Chana Production : हरभऱ्याला कमी उत्पादन, चांगल्या मागणीचा आधार

Market Update : यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आणि चांगली मागणी यामुळे हरभरा भाव ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Chana
Chana Agrowon
Published on
Updated on

Pune News : नव्या हंगामातील हरभरा आता बाजारात दाखल होत आहे. त्यातच सरकारच्या भारत ब्रॅन्ड डाळीची विक्री, सरकारच्या धोरणामुळे उद्योग आणि स्टाॅकीस्टची हात आखडून सुरु असलेली खरेदी, यामुळे हरभरा भावात काहीशी नरमाई आली.

पण यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आणि चांगली मागणी यामुळे हरभरा भाव ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मागील आठवड्यात हरभऱ्याचे भाव नरमले त्याला प्रामुख्याने बाजारातील वाढती आवक, सरकारची डाळ विक्री आणि उद्योगांची हरभरा खरेदी ही कारणे होती. सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक सुरु झाली. पुढच्या काही आठवड्यांमध्ये आवक वाढेल.

नवा माल सुरु झाल्याने भावावर काहीशी नरमाई दिसून आली. तसेच हरभरा खरेदीबाबत सरकार कोणतं धोरणं राबवतं, हे पाहण्यासाठी उद्योग आणि स्टाॅकीस्ट खरेदी करताना दिसत नाहीत. उद्योग गरजेप्रमाणे सध्या खरेदी करताना दिसत आहेत. 

Chana
Chana Harvesting : हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत

सरकार हमीभावाने खेरदी करणार की बाजारभावाने हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. कारण सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत.

त्यामुळे सरकार बाजाराभावाने खरेदीत उतरेल की बाजारभाव हमीभावाच्या पातळीवर आणेल, हे पुढच्या काही आठवड्यांमध्ये स्पष्ट होईल. पण उद्योग आणि स्टाॅकीस्ट खरेदीत नसल्याचा तात्पुरता परिणाम बाजारावर दिसत आहे. 

डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकार भारत ब्रॅन्ड डाळीच्या नावाने डाळ विकत आहे. ६० किलोने ही विक्री सुरु आहे.

म्हणजेच सध्या खुल्या बाजारात हरभऱ्याचा कमाल भाव आणि सरकारच्या विक्रीचा डाळीचा भाव समान आहे. त्यातच सरकारने पिवळा वाटाणा आणि मसूर डाळ आयात वाढीसाठी प्रयत्न चालविले आहेत. याचाही परिणाम भावावर दिसून येत आहे. 

सध्याचा भाव 

हरभऱ्याचे भाव सध्या देशभरात हमीभावापेक्षा जास्त आहेत. यंदा सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला. देशातील सरासरी भावपातळी ५ हजार ४०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहे.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये हरभरा भाव क्विंटलमागं १०० रुपयांनी कमी झाले आहेत. राज्यनिहाय भावाचा आढावा घेतला तर महाराष्ट्रात ५ हाजर ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भावपातळी आहे. तर मध्य प्रदेशात ५ हजार ४०० ते ६ हजार आणि कर्नाटकता ५ हजार ८०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान नवा हरभरा विकला जात आहे. 

Chana
Chana Market : मोठ्या काबुली हरभऱ्याची खानदेशात आवक सुरू

उत्पादन कशामुळे घटणार?

- देशातील लागवड ६ टक्क्यांनी कमी झाली
- हरभरा पिकाला कमी पाण्याचा फटका
- नुकतेच महाराष्ट्र, मध्य प्रदेशात महत्वाच्या हरभरा उत्पादक भागात पाऊस आणि गारपीट
- महाराष्ट्रात मराठवडा आणि विदर्भात पाऊस 
- ढगाळ वातावरणाचाही पिकावर परिणाम 
- हरभरा उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज

भावाला कशाचा आधार?

- उत्पादनात घटीचा अंदाज
- रमजानमुळे मागणी वाढली
- होळीच्या सणाचीही मागणी वाढणार
- सरकार आणि उद्योगांकडे हरभऱ्याचा स्टाॅक कमी 
- सरकारने मागील काही महिन्यांमध्ये हरभरा विकला. 
- सरकारमुळे उद्योगांनीही मोठा स्टाॅक केला नाही 
- पुढच्या काळात हरभऱ्याला मागणी चांगली राहील 
- सरकार आणि उद्योग खरेदीत उतरतील 

पुढच्या काळात बाजार कसा राहू शकतो?

सरकारकडे विक्रीसाठी जास्त माल नाही. सरकारला जास्त डाळ बाजारा विकायची असले तर खरेदी जास्त करावी लागेल. सरकार जेवढी जास्त खरेदी करेल तेवढा जास्त हरभरा खुल्या बाजारातून बाहेर जाईल. यामुळे सरकार हमीभाव किंवा बाजारभावाने खरेदीत उतरले तरीही बाजाराला चांगला आधार मिळणार आहे.

हरभऱ्याचे भाव यंदा ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची विक्री करताना हे घटक विचारात घेऊन आणि बाजारातील चढ उताराकडे लक्ष ठेऊन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे आवाहन बाजारातील अभ्यासकांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com