Banana Farming
Banana FarmingAgrowon

Banana Farming : केळी लागवड वाढण्याचे संकेत

Banana Cultivation : खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.
Published on

Jalgaon News : खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत लागवड केलेल्या केळीस यंदा व मागील दोन हंगामांतही चांगले दर मिळाले आहेत. यामुळे या कालावधीत केळीची लागवड वाढण्याचे संकेत आहेत.

खानदेशात अलीकडे बारमाही केळी लागवड केली जाते. परंतु प्रमुख दोन बहरांत केळी पिकाची लागवड करण्याचा प्रघातही खानदेशात आहे. त्यात मृग बहर केळीचे पीक अधिक असते. या बहरातील केळीची लागवड ही मेअखेर ते जुलै या कालावधीत केली जाते. तर कांदेबाग केळीची लागवड ही सप्टेंबरअखेर ते ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान केली जाते.

Banana Farming
Banana Disease : केळीमधील करपा, सीएमव्ही रोगांचे नियंत्रण

यात मृग बहर केळीची काढणी उष्णतेत असते. या काळात अनेकदा नैसर्गिक समस्या असतात. तसेच दरातही चढ-उतार होतात. यंदा या कालावधीत लागवड केलेल्या केळीला एप्रिल ते जूनच्या मध्यापर्यंत सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. अनेकांना या कालावधीत ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला.

जूनच्या मध्यानंतर दरात सुधारणा झाली. परंतु या कालावधीत मृग बहर केळीची काढणी १०० टक्के पूर्ण झाली होती. जूनच्या मध्यानंतर आगाप कांदेबाग आणि सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या केळी बागांत काढणी सुरू झाली. या कालावधीत केळीला कमाल दर ३३७१ रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मागील दोन हंगाम व यंदाही कांदेबाग केळीला चांगला दर मिळाला आहे.

Banana Farming
Banana Rate : केळी दरात घसरण सुरूच

ज्या शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन केले, त्यांच्या केळीस अजूनही २३०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर मिळत आहे. जूनच्या मध्यानंतर दरात सुधारणा सुरू झाली. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही केळी दर स्थिर होते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केळीला सरासरी दर २१०० रुपये प्रतिक्विंटल असा मिळाला आहे. किमान दरही १५०० रुपयांपेक्षा कमी मिळालेला नाही.

‘कांदेबाग’चे क्षेत्र २० ते २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहणार

ज्या केळीची लागवड सप्टेंबर अखेरीस तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये केली जाते. त्या केळीची काढणी जूनच्या मध्यानंतर किंवा पावसाळ्यात सुरू होते. या काळात केळीची देशात आवक कमी असते. दुसरीकडे पावसाळ्यात सणासुदीचे दिवस असतात. गणेशोत्सव, नवरात्र-दसरा, दिवाळी या कालावधीत केळीला उठाव कायम असतो. परिणामी खानदेशात या दरांचा लाभ मिळावा, यासाठी कांदेबाग केळीची लागवड वाढत आहे. कांदेबाग केळीची लागवड रावेर, मुक्ताईनगरसह नंदुरबार व धुळ्यातही कमी असते. परंतु अलीकडे ही लागवड या भागातही वाढली आहे. यंदा कांदेबाग केळीखालील क्षेत्र सुमारे २० ते २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील, असे संकेत आहेत.

कांदेबाग केळीची लागवड खानदेशात जळगावातील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा-भडगाव, जळगाव या भागांत अधिक केली जाते. परंतु आता ही लागवड रावेरसह नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांतही वाढली आहे. ही लागवड नोव्हेंबर अखेरीस सुरू राहील. परतीचा पाऊस आल्यास लागवड लांबणीवर पडते. यामुळे अनेक शेतकरी डिसेंबरमध्येही लागवड करतात.\

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com