

१) सोयाबीनची आवक वाढली (Soybean Arrival)
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात सुधारणा झाली होती. तर देशातील बाजारात आजही सोयाबीन आवक काहीशी अधिक होती. आज जवळपास २ लाख क्विंटल बाजारात आली होती. मध्य प्रदेशातील आवक सध्या जास्त आहे.
तर या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनची ही भावपातळी आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
२) हरभरा भाव दबावात (Chana Rate)
देशातील बाजारात हरभरा भाव अद्यापही दबावात आहेत. बाजारातील हरभरा आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणेची अपेक्षा होती. पण सरकार हरभरा विक्री सुरु करणार असल्याच्या बातमीने दरावरील दबाव कायम राहिला.
आजही हरभरा ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. यापुढील काळात हरभरा बाजार नाफेडच्या विक्रीवर अवलंबून राहील, असे जाणकारांनी सांगितले.
३) लिंबू दरातील तेजी कायम (Lemon Rate)
राज्यात अजूनही उन्हाचा चटका चांगलाच जाणवत आहे. त्यामुळे रसाळ फळे आणि लिंबाला मागणी टिकून आहे. पण मागील महिनाभरात लिंबाची बाजारातील आवक कमी होत गेली. महत्वाच्या बाजारांमधील लिंबू आवक ही सरासरीपेक्षा कमीच आहे.
त्यामुळे लिंबाचे भाव सध्या तेजीत आहेत. लिंबाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. लिंबाचे भाव पुढील महिनाभर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
४) मोसंबीला उठाव वाढला (Mosambi Rate)
राज्यातील काही बाजारांमध्ये मोसंबी आवक सुरु झाली आहे. मोसंबी काढणीचा महत्वाचा हंगाम ऑगस्टपासून सुरु होईल. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच आहे. तर वाढत्या उन्हामुळे मोसंबीला उठावही मिळतोय.
त्यामुळे सध्या मोसंबीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काही दिवस मोसंबीचा बाजार या दरावर दिसू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
५) सध्या बाजारात कापूस आवकेची स्थिती काय आहे? (Cotton Rate)
देशातील बाजारात कापूस आवक सध्या सरासरीपेक्षा जास्तच आहे. बाजारात आजही सरासरी ५० लाख गाठी कापूस विक्रीसाठी येत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. एरवी जून महिन्यातील आवक १५ लाख गाठींपेक्षा कमी असते. म्हणजेच सध्याही कापसाची सरासरी आवक जास्तच आहे. त्यामुळे कापूस बाजारावरील दबाव कायम आहे.
जून महिन्यात कापूस बाजारावर दबाव येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे व्यापारी आणि उद्योगांकडून सांगण्यात आले. त्यातच सध्या देशातील उत्पादनाविषयी मतमतांतरे दिसतात. बाजारातील आवक आणि शिल्लक कापूस यावरूनही मतभेद आहेत.
व्यापारी यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगत आहेत. तर शेतकरी आणि काही संघटनांच्या मते उत्पादनात घट झाली. उत्पादन वाढीच्या नावाखाली बाजार दबावात ठेवला जातो आहे. आजही कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये भाव मिळाला. चालू महिन्यात बाजारावर कापूस आवकेचा दबाव दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
तसेच यंदा कापूस लागवड वाढीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यापुढील काळात कापूस लागवडी किती होते? पाऊसमान कसे राहते? यावर कापसाचा बाजार अवलंबून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.