
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात आज पुन्हा नरमाई दिसून आली. सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १३.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडमध्ये पुन्हा नरमाई येऊन ३९७ डाॅलरवर आले. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे ५० रुपयांचे चढ उतार दिसून येत आहेत. सोयाबीनला आज देशभरात सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपये भाव मिळाला. सोयाबीनच्या भावातील चढ उतार या आठवड्यातही कायम राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत नरमाई दिसून आली. देशातील वायदे दुपारी २०० रुपयांनी कमी होऊन ५९ हजार रुपये प्रतिखंडीवर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांनी आज ८४.२४ सेंट प्रतिपाऊंडची पातळी गाठली होती. देशातील बाजार समित्यांमधील भाव मात्र ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. चालू महिन्यात कापसाच्या भावात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
ज्वारीच्या दरात मागील महिनाभरात चांगली सुधारणा दिसून आली. ज्वारीला सध्या चांगला उठाव असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पण ज्वारीचा पुरवठा मर्यादीत आहे. परिणामी ज्वारीच्या भावात वाढ झाली. सध्या ज्वारीला गुणवत्तेनुसार प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ज्वारीला मागणी कायम राहण्याचा अंदाज असून दरही तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
बाजारात सध्या काही भागांमध्ये पेरुची आवक वाढलेली दिसते. पण पावसामुळे पेरुला कमी उठाव असल्याचं दिसत होतं. यामुळे पेरुचे भावही काहीसे दबावात दिसतात. सध्या पेरूला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये भाव मिळत आहे. पावसामुळे पेरू पिकाला फटकाही बसल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यातच आवक मागणीपेक्षा अधिक दिसते. यामुळे पेरुचे भाव आणखी काही दिवस दबावात दिसू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
देशात सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत. तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशात चालू हंगामात तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. यामुळे पुरवठा कमी राहून दर वाढले. तुरीचा पुरवठा वाढीसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. सरकारने मुक्त तूर आयातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. स्टाॅक लिमिट लावले. बाजारावर बारीक लक्ष ठेऊन आहे. पण देशात पुरवठाच कमी असल्याने बाजारावर फारसा काही परिणाम दिसला नाही. सरकारने देशातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले. पण पावसाने सरकारच्या मनसुब्यावर पाणी फरले. तूर सहा ते सात महिन्याचे पीक आहे. जून महिन्यातील खंड आणि एल निनोची भीती यामुळे लागवड कमी झालेली दिसते. ताज्या आकडेवारीनुसार देशात ३१ लाख ५१ हजार हेक्टरवर तूर लागवड झाली.
सध्याची लागवड १६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे सरकारने तूर आयात वाढीसाठी आता पुन्हा कंबर कसली. आफ्रिकेतील देशांमध्ये चालू महिन्यात तूर काढणी सुरु होईल. मोझांबिक हा महत्वाचा तूर उत्पादक देश आहे. येथील निर्यातदारांनी जास्तीत जास्त तूर भारताला निर्यात करावी, असे आवाहन मोझांबिकमधील भारतीय उच्चायक्तालयाने केले. भारत आणि मोझांबिकमध्ये वर्षाला दोन लाख टन तूर आयातीचा द्विपक्षीय करार झालेला आहे. पण भारत सरकारने आता मात्रात्मक बंधन काढले. त्यामुळे मोझांबिक भारताला कितीही तूर निर्यात करू शकतो. पण तरीही देशातील तूर बाजाराची दिशा देशातील उत्पादनावरच अवलंबून असेल, असे तूर बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.