम कुलकर्णी यांनी सांगितले. सणांच्या कालावधीत पपईत दररोज दहा ते पंधरा लाखांची उलाढाल होते.
जांभूळ खातेय भाव
मार्केटमध्ये जांभूळही सध्या भाव खाते आहे. मेमधील पावसामुळे त्यास फटका बसला. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आवक कमी आहे. सध्या अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, इंदापूर, तर परराज्यांत गुजरातमधून काही प्रमाणात जांभूळ बाजारात येत आहे. दररोज २० ते २५ टन क्रेट (प्रति १८ ते २५ किलोचे) आवक आहे.
हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात असून, पावसाच्या स्थितीनुसार १५ दिवस ते एक महिना तो सुरू राहील. क्रेटमधील सुट्या जांभळाला प्रति किलो ५० ते ६० रुपये दर आहे. येत्या काळात आवकेनुसार दर वाढण्याची शक्यता असून, ते १२० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. पॅकिंगमधील जांभळाला प्रति किलो १५० ते २५० रुपये दर मिळतो.
बहाडोली, गिलोरी आणि काडी जांभूळ (गावरान) असे जांभळाचे प्रकार आहेत. यात बहाडोलीला सर्वाधिक मागणी असते. गराचे अधिक प्रमाण, चवीला गोड, आकाराने मोठे, चांगली चकाकी या वैशिष्ट्यांमुळे दर चांगला मिळतो.
जांभळाला किरकोळ ग्राहकांपेक्षा प्रक्रिया उत्पादकांकडून अधिक मागणी असते. त्यामुळे दररोज २० लाखांच्या आसपास उलाढाल होत असावी. जांभळाची प्रक्रियायुक्त उत्पादने परराज्यात व परदेशात पाठवत असल्याची माहिती व्यापारी गणेश घुले यांनी दिली.
ड्रॅगन फ्रूट व सीताफळ
ग्राहकांकडून ड्रॅगन फ्रूटला चांगली पसंती आहे. बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, राजगुरुनगरसह अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातून मिळून दररोज सुमारे ५०० क्रेट आवक आहे. प्रति किलो ५० ते ११० रुपये दर आहे. येत्या काळात आवक वाढण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये दररोज सुमारे १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल त्यातून होते.
मॉन्सूनपूर्व पाऊस व उन्हाळ्यातील तापमान यांचा परिणाम यंदा सीताफळालाही बसला. परिणामी कमी म्हणजे दररोज ३०० -३५० क्रेट आवक आहे. आवकेतील ए ग्रेडच्या फळांचे वजन २०० ते ४०० ग्रॅम असते. गरांचे प्रमाण चांगले असून टिकवण क्षमता अधिक असते.
रबडीसाठी सीताफळाला सर्वाधिक मागणी प्रक्रिया व्यावसायिकांकडून असते. जून ते डिसेंबरपर्यंत फळाचा हंगाम असतो. जून- ऑगस्टमध्ये चांगले दर असतात. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आवक वाढून काही प्रमाणात दर घसरतात. दिवाळीनंतर पुढील बहरातील आवक सुरू होते.
डिसेंबर अखेरीस दर चांगले वाढलेले दिसतात असे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले. गावरान प्रति किलो ४० ते ३०० पर्यंत, तर गोल्डन २० ते १०० रुपयांपर्यंत व सरासरी ८० रुपये असे दर सध्या आहेत. हंगामात रोजची आवक २५ ते ३० टन असून हंगामात काही कोटी रुपये उलाढाल होते.\
पेरूची आवक, मागणी
पेरूचे यंदा उत्पादन कमी मात्र मागणी चांगली असल्याने दरांमध्ये किलोला पाच ते दहा रुपयांची वाढ आहे. सध्या दररोज २० ते २५ हजार क्रेट आवक असून, येत्या काळात मागणी व दरांतही वाढीची शक्यता आहे. सप्टेंबरनंतर पुणे जिल्ह्यातील पेरूची आवक कमी होते. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, श्रीरामपूर व कोपरगाव भागातून आवक सुरू होते.
त्यामुळे पुणे मार्केटमध्ये पेरू वर्षभर सुरू असतो. मार्केटमध्ये दररोज सुमारे १० ते १५ लाख रुपयांची उलाढाल त्यातून होत असावी. जून ते डिसेंबर हा पेरूच मुख्य हंगाम असतो. यात आँगस्ट ते नोव्हेबर कालावधीत जास्त आवक असते.
लोणावळा, खोपोली भागात पर्यटनाला चांगली चालना मिळाल्याने या भागातील ४० ते ५० किरकोळ विक्रेते पुणे मार्केटमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात पेरूची खरेदी करतात असे व्यापारी के. डी. चौधरी यांनी सांगितले. तैवान पिंक, जे विलास व अन्य प्रकारांनुसार किलोला १५ ते ४० ते ८० रुपये व लखनौ ४९ पेरूस २५० ते ५०० रुपये प्रति २० किलो क्रेट असे दर आहेत.
राम कुलकर्णी ९८२२८५५०८७
(व्यापारी, पुणे बाजार समिती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.