
Buldhana News : बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत गणल्या जाणाऱ्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी या बाजार समितीत तूर सरासरी १० हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. तुरीच्या दरात सुधारणेचा कल दिसून येत आहे.
बाजार समितीत सोमवारी (ता. १४) ५० क्विंटल तूर ११ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. तर २३० क्विंटल तुरीला सरासरी १० हजार ७०० रुपयांचा दर मिळाला. बाजारात सुमारे ३५५ क्विंटल तुरीची आवक त्या दिवशी झाली होती. यंदाच्या हंगामात लागवड झालेले तुरीचे पीक बऱ्याच भागात वाळून गेले आहे. हंगामाच्या प्रारंभीच हा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या हंगामात तुरीचे उत्पादन कमी राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आता बाजारात विक्रीला येत असलेली तूर यामुळेही भाव खात आहे. गेले काही दिवस तुरीचा दर स्थिरावत होता. परंतु आता सोमवारी (ता. १४) मिळालेल्या दरांचा कल पाहता तुरीचा दर वाढण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
या बाजार समितीत सोयाबीनची आवक सध्या ५०० क्विंटलच्या आत होत आहे. सोमवारी ३४३ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते. सोयाबीनला सरासरी ४७४५ रुपयांचा दर मिळाला. कमाल दर ४८३० रुपये तर किमान दर ४२०० रुपयांपर्यंत होता. तिळाची आवक तीन क्विटंल झाली. १५००० रुपये सरासरी दराने तिळाची विक्री झाली.
मूग, उडदाची जेमतेम आवक होत आहे. नवीन माल यायला अद्याप विलंब आहे. विक्रीसाठी आलेला मूग कमाल ६७०० व किमान ५२१० रुपये विकला. उडदाला ५२०० रुपयांचा दर होता. ज्वारीची कमाल ३१०० व किमान २०८० रुपये प्रतिक्विंटलने विक्री झाली. मक्याची आवकही बाजारात ३०० क्विंटलपेक्षा अधिक होती. मक्याला कमाल २१५० व किमान १९०० रुपयांचा दर मिळाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.