Jalgaon News : खानदेशात पपईची आवक सध्या अल्प आहे. दर मागील तीन महिन्यांपासून टिकून आहेत. पपईला स्थानिक बाजारासह अन्य भागात मागणी आहे. परंतु आवक कमी असल्याने मागणी व पुरवठ्याचे गणित बिघडले आहे.
किमान व कमाल दर एकसारखेच असून, सरसकट १५ रुपये प्रतिकिलोचा दर थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे. सध्या फक्त बारमाही उत्पादन देणाऱ्या वाणांच्या पपई बागांत पपई काढणीला उपलब्ध होत आहे. पपई पक्व होण्याची क्रिया सध्या संथ आहे. पावसामुळे शेतांत चिखल आहे. वाफसा नाही.
सततच्या पावसानेदेखील पपई काढणी व अन्य कार्यवाही रखडली होती. बारमाही उत्पादन देणाऱ्या पपई वाणांची लागवड जळगाव, धुळे भागात काही शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या या वाणांच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे एक हजार हेक्टरवर एवढे आहे. १४ ते १६ महिन्यांपासून या बागा उभ्या आहेत.
त्यात मागील सहा ते सात महिन्यांपासून उत्पादन येत आहे. परंतु या वाणांच्या बागांत उत्पादन रखडत येत आहे. या पपईचे वजनही कमी असते. यामुळे उत्पादन कमी येत आहे. खानदेशात सध्या रोज दोन ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) पपईचे उत्पादन येत आहे. सततच्या पावसाने रखडलेली काढणी मागील दोन दिवस सुरू आहे.
स्थानिक बाजारात पपईला मागणी आहे. तसेच काही खरेदीदार प्रतवारी करून मुंबई, कल्याण आदी भागांतही पपईची पाठवणूक करीत आहेत. नंदुरबारातील शहादा, तळोदा भागातही पपईची आवक अपवाद वगळता नाही.
या भागातून हंगामातील पपईची काढणी ऑक्टोबरअखेर सुरू होईल. सध्या धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, जळगाव, यावल, जामनेर आदी भागांत पपई उपलब्ध आहे, अशी माहिती मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.