

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारपासून सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये नरमाई आली. सोयाबीनचे वायदे आज दुपारी १४.०५ डाॅलरवर आले होते. तर सोयापेंडचे वायदे ४०० डाॅलरवर होते. देशातील बाजारात सोयाबीन आजही स्थिर राहीले.
सोयाबीनचा भाव ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील सोयाबीनचा मागणी आणि पुरवठा बघता बाजार स्थिर राहू शकतो, पण आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे चढ उतार झाल्यास देशातील बाजारातही बदल दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
२) कापसावरील दबाव कायम (Cotton Rate)
देशातील बाजारात कापूस बाजारावरील दबाव कायम आहे. कापसाचे भाव आजही ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच अनेक भागात खरिपातील लागवडीही सुरु झाल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदेही कमी झाले.
कापसाचे वायदे आज ७८.३४ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील वायद्यांमध्येही चढ उतार सुरु आहेत. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) हिरवी मिरची तेजीतच (Green Chilli Rate)
बाजारातील हिरव्या मिरचीची आवक अद्यपाही कमीच आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात मोठी तेजी आली आहे. महत्वाच्या पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली त्यामुळे नव्या लागवडी घटल्या.
परिणामी सध्या हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीच्या दारातील तेजी पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) हरभरा बाजार दबावात (Chana Rate)
देशात सध्या हरभरा बाजार दबावातच आहे. हरभऱ्याची बाजारातील आवक कमी झाली तरी दराला आधार मिळत नाही. हरभरा बाजार आजही प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होता. त्यातच सरकार मागील तीन वर्षांमधील हरभरा विकायला काढत आहे. त्यामुळे दरावर दबाव येत आहे.
गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मागणी आहे. पण भाव अपेक्षित नाहीत. तसेच हरभरा बाजारावर सरकारच्या विक्रीचा दबाव राहील, असे अभ्यासकांनी सांगितले.
५) पुढील काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? (Tur Rate)
तुरीच्या दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र तुरीच्या दराची सरासरी पातळी काहीशी स्थिर दिसते. तुरीचा कमाल भाव मागील महिनाभर १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. यामुळे या भावात नफावसुलीसाठी विक्री होत आहे.
परिणामी भावात २०० रुपयांपर्यंत चढ उतार दिसत आहेत. म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीच्या भावातही क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयांची नरमाई दिसून येत आहे. नफावसुलीसाठी विक्री होत असल्याने बाजारात मागील आठवडाभरात तुरीची उपलब्धताही काहीशी वाढलेली दिसते.
तसेच खरिपातील लागवडीची गतीही मागील चार दिवसांपासून वाढली. याचाही परिणाम बाजारावर काही प्रमाणत दिसत आहे. पण तुरीच्या भावात जास्त नरमाई येण्याची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे.
तर तुरीच्या डाळीने बहुतेक बाजारांमध्ये आता १४० रुपयांच्या पुढेल गेल्या आहेत. सरकार तूर डाळीच्या भावावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी स्थिर आहे. पण बाजारात पुरवठा वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुरीचे बाजारभाव टिकून राहण्याचा अंदाज आहे, असे जाणकारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.