
1. कापसाचे भाव स्थिर
आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे काहीसे नरमले होते. वायद्यांनी आज ८५.७७ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. देशातील वायदे मात्र आजही ४०० रुपयांनी वाढले होते. वायदे ६० हजार ८४० रुपयांवर पोचले होते. बाजार समित्यांमधील भाव मात्र या स्थिर होता. कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाच्या दरातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीन वायद्यांमध्ये आज आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत सुधारणा झाली होती. सोयाबीनचे वायदे एक टक्क्याने वाढून १३.२२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदेही ३९३ डाॅलरवर पोचले होते. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते. आज सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळाला. सोयाबीनच्या भावावर आणखी काही दिवस दबाव राहू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशात तुरीचे भाव मागील काही महिन्यांपासून तेजीतच आहेत. तुरीला आजही सरासरी प्रतिक्विंटल ९ हजार ५०० ते १० हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. देशात पुढील महिन्यापासून तूर आयात वाढण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे तूर लागवड यंदाही कमी दिसते. तर महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये जोरदार पाऊस नाही. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात कांद्याच्या भावात मागील आठवडाभरात चांगली वाढ झाली. कांद्याचे भाव आता अनेक बाजारांमध्ये प्रतिक्विंटल २ हजारांच्या दरम्यान पोचले. दुसरीकडे कांद्याची आवक कमीच दिसते. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ७०० ते २ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली वाढू दिसू शकते. पण सरकारचा हस्तक्षेपही बाजारात होऊ शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
हरभरा भावात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाढ झाली. पण या दरवाढीचा फायदा अगदी बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. कारण खूपच कमी शेतकऱ्यांकडे सध्या हरभरा पीक आहे. देशात ऑगस्टपासून सणांच्या पार्श्वभूमीवर शेतीमालाची मागणी वाढत असते. त्यात कडधान्य, धान्याला विशेष मागणी असते. याचाच फायदा सध्या हरभऱ्याला मिळत आहे. विशेष म्हणजे सरकारकडे हरभऱ्याचा यंदा ३८ लाख टनांच्या दरम्यान स्टाॅक दिसतो. तरीही खुल्या बाजारात हरभरा दरात क्विंटलमागं ५०० ते ७०० रुपयांची वाढ दिसते. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हरभरा भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान पोचले. तर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि अशा मोठ्या बाजारांमधील भाव ५ हजार ७०० रुपयांवर पोचला. त्यातच नाफेड सध्या २०२२ च्या हंगामातील हरभरा लिलावाद्वारे विकत आहे. या हरभऱ्यालाही चांगला भाव मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या लिलावात महाराष्ट्रात विक्रमी ५ हजार ५०० रुपयाने लिलाव पार पडले.
बाजारात भाव आणखी वाढल्यास सरकार स्टाॅकमधील माल बाजारात मोठ्या प्रमाणात आणू शकते. पण सध्याचे पाऊसमान आणि रब्बीविषयी वाढत चालेली चिंता, यामुळे हरभरा दरातील सुधारणा कायम दिसू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.