
Cotton market : हळदीच्या किमतीतील तेजी या सप्ताहात कमी झाली आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे. मात्र हा फायदा आता लवकरच संपू शकेल.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार यंदा खरीप पिकाखालील क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेने वाढ झाली आहे. सोयाबीन व मक्याचा पेरा अनुक्रमे १ व २ टक्क्यांनी वाढला आहे. परंतु कापूस, मूग व तूर यांच्या लागवड क्षेत्रात मात्र अनुक्रमे १, ३ व ५ टक्के घट झालेली आहे.
कापसाच्या किमती भारतातील उत्पादन, वस्त्रोद्योगाकडून मागणी, खाद्यतेलाच्या किमती व कापसाच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात. अमेरिकेतील कृषी विभागाने (यूएसडीए) १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील या वर्षीचे (२०२३-२४) कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा १.९२ टक्क्यांनी कमी असेल. जागतिक उत्पादनसुद्धा ३.५३ टक्क्यांनी कमी राहील. वर्षअखेरचा जागतिक साठा ३.५ टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. भारतातील वर्षअखेर साठा मात्र २.५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय किमती त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे.
या सप्ताहात तूर वगळता इतर पिकांच्या स्पॉट किमती वाढल्या. कांद्याचे भाव प्रकर्षाने वाढले. या वर्षी जून, जुलै महिन्यात मका, कांदा व मूग वगळता इतर पिकांची आवक कमी राहिली.
१८ ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात २.४ टक्क्यांनी वाढून रु. ६०,४२० वर आले होते. या सप्ताहात ते ०.९ टक्क्याने वाढून रु. ६०,९६० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव रु. ५९,५६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ५८,५०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ४ टक्क्यांनी कमी आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे. आवक कमी होत आहे.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५१५ वर आले होते. या सप्ताहात ते २.३ टक्क्यांनी वाढून रु. १,५५१ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५६७ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.१ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,०९० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. २,१०० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (सप्टेंबर डिलिव्हरी) किमती रु. २,११४ वर आल्या आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स किमती रु. २,१३९ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.९ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात २.३ टक्क्यांनी वाढून रु. १४,५५५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी घसरून रु. १४,१३५ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमतीसुद्धा ३.२ टक्क्यांनी घसरून रु. १६,३७० वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १७,३९२ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या २३ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीमधील तेजी कमी होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात १.८ टक्क्याने वाढून रु. ५,५२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा ५.९ टक्क्यांनी वाढून रु. ५,८५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव वाढले आहेत.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ०.३ टक्क्याने वाढून रु. ७,७२५ वर आली होती. या सप्ताहात ती १.६ टक्क्याने वाढून रु. ७,८५० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या काही सप्ताहांत वाढत होती; आता ती घसरू लागली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,१५१ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु.४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात २.२ टक्क्यांनी वाढून रु. ९,६७५ वर आली होती. या सप्ताहात ती १.४ टक्क्याने घसरून रु. ९,५३६ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात अजूनही तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्चित आहे.
: arun.cqr@gmail.com
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.