Team Agrowon
वाढत्या तापमानामुळे पिकासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पिकाची पाण्याची गरज भागवण्याला प्राधान्य द्यावे.
मोसंबी पीक हे पाण्यासाठी संवेदनशिल पीक आहे. जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे, तर झाडातील पाणी पानातून होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेमुळे झपाट्याने कमी होते.
अशा परिस्थितीत आच्छादन, मडका सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर करुन पिकाची पाण्याची गरज भागवता येते.
जमिनीतील ओलावा टिकवून धरण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. आच्छादनासाठी पॉलिथिन फिल्मचा किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. शक्य असेल तर ८० ते १०० मायक्रॉन जाडीची फिल्म आच्छादनासाठी वापरावी.
सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळलेले गवत, लाकडी भुस्सा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, भाताचे काड, गिरिपुष्प यांचा समावेश होतो. अशा अवशेषांचा फळझाडाच्या आळ्यामध्ये विशेषतः ड्रीपरच्या खाली ४ ते ६ इंच जाडीचा थर द्यावा.
त्या ठिकाणी तंतुमय मुळे पसरलेली असतात. वाळवीचा प्रादुर्भाव होणार नाही, याकडे लक्ष ठेवावे. आवश्यकतेनुसार शिफारशीत दाणेदार कीटकनाशकांचा वापर करता येईल. सेंद्रिय आच्छादनामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.