Market Trend : देशातील बाजारात हळदीच्या दरातील तेजी वाढत आहे. हळदीच्या दराने वायद्यांमध्ये १२ हजारांचा टप्पा पार केल्यानंतर बाजार समित्यांमध्येही १० हजारांची पातळी पार केली. हळदीला मागणी चांगली असून पुरवठा मात्र कमी आहे. हळद बाजारातील ही तेजी पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशातील महत्वाच्या बाजारांमधील हळदीची आवक कमी आहे. त्यातच मागणी चांगली असल्याचा आधार बाजाराला मिळत आहे. देशात यंदा हळदीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या बाजाराला मजबूती मिळाली. बाजारातील आवकही सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तर स्टाॅकमधील मालही कमी झाला. त्यामुळे हळदीच्या तेजीला आधार मिळत आहे.
चालू हंगामात महाराष्ट्रात १० ते २० टक्क्यांनी लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूतील लागवड १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लागवडही १८ ते २२ टक्क्यानी घटण्याची शक्यता आहे. मसाला बोर्डाच्या अंदाजानुसार, देशात १३ लाख ३० हजार टन हळद उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.
हळद निर्यतीचा विचार करता देशातील हळद निर्यात मागील तीन महिन्यांमध्ये जवळपास ४० टक्क्यांनी वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारातच हळदीचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे हळदीला आंतरराष्ट्रीय बाजारातच जास्त मागणी आहे. परिणामी भारतातून निर्यात वाढत आहे. याचा देशांतर्गत बाजारात हळदीला आधार मिळत आहे.
हळदीच्या वायद्यांमध्ये आज ७०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. हळदीचे ऑगस्टचे वायदे आज १२ हजार १५० रुपयांवर होते. तर ऑक्टोबरचे वायदे १२ हजार ७९२ हजार रुपये प्रतिक्विंटलवर होते. डिसेंबरचे वायदे १२ हजार ८२६ रुपयांवर होते. हळदीच्या वायद्यांनी तब्बल ११ वर्षांनंतर १२ हजारांचा टप्पा गाठला. यापुर्वी २०१२ मध्ये हळदीच्या वायद्यांनी ही पातळी पार केली होती.
बाजार समित्यांमधील दराचा विचार करता सर्वाधिक भाव १५ हजार रुपयांचा होता. पण हा भाव मुंबई बाजारात एका लाॅटला मिळाला. सांगली बाजारातही याचदरम्यान कमाल भावपातळी पाहायला मिळाली. बाजारातील सरासरी भाव १० हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यानच राहीला. बाजारातील आवकही कमीच होती. देशातील एकूणच स्थिती पहता पुढील ४ ते ५ महिने हळद बाजारातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे हळद बाजारातील जाणकारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.