
अनिल जाधव
Onion Bajar : पुणेः टोमॅटो भावाची चर्चा माध्यमांमधून कमी होत असताना कांदा भावाच्या चर्चेने आता जोर धरला. देशातील बाजारात कांदा भाव चांगले सुधारले. कांद्याच्या भावाने आता २ हजारांचा टप्पा पार केला. तर किरकोळ बाजारात भाव ४० रुपयांच्या पुढे सरकले. त्यातच नाफेड स्टाॅकमधील माल विकणार असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळं कांद्याचे भाव काहीसे कमी झालेले दिसतात. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराती पसरली.
बाजारातील कांदा आवक कमी झाली. देशात मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला. त्यातच बांगलादेशातून मागणी वाढली. परिणामी निर्यातही सुरु आहे. दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील खरिप कांदा एक महिना लेट आहे. यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढली. पण राज्यातील बाजारांमध्येही कांदा कमी येतोय. यामुळे कांद्याचे भाव वाढले. महत्वाच्या बाजारांमध्ये कांद्याने २ हजार ३०० रुपयांचा टप्पा पार केला होता.
नाफेडची एन्ट्री
केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने नाफेड स्टाॅकमधील कांदा विकणार असल्याचे जाहीर केले. यामुळे कांदा दरवाढीला ब्रेक लागल्याचे दिसते. कांद्याचा महत्वाच्या बाजारांमधील भाव २ हजार ३०० रुपयांवरच आहेत. नाफेडकडे ३ लाक टन कांद्याचा स्टाॅक आहे. हा कांदा नाफेड बाजारात विकतंय. नाफेडच्या या निर्णयामुळे शेतकरी आक्रमक झाले. कारण आतापर्यंत कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकावा लागला. आता कुठं भाव वाढले. त्यातही नाफेड आडकाठी आणतं म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. शेतकऱ्यांचा रोष पाहून केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी नाफेड महाराष्ट्रात कांदा विकणार नाही. कांदा टंचाई असलेल्या राज्यातच नाफेड कांदा विकेल, असे पवार यांनी सांगितले.
नाफेडचा कांदा किती परिणाम करेल?
पण खरा प्रश्न हा आहे की, नाफेडचा ३ लाख टन कांदा बाजावर किती परिणाम करू शकतो? कारण देशाला दिवसाला जवळपास ५० हजार टनांची गरज असते. नाफेडने सर्व कांदा विकला तरी देशाला केवळ ६ दिवस पुरेल. म्हणजेच नाफेड देशाची केवळ ६ दिवसांची गरज पूर्ण करु शकते. त्यामुळे नाफेडच्या कांद्याचा बाजारावर तेवढा परिणाम राहणार नाही. कारण पुरवठा मागणीपेक्षा खूपच कमी आहे. फक्त गरज आहे ती पॅनिक सेलिंग टाळण्याची.
दरवाढीची कारणं
ऑगस्टपासूनच यंदा बाजारातील कांदा आवक कमी होत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. कारण रब्बी कांद्याची गुणवत्ता यंदा कमी आली. मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा फटका आणि एप्रिलमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कांदा गुणवत्तेवर परिणाम झाला. कांद्याची टिकवणक्षमता एक ते दोन महिन्यानं कमी झाली. यामुळं यंदा बाजारातील कांदा आवक लवकर कमी होत जाईल. एरवी सप्टेंबरनंतर बाजारातील आवक कमी होते. पण यंदा ऑगस्टपासूनच आवक कमी होत गेली. यामुळे दरात सुधारणा झाली.
पुढचं चित्र काय?
यंदा खरिपाचा माल एक महिना उशीरा आहे. त्यातच अनेक भागात लागवडी उशीरा झाल्या. जुलैमधील अतिपाऊस आणि ऑगस्टमधील पावसाच्या खंडाचाही कांदा पिकावर परिणाम होत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये कांदा भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कांदा भाव ३ हजार ते ४ हजारांचाही टप्पा गाठू शकतात. ऑक्टोबरनंतर खरिपातील माल बाजारात येईल. पण खरिपातील पिकाची स्थिती पाहता बाजारावर मोठा दबाव येण्याची शक्यता धुसर आहे. कांदा भाव या काळ स्थिर राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.