Market Bulletin :
सोयाबीनमध्ये घट
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई घट कायम आहे. भावात चढ उतार होत आहेत. सोयाबीनसह सोयापेंडचे भाव काहीसे वाढले तरी भाव दबावातच आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.२२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहिशी नरमाई आली होती. बाजारात नव्या मालाची आवक सुरु झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज ४ हजार ५५० ते ४ हजार ६५० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमधील व्यवहार ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांनी झाले. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
कापसात नरमाई
कापसाच्या भावातील चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज भाव काहिसे कमी झाले होते तर देशातील बाजारात भाव काहिसे वाढळे होते. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कमी होऊन वायदे ७२.६६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे ५६ हजार ८५० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत. देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव ७ हजार ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावातही चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांदा स्थिर
कांद्याचे भाव मागील दोन दिवसांपासून बहुतांशी बाजारांमध्ये स्थिर दिसत आहेत. वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे. तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात चढ उतार दिसत आहेत. कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहिशी नरमाई आली होती. कांद्याचे भाव आज ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तिळाचे भाव नरमले
तिळाच्या भावात मागील काही दिवसांमध्ये अनेक बाजारात काहिशी नरमाई दिसून आली. देशातील काही भागांमध्ये बाजारात तिळाची आवक वाढत आहे. त्यातच सध्या तिळाला उठाव कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे तिळाच्या भावावर काहिसा दबाव दिसून येत आहे. सध्या तिळाला बाजारात सरासरी ११ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील काळात तिळाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे, असे तीळ बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
टोमॅटोच्या दरात सुधारणा
टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा फटका दिला. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली. मात्र दुसरीकडे टोमॅटोला उठाव कायम आहे. त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली. आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव दिसून आला. बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.