
1. कापसाच्या वायद्यांमध्ये चालू आठवड्यात मोठी तेजी आली होती. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायद्यांमध्येही कापूस तेजीत बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस विक्रमी ८९.९० सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाला होता. तर देशातील वायद्यांनीही विक्रमी १९६० रुपयांची झेप घेत ६१ हजार ९०० रुपयांवर बंद झाले होते. कापसाला वाढलेली मागणी आणि महत्वाच्या देशांमधील उत्पादनातील घटीच्या अंदाजामुळे कापूस तेजीत आल्याचे जाणकारांनी सांगितले.
2. सोयाबीनच्या बाजारावर अद्यापही दबाव दिसतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. तर देशातील बाजारात सोयाबीन स्थिर दिसते. प्रक्रिया प्लांट्सनी आज ५ हजार २०० रुपयांचा भाव काढला होता. हा भाव कालच्या तुलनेत काहीसा अधिक होता. पण बाजार समित्यांमधील भाव मात्र दबावातच दिसतो. बाजारातील भाव ४ हजार ४०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो. सोयाबीनचा भाव पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
3. ज्वारीचा भाव तेजीत आहेत. देशातील बाजाराता ज्वारीची आवक मागील काही दिवसांपासून सतत कमी होत आहे. पण दुसरीकडे ज्वारीला असेलली मागणी कायम आहे. परिणामी ज्वारीचे भाव तेजीत आहेत. सध्या ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळातही ज्वारीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी दिला.
4. बाजारातील आवक घटल्याने पपईला चांगला भाव मिळत आहे. कमी पाऊस आणि वाढलेल्या उष्णतेचा पपई पिकाला फटका बसत आहे. त्यामुळे पपईची उपलब्धता कमी दिसते. परिणामी पपईला चांगला भाव मिळतोय. पपईला सध्या प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळात बाजारातील पपईची आवक वाढण्याचा अंदाज कमीच आहे. त्यामुळे पपईचे भाव पुढील काळातही याच पातळीच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
5. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यातशुल्क लावल्यानंतर बाजार दबावात आला होता. बाजाराला आधार देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने नाफेडला दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले. पण नाफेडच्या खरेदीला बाजाराला आधार मिळाला नाही. कारण कांद्याचे भाव दबावातच आहेत. कांद्याला सध्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे १ हजार ३०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. सध्या कांद्याचे भाव दबावात असले तरी पुढील काळात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. पुढील काळात बाजारातील कांद्याची आवक कमी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात कांद्याचा मोठा तुटवडा जाणवतो. या चार महिन्यांमध्ये ६० टक्के रब्बीचा कांदा आणि ४० टक्के खरिपाचा कांदा, असा बाजारात पुरवठा होत असतो. पण चाळींमध्ये रब्बीचा कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. एरवी रब्बीचा कांदा ८ ते ९ महिने टिकत असतो. पण यंदा रब्बीच्या कांद्याला पाऊस, अतिउष्णता आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका बसला. यामुळे कांद्याची टिकवणक्षमता कमी झाली. परिणामी सप्टेंबरनंतर रब्बी कांद्याची बाजारातील आवक कमी होत जाणार आहे. पण कांद्याची मागणी कायम राहून भाव तेजीत येऊ शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.