
Pune News : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या भावात जवळपास ५ टक्के वाढ झाली. सोयाबीनच्या भावातही काही प्रमाणात सुधारणा दिसून आली होती. देशातही कालच्या तुलनेत आज प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढवले होते. तर बाजार समित्यांमध्येही किमान सरासरी भावात भावात सुधारणा पाहायला मिळाली.
देशभरात आज बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव ४ हजारांवर पोचला. कालपर्यंत अनेक बाजारांमध्ये सरासरी भाव ३ हजार ८०० ते ३ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होता. तो आता १०० रुपयांनी वाढलेला दिसतो. किमान आणि कमाल भावातही सुधारणा दिसून आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात दोनच दिवसांमध्ये सोयापेंडच्या भावात टनामागे ५ टक्के म्हणजेच जवळपास १४ डाॅलरची वाढ झाली. आज दुपारपर्यंत सीबाॅटवर सोयापेंडचे वायदे ३१५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. मागील दोन महिन्यांपासून सोयापेंडचे भाव ३०० डाॅलरपेक्षा कमीच राहीले. जागतिक बाजारात वाढलेले सोयाबीन उत्पादन आणि सोयापेंड निर्मिती वाढत असल्याचा दबाव बाजारावर होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यातच मागील दोन दिवसांपासून सोयापेंड आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली.
सोयाबीनपेक्षा सोयापेंडच्या भावातील वाढ जास्त आहे. त्याचे कारण म्हणजे अर्जेंटीनात पुढील आठवड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. त्याचा पिकावर काही प्रमाणात परिणाम होईल, अशी शक्यता असल्याने सोयापेंडच्या दरात चांगली सुधारणा झाली. अर्जेंटीना सोयापेंड उत्पादनात आघाडीवर आहे. त्यामुळे या घडामोडींचा सोयापेंडला जास्त आधार मिळाला. अर्जेंटीनात भाव वाढल्याने अमेरिकेच्या बाजारातही भाव वाढले. मात्र सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर आहे. पण ब्राझीलमध्ये सामन्य वातावरण राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात त्या प्रमाणात सुधारणा झाली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या भावात सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसून आला. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ केली. प्रक्रिया प्लांट्सचे भाव आज ४५०० ते ४ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान होते. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये भावातही काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. नक्कीच ही वाढ शेतकऱ्यांना अपेक्षित अशी नाही.
शेतकऱ्यांना भावात किमान ५०० ते ८०० रुपयांची सुधारणा अपेक्षित आहे. मात्र मागील दोन दिवसांमध्ये भावात केवळ १०० रुपयांची वाढ दिसून आली. आज देशातील बहुतांशी बाजारात सरासरी भाव म्हणजे ज्या भावात जास्तीत जास्त सोयाबीन विकले गेले तो भाव ४ हजार रुपयांच्या पातळीवर पोचला आहे. किमान आणि कमाल भावातही काही प्रमाणात सुधारणा दिसून आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या दरात झालेली सुधारणा टिकेल की नाही, यावषयी देखील शंका उपस्थित केली जात आहे. कारण अर्जेंटीनात केवळ पुढील एक आठवडा हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पण हवामानात बदल झाल्यास बाजारात पुन्हा त्याचा सेंटीमेंट परिणाम होऊ शकतो, अशीही शक्यता काही अभ्यासकांनी व्यक्त केली.
देशात डीडीजीएसमुळे सोयाबीनचे गणित काही प्रमाणात बिघडताना दिसत आहे. पण जानेवारीत दरपातळीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. मात्र शेतकरी ज्या मोठ्या तेजीची अपेक्षा करत आहेत ती जानेवारीत दिसत नाही, असे देखील अभ्यासकांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.