

शरीरासाठी आवश्यक असणारी पोषणमूल्ये आपल्याला आहाराच्या माध्यमातून मिळतात. आपल्या आहारात अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये प्रामुख्याने भरडधान्य, कडधान्य, तेल बिया, मांस, दूध तसेच चिकन, मटण, मासे या माध्यमांतून मिळणारी पोषण मूल्ये शरीरासाठी आवश्यक आहेत. यापैकी दैनंदिन आहारात भरडधान्यांचे पदार्थ आवश्यक आहेत. आपल्या देशामध्ये पूर्वापार चालत आलेल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये आहार या विषयामध्ये प्रत्येक धान्यांच्या विषयी मुबलक माहिती देण्यात आलेली आहे. यात भरडधान्य हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक आहे.
सर्वसमावेशक आहार आयुर्वेदामध्ये मनुष्य जीवनाचा आधार म्हणून चरकाचार्यांनी चरक संहितेमध्ये तीन उपस्तंभांचे वर्णन केले आहे. यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य याचा समावेश होतो. यामध्ये आहार हा प्रथम घटक आहे. शरीर पोषणासाठी आवश्यक असणारा आहार हा षड्रसात्मक असायला हवा. या आहारामध्ये असलेली भरडधान्ये शरीराचे पोषण उत्तम रीतीने करतात. यासाठी याचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.
भरडधान्यांमध्ये समावेश असणाऱ्या धान्यांमध्ये नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, राळे, बार्ली, मका यांसारख्या पिकांचा समावेश होतो. या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी कमी पाण्याची गरज असते. बहुतांश राज्यात या भरडधान्यांचे उत्पादन घेतले जाते.
भरडधान्यातील पोषण मूल्ये
भरडधान्यांमध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांमधील प्रथिने, कर्बोदके, अनेक खनिज द्रव्ये आढळतात. भरडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आढळते. भरडधान्ये ही ग्लुटेन विरहित असतात. त्यामुळे त्यांचे सेवन वर्षभर करता येते. भरडधान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. प्रथिने शरीरातील झीज भरून काढतात. तसेच आपले स्नायू बळकट करायला देखील मदत करतात. यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्यामुळे पचन क्रिया सुलभ होण्यास मदत होते, पोट लवकर भरते. भूक लागायचे प्रमाण कमी होते. भरडधान्यातील तंतुमय पदार्थांमुळे शरीरातील लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल, जे शरीरासाठी हानिकारक असते ते कमी होते. हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल, ज्याला गुड कोलेस्टेरॉल असे म्हणतात ते वाढण्यास मदत होते. म्हणूनच ज्यांना कोलेस्टेरॉल किंवा इतर हृदयाचे विकार असतील त्यांच्यासाठी ज्वारी व बाजरीचे सेवन फायदेशीर आहे.
भरडधान्यामध्ये मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात आढळते. मधुमेहींसाठी मॅग्नेशिअम जास्त प्रमाणात असलेले पदार्थ उपयुक्त असतात. त्यामुळेच त्यांच्या आहारात भरडधान्ये असणे हितकारक असते. मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण भरडधान्यात जास्त आढळत असल्याने त्यांचे सेवन उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती व हृदयविकार असलेल्यांसाठी फायदेशीर ठरते. शरीर बल वाढविणारी धान्ये आयुर्वेदामध्ये या धान्यांचा अनेक आजारांवर उपचार करताना शरीराचे बल वाढवण्यासाठी घ्यावयाचा आहार म्हणून उल्लेख आहे.
नाचणी
कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि ब जीवनसत्त्व यांचे प्रमाण जास्त आहे.
पोटॅशिअम हा पेशीद्रव्यातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. तो पेशी निर्मितीसाठी आणि पर्यायाने स्नायूनिर्मितीसाठी तसेच त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
‘ब'' वर्गीय जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
नाचणीयुक्त अन्नपदार्थांचा वापर लहान मुले आणि गरोदर स्त्रियांमध्ये खूपच फायदेशीर आहे. वाढत्या वयाच्या मुला-मुलींना पोषणद्रव्यांची गरज जास्त असते. नाचणीयुक्त आहाराने ही गरज भरून काढता येते.
नाचणीमध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्याने नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी आहे. कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत. त्यामुळे रक्तशर्करेवर नियंत्रण राहते.
मधुमेह पीडित तसेच लहान मुलांच्या आहारात बाजरी प्रमाणेच नाचणीचा समावेश करावा म्हणजे अनेक पोषणतत्त्वे मिळू शकतात. लहान बालके व आजारी व्यक्तींना नाचणीची पेज किंवा सत्त्व दिले जाते. सध्या बाजारात नाचणीचे अनेक मूल्यवर्धित पदार्थ मिळत आहेत.
नाचणी पचायला हलकी असते. उत्तम अग्निदीपन घडून येते. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना नाचणी खायला देणे फायदेशीर आहे. यामुळे शरीराची झालेली हानी भरून निघते. नाचणीपासून तयार केलेले पदार्थ लहान मुलांसाठी शक्तिवर्धक आहेत.
बाजरी
मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोहासारखे अनेक पोषक घटक असतात. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. त्यामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी होतो.
वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी शक्तिवर्धक व पोषक आहे.
आयुर्वेदानुसार बाजरी उष्ण असते, त्यामुळे तिचे सेवन हिवाळ्यात करणे फायदेशीर असते.
मधुमेही व्यक्तींसाठी बाजरी आहारात असणे फायदेशीर आहे.
ज्वारी
ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि खनिजद्रव्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ज्वारीची भाकरी ही पचण्यास अतिशय हलकी आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक आहे.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ही ऊर्जा दिवसभर कामी येते. ज्वारीमधील पोषकद्रव्ये पाहता ज्वारीचा आहारात उपयोग केल्याने आहारातील पोषक मूल्यांचे संतुलन योग्य ठेवण्यास मदत होते.
■ वैद्य श्रीधर पवार,
९४०४४०५७०६
(लेखक आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.