जगात सोयाबीनचा (Soybean) सगळ्यात मोठा ग्राहक म्हणजे चीन (China). मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळं चीनची सोयबीन आयात (Soybean Import) कमी राहिली.
पण यंदा चीन सोयाबीन आयात वाढवण्याचा अंदाज आहे. मागील हंगामात चीनने किती सोयाबीन आयात केली? चीनची सोयाबीन आयात वाढल्यास बाजारावर काय परिणाम होईल? सोयाबीन बाजाराला (Soybean Market) आधार मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
1. कापसाचे दर आज स्थिरावले
देशातील बाजारात मागील आठवडाभरापासून कापूस दरात नरमाई दिसून आली. अनेक बाजारांत कापसाचे दर क्विंटलमागं ५०० रुपयाने कमी झाले.
त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. सध्या कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ८ हजार ८०० रपये दर मिळतोय.
दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ-उतार सुरु आहेत. त्याचाही परिणाम कापूस दरावर जाणवत असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
कापसाच्या दरात चढ-उतार होत असले तरी यंदा देशातील कापूस दरपातळी प्रति क्विंटल ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. सोयाबीनचे दर टिकून
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दरपातळी गाठली होती. मात्र आज सोयाबीनचे वायदे बंद होते.
पण देशातील बाजारात मात्र सोयाबीन दर एका भावपातळीवर टिकून आहेत. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरवाढीसाठी पोषक स्थिती आहे. त्याचा आधार देशातील दरालाही मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
3. बाजरी तेजीतच राहण्याचा अंदाज
देशातील बाजारात सध्या बाजरीची आवक कमी आहे. त्यामुळं बाजरीचे दर तेजीत आहेत. सध्या बाजरीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ३०० रुपये दर मिळतोय.
यंदाच्या खरिपात बाजरी उत्पादन घटल्याचा हा परिणाम असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तसंच बाजरीच्या दरातील तेजी पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे.
4. हिरवी मिरची खातेय भाव
राज्यातील बाजारात सध्या हिरवी मिरची चांगलाच भाव खातेय. सध्या बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर अशा मोठ्या बाजारपेठा वगळता इतर ठिकाणी आवक २० क्विंटलपेक्षा कमीच दिसतेय.
त्यामुळं सध्या हिरव्या मिरचीला ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.
5. जगातली शेतीमालाची मोठी बाजारपेठ म्हणून चीनची ओळख आहे. चीनची लोकसंख्या जास्त असल्यानं वापरही मोठा होतो.
जागतिक शतीमाल बाजारपेठ बव्हंशी चीनच्या मागणीवर अवलंबून आहे. आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारावरही चीनच्या मागणीचं वर्चस्व आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
सोयाबीनचा सर्वाधिक वापर करणारा देश म्हणून चीनचा वेगळाच दबदबा आहे. मात्र मागील वर्षी चीनला कोरोनाचा मोठा फटका बसला. त्यामुळं चीनची सोयाबीन आयातही ५.६ टक्क्यांनी कमी झाली होती.
मागील वर्षी चीननं ९१० लाख टन सोयाबीन आयात केली. तर २०२१ मधील आयात जवळपास ९६० लाख टनांवर पोचली होती.
पण यंदा चीनची सोयाबीन आयात वाढण्याचा अंदाज आहे. मागीलवर्षी चीनमध्ये पशुखाद्यात सोयापेंडचा वापर कमी राहिला.
पण चीनचं नवीन वर्ष २१ जानेवारीपासून सुरु होते. त्यामुळं पोल्ट्री आणि वराहपालन उद्योगातून सोयापेंडला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच सध्या चीनमध्ये सोयापेंडचा साठा ऐतिहासिक निचांकी पातळीवर आहे. तर कोरोना निर्बंध तब्बल ३ वर्षांनंतर शिथिल होत आहेत.
त्यामुळं २०२३ मध्ये चीन सोयाबीनची आयात वाढवू शकतो. त्याचा आधार सोयाबीन बाजारालाही मिळेल, सोयाबीनचे दर वाढण्यासाठी मदत होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.