
तुरीच्या दरात सुधारणा
1. यंदा देशात सुरूवातीच्या टप्प्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे तुरीची लागवड उशिरा झाली. त्यामुळं तुरीचा हंगाम यंदा काहीसा उशिरानं सुरु होण्याची शक्यता आहे. त्यातच सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तुरीची उत्पादकता कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. परिणामी तुरीच्या दरात मागील दोन आठवड्यांमध्ये क्विंटलमागे पाचशे रुपयांची सुधारणा झाली. तुरीला सध्या प्रति क्विंटल ७ हजार २०० ते ७ हजार ९०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
गाजराचे दर तेजीत
2. राज्यातील बाजारात सध्या गाजराचे दर तेजीत आहेत. बाजारातील आवक घटल्यानं गाजराचे दर वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर बाजारात गाजराची ५०० क्विंटलपेक्षा अधिक आवक होतेय. मात्र इतर बाजारांमधील आवक ही ५० क्विंटलच्या दरम्यान आहे. मात्र गाजराची मागणी टिकून आहे. त्यामुळं दरात वाढ झालीय. सध्या गाजराला २५०० रुपये ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. गाजराचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
झेंडूला मिळतोय चांगला दर
3. नवरात्रीमुळे फुलांना उठाव मिळतोय. यापूर्वी गणपती उत्सवात फुलांना चांगला दर मिळाला होता. आता नवरात्रीमुळं फुलांची मागणी वाढली आहे. नवरात्रीसाठी बाजारात झेंडूची आवक होतेय. मात्र नुकत्याच झालेल्या पावसानं झेंडूच्या फुलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं झेंडूची आवक मर्यादीत होतेय. सध्या झेंडूला प्रतिक्विंटल ४ हजार ते ७ हजार रुपयांचा दर मिळतोय. दसऱ्याच्या काळात झेंडूला मागणी वाढून दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज फूल व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
साखर दर सुधारण्याची शक्यता
4. राज्यातील उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहे. म्हणजेच यंदाच्या हंगामातील साखर बाजारात येण्यास पंधरा दिवस उशीर होईल. त्यामुळं कारखान्यांना शिलल्क साखर सध्याच्या दरानं विकण्यास वेळ मिळेल. मिठाई उद्योगाकडून दिवाळीसाठी अद्याप पूर्ण क्षमतेने साखर खरेदी सुरू झालेली नाही. ही खरेदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून होऊ शकते. सध्या साखरेला ३३१० ते ३३५० रुपये दर आहेत. काही कारखान्यांना ३३७० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे. तर १५ ऑक्टोबरपर्यंत तरी साखरेचे दर प्रितक्विंटल ३४०० रुपयांच्या आसपास राहू शकतात, असे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितलं.
सोयाबीन दर सुधारतील का?
5. देशासह राज्यात काही ठिकाणी सोयाबीनची काढणी (Soybean Harvesting) सुरु झाली. मात्र सोयाबीनचा हंगाम (Soybean Season) यंदा उशिरा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) राज्यांमधील अनेक भागांत जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. परिणामी सोयाबीनच्या पेरण्या (Soybean Sowing) सरासरी १५ दिवस उशिरा झाल्या. त्यामुळं सोयाबीनचा हंगामातही यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरु न होता १५ दिवस उशिरा सुरु होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात काही भागांमध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक, रसशोषक कीड आणि मूळ कूजचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.
त्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगाने यंदा सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केलाय त्यामुळं दरही नरमलेले आहेत. मागील दीड महिन्यापासून सोयाबीनचे दर सरासरी ५ हजार रुपयांच्या आसपास आहेत. किमान दर ४ हजार ८०० रुपये तर कमाल दर ५ हजार ४०० रुपयांपर्यंत मिळत आहे. उद्योगाकडून सध्या उत्पादनवाढीचा अंदाज दिला जात असला तरी त्यावर कितपत विश्वास ठेवावा, याबद्दल शंका व्यक्यत होत आहेत.
कारण पिकाचं होणारं नुकसान त्यात गृहीत धरलेलं नाही. मागील पाच वर्षांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणि कीड-रोगानं सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. यंदाही असंच घडतंय. यंदाही परिस्थिती थोड्याफार फरकाने तशीच आहे. त्यामुळे सोयाबीनला किमान ५ हजार ते ५ हजार ७०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.