
Cumin Price : यंदा जिरा चांगलाच भाव खात आहे. सध्या देशात जिऱ्याचा स्टाॅक खूपच कमी आहे. तर देशांतर्गत आणि निर्यातीसाठी जिऱ्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून आहे. आज वायद्यांमध्ये जिऱ्याने ५७ हजारांचा टप्पा पार केला. तर बाजारांमध्ये जिऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
मागील दोन आठवड्यांमध्ये राजस्थानमधील जिरा उत्पादक महत्वाच्या अलवर, जैसलमेर, जयपूर, बिकानेर, भीलवाडा आणि बाडमेर या राज्यांमध्ये पाऊस झाला. तसेच गुजरातमधील जिरा उत्पादक भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली. याचा जिरा पिकाला फटका बसला. उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे. तर गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जिऱ्याचे भाव तेजीत आहेत.
देशात यंदा जिऱ्याची मागणी ४ लाख ५० हजार ते ५ लाख टनांपर्यंत राहू शकते. तर यंदा जिऱ्याचा पुरवठा साडेतीन ते चार लाख टनांपर्यंत होऊ शकतो, असा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे जिऱ्याचे भाव राजस्थान आणि गुजरातमधील महत्वाच्या बाजारांमध्ये सरासरी ५५ हजार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. काही व्यापारी आणि स्टाॅकीस्ट नफावसुली करत असल्याने दरात दोन ते तीन हजारांचे चढ उतार येतात. पण बाजार गेल्या महिनाभरापासून ५० हजारांपेक्षा जास्त आहे.
यंदा देशातील उत्पादन घटले. सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर जिरा उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी झाले. त्यामुळे भारताकडे मागणी आहे. पण देशातही पुरवठा कमी असल्याने जिऱ्याचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.
सध्या बाजारात जिऱ्याची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे दरात तेजी आहे. बाजारातील आवक गेल्या काही दिवसांपासून दिवसागणिक कमी झाली. त्यातच राजस्थान आणि गुजरातमधील जिरा पिकाची काही प्रमाणात काढणी शिल्लक होती. त्यातच बिपरजाॅय चक्रीवादळामुळे पिकाचे मोठे नुकसान झाल्याने आवकेवर परिणाम झाला. यामुळे दरातील तेजी कायम आहे. पण नवा माल बाजारात आल्यानंतर दरात बदल होऊ शकतो, असा अंदाज गृहीत धरून घाऊक व्यापारी खरेदीत जास्त इच्छूक दिसत नाहीत. यामुळे दरात काहीसे चढ उतारही दिसत आहेत.
……………….
आजचे वायदे कसे राहीले?
आजच्या बाजाराचा विचार करता जिऱ्याचे वायदे आज चांगलेच वाढले. एनसीडीईएक्सवर ऑगस्टचे वायदे ५९५ रुपयांनी वाढले होते. ऑगस्टचे वायदे ५७ हजार ३०५ रुपयांवर पोचले. तर ऑक्टोबरचे वायदे ९०५ रुपयांनी वाढून ५७ हजार ८३० रुपयांचा टप्पा गाठला. वायद्यांमध्ये वाढ दिसली पण स्पाॅट खरेदीत जिरा स्थिर होता. एनसीडीईएक्सच्या उंझा केंद्रावर आज ५८ हजार ८७६ रुपयांनी जिऱ्याची खरेदी झाली. तर जोधपूर केंद्रावर ५९ हजार ७५० रुपयाने व्यवहार झाले.
बाजारातील भाव काय?
जिरा उत्पादनात महत्वाच्या गुजरातमधील बाजारात सध्या जिऱ्याला सरासरी ५३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. आज उंझा बाजारात २ हजार ३१ क्विंटलची आवक झाली होती. तर सरासरी ५५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. तर गोंडल बाजारात १४६ क्विंटलची आवक होऊन सरासरी ५२ हजार ५०५ रुपयाने व्यवहार पार पडले. राजस्थानमधील जोधपूर बाजारात १४६ क्विंटलची आवक होऊन सरासरी ५० हजार रुपये भाव मिळाला. मेरता येथे १९५ क्विंटलची आवक होऊन ४९ हजार रुपये प्रतिक्विंटलने व्यवहार झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.