देशी तुरीचे दर वाढणार
1. तुरीचे दर सध्या तेजीत आहेत. देशात तुरीची टंचाई दिवसेंदिवस वाढतेय. तर दुसरीकडं सणांमुळं मागणीही वाढत आहे. त्यामुळे तुरीचे दर वाढले आहेत. तुरीचे दर प्रति क्विंटल ८ हजार ३०० रुपयांवर गेल्यावर मागणी कमी होतेय. तर ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान तुरीला मागणी आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यांपासून दर या भावपातळीच्या आसपास आहेत. मात्र देशी तुरीच्या दराने पुन्हा ८ हजारांचा टप्पा गाठलाय. देशी तुरीचे दर पुढील काही दिवसांमध्ये ८ हजार ३०० रुपयांपर्यंत वाढू शकतात, अशी माहिती जाणकारांनी दिलीये.
ब्राॅयलर कोंबडीला मिळतोय चांगला दर
2. पोल्ट्री उद्योग गेले काही महिने वाढलेलं उत्पादन आणि कमी उठाव यामुळं अडचणीत होता. श्रावण आणि गणेशोत्सावामुळं चिकन आणि अंड्यांना मागणी नव्हती. पक्ष्यांचं वजन वाढलं. त्यामुळे एकीकडे उत्पादन खर्च वाढला तर दुसरीकडे दर घसरला. जिवंत पक्ष्याचा उत्पादन खर्च सरासरी प्रतिकिलो ९० रुपये असताना दर ६० रुपयांपर्यंत घसरले होते. त्यामुळं पोल्ट्री उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र आता चिकनला मागणी वाढली. तसंच पुरवठाही मर्यादीत होतोय. त्यामुळं जिवंत पक्ष्याचा दर वाढून १२५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचलाय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज पोल्ट्री उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
मटारचे दर टिकून राहणार
3. राज्यात सध्या मटारचे दर तेजीत आहेत. बाजारातील घटलेली आवक आणि स्थिर मागणी यामुळं मटारच्या दरात तेजी आल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. राज्यातील पुणे आणि मुंबई बाजार समितीमध्येच २०० क्विंटलच्यावर मटारची आवक होत आहे. तर इतर बाजारांमधील सरासरी आवक ही ३० क्विंटलपेक्षाही कमी होतेय. परिणामी मटारला चांगला उठाव मिळतोय. सध्या मटारला सरासरी ६ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. बाजारात आवक वाढेपर्यंत हा दर टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
नव्या हंगामात साखर निर्यात गरजेची
4. देशात सध्या साखरेला चांगला दर मिळतोय. विविध राज्यांतील साखरेचे दर प्रति क्विंटल ३ हजार २०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. ऊस गाळपाचा नवा हंगाम अगदी तोंडावर आहे. मात्र राज्यात गेल्या हंगामातील ३० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. नव्या उत्पादनानंतर एकूण साखर उपलब्धता १६८ लाख टनापर्यंत राहील. त्यामुळे इथेनॉलसासाठी किमान १२ लाख टन साखर वळवून ६० लाख टन साखरेची निर्यात करण्याचे आव्हान राज्यासमोर असेल. निर्यात झाल्यानंतर साखरेचे दर टिकून राहतील, असा अंदाज साखर उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
सोयाबीन दर पुन्हा सावरले
5. देशातील सोयाबीन दर (Domestic Soybean Rate) सध्या एका भावपातळीदरम्यान फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन दरात (Soybean Rate Global Market) चढ-उतार सुरुच आहेत. ऑगस्ट महिन्यात सोयाबीन दरावर (Soybean Rate) काहीसा दबाव आला होता. मात्र अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) घट येण्याचा अंदाज युएसडीएनं व्यक्त केल्यानंतर बाजारात सुधारणा झाली. अमेरिकेतील इंडियानासह इतर तीन राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. यामुळं या राज्यांतील सोयाबीन उत्पादकता कमी राहण्याचा अंदाज आहे. परिणामी उत्पादन घटण्याची होण्याची शक्यता व्यक्त होतेय. मागील आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी युएसडीएचा अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर
सीबाॅटवर सोयाबीनच्या वायद्यांमध्ये जवळपास साडेपाच टक्क्यांची तेजी आली होती. सोयाबीनने १४.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता. मात्र सोमवारनंतर बाजारात पुन्हा नरमाई दिसली. ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या सोयाबीन विक्री दराचाही बाजारावर परिणाम झाला होता. शुक्रवारी सोयाबीन दर १४.३८ डाॅलरपर्यंत नरमले होते. मात्र आज पुन्हा दरात काहीशी वाढ होऊन १४.४९ डाॅलरचा दर सोयाबीननं गाठला. देशातील बाजारातही मागील दोन आठवड्यांपासून सोयाबीन दर प्रतिक्विंटल ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपयांदरम्यान फिरत आहेत. या काळात दरात मोठी नरमाई पाहायला मिळाली नाही. तर तेजीही मर्यादीतच राहिली. देशातील उत्पादनाची स्थिती स्पष्ट होत नाही तोपर्यंत किमान ५ हजार रुपयांच्या दरपातळीवर लक्ष ठेऊन विक्रीचं नियोजन करावं, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.