
विक्रमादित्याच्या खांद्यावरून निसटून जंगलात झाडावर जाऊन लटकणाऱ्या त्या वेताळासारखा ‘आनंद’ (Happiness) लोकांच्या घरातून निसटून परत परत बाजारपेठेतील (Market) दुकानात जाऊन लटकत आहे. आणि लोकांना आनंद मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा बाजारात जायला भाग पडत आहे. आनंद घरांमध्ये दोन-चार तासांपलीकडे टिकूच शकत नाहीये.
काही वर्षांपूर्वी मार्केटने लोकांना सांगितले, ‘‘खूप खरेदी केली की खूप आनंद मिळतो.’’ पिढ्यान् पिढ्या साध्या साध्या भौतिक उपभोगाला पारखे केल्या गेलेल्या, आर्थिक विवंचनेत आयुष्य काढलेल्या कोट्यवधी नागरिकांना वाटले, की अरे, मार्केट तर अगदी आपल्या मनातलंच सांगतंय. लोकांना खरं तर नेहमीच पोहोचायचे होते ‘आनंदा’च्या गावाला. आयुष्यभर एकच ध्यास आनंदाच्या गावाला पोहोचण्याचा. पण मार्केटने शासनाच्या धोरणकर्त्यांच्या, टाउन प्लॅनर्सच्या मदतीने ‘आनंदा’च्या गावाला पोहोचणारा रस्ता नेहमीच बाजारपेठेतून जाईल अशी आखणी केली.
बाजारपेठेचा रस्ता होता मायावी. चालता चालता कोणीतरी अदृश्य शक्ती रस्त्यावरून जाणाऱ्याना हाताला घेऊन बाजारपेठातील कोणत्या तरी दुकानात घेऊन जात असते. खरेदी करायचे ठरवलेलं नसताना लोक अगदी नको असणाऱ्या गोष्टी खरेदी करून दुकानातून बाहेर पडत असतात. लोक दुकानदारांना विचारत असतात, ‘‘का हो, या खरेदीवर ‘‘आनंद’’ मिळणार होता ना फ्री?’’ दुकानदार हसून म्हणतात, ‘‘हो, टाकलाय ना पॅकिंगच्या आत.’’
कोरोनामुळे, अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे लोकांकडे पैसे कमी आहेत; पण कर्जे देणारे, क्रेडिट कार्ड देणारे, ऑनलाइन लेन्डिंगवाले गल्लोगल्ली आधीच पोहोचले आहेत. दुकानदार सांगत आहेत- ‘‘बाय नाऊ, पे लॅटर.’’ आणि लोक काहीबाही खरेदी करतच आहेत.
आपल्या हातातल्या पिशवीत ‘आनंद’ आहे याच आनंदात लोक आपापल्या घरी पोहोचताहेत. पॅकिंग उघडताहेत, नवीन वस्तुमालाला हुंगताहेत, चव घेताहेत, स्पर्श करताहेत. त्यांना छान वाटतंय. शेवटी ‘आनंद’ आपल्या घरात आलाय याच धुंदीत लोक असताना विक्रमादित्याच्या खांद्यावरून निसटून जंगलात झाडावर जाऊन लटकणाऱ्या त्या वेताळासारखा आनंद लोकांच्या घरातून निसटून परत परत बाजारपेठेतील दुकानात जाऊन लटकत आहे!
आणि लोक परत परत दुकानांत निसटलेला तो आनंद मिळवण्यासाठी वस्तूंची अधिक आणि अधिक खरेदी करत आहेत. ३६५ दिवस कोणता ना कोणता सण साजरा करतच राहतात बिचारे आणि आनंद मात्र सतत त्यांच्या घरातून निसटून बाजारपेठेतच जाऊन स्वतःला लटकावून घेत आहे.
(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक असून, टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.