Cotton Market Update पुणे ः देशातील कापूस उत्पादनातील (Cotton Production) घट जास्त असल्याचे आता स्पष्ट होत आहे. शेतकरी सुरुवातीपासूनच उत्पादन घटल्याचे सांगत होते. पण उद्योगांनी उत्पादन जास्त असल्याची री कायम ठेवली होती.
आता अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) अर्थात ‘यूएसडीए’ने भारताचे कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत कमी झाल्याचे स्पष्ट केले. देशातील कापूस उत्पादनाचा (India's Cotton Production) अंदाज कमी केल्यास दर सुधारण्यास अनुकूल स्थिती असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
यूएसडीएने कापूस उत्पादन आणि वापराचा मार्च महिन्याचा अहवाल काल सादर केला. या अहवालात यूएसडीएने जागतिक कापूस उत्पादन आणि वापर गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील, असे म्हटले आहे.
तर जागतिक शिल्लक साठा ६४ लाख गाठींनी अधिक राहील, असा अंदाज व्यक्त केला. यंदा अमेरिका, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील कापूस उत्पादन घटले. चीनमध्ये मात्र उत्पादन वाढल्याची नोंद आहे.
यूएसडीएच्या मते, भारतात मागील हंगामात ३१२ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. ते यंदा ३१३ लाख गाठींवर स्थिरावेल. तर वापर मागील हंगामातील ३२ लाख गाठींनी कमी होऊन २८८ लाख गाठींपर्यंत स्थिरावेल. तसेच कापूस निर्यात १९ लाख गाठींनी घटून २८ लाख गाठींपर्यंत कमी होईल, असा अंदाजही यूएसडीएने व्यक्त केला.
जागतिक कापूस वापर यंदा कमी होण्याचा अंदाज असला तरी चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशकडून कापसाला मागणी आहे. चीनची कापूस आयात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी घटून ९६ लाख गाठींवर पोहोचेल.
तर पाकिस्तानची आयात जवळपास गेल्या वर्षीएवढीच राहून पाकिस्तान यंदा ५५ लाख गाठी कापूस आयात करेल. बांगलादेशची कापूस आयात मात्र यंदा ५ लाख गाठींनी कमी राहण्याचा अंदाज आहे.
यंदा बांगलादेश ९९ लाख गाठी कापूस आयात करेल, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला. देशातील मॉन्सूनवर एल-निनोचा परिणाम होणार असेल, तर कापूस दरात मात्र चांगली तेजी येऊ शकते, असे शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
यूएसडीए पुढील काळातही कापूस उत्पादनाचा अंदाज बदलू शकते. त्यामुळे देशातील उत्पादनातील घट जास्त आहे, हे स्पष्ट होतंय.
त्यामुळे पुढील हंगामासाठी शिल्लक कापूस कमी राहील. त्यातच एल-निनोच्या बातम्या सध्या सुरू आहेत. एल-निनोचा प्रभाव आपल्या मॉन्सूनवर किती होईल? हे आताच सांगता येणार नाही.
पण याबाबत एप्रिल किंवा मे महिन्यात चित्र स्पष्ट होऊ शकतं. यूएसडीएने कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे कापूस दराला आधार मिळेल, असे शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री यांनी सांगितले.
कापूस दर दबावात का?
देशातील बाजारात आज केवळ १ लाख गाठी कापसाची आवक झाली होती. तर यूएसडीएनेही उत्पादन घटीचा अंदाज जाहीर केला. पण कापूस दरावरील दबाव कायम आहे.
आज कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाचे भाव कमी असल्याने अनेक शेतकरीही पॅनिक सेलिंग करत आहेत. याचा दबाव दरावर आला.
मार्च महिन्यात शेतकरी कापूस विकतील, याची जाणीव असल्याने बाजार दबावात ठेवला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास थांबावे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कापूस दर सुधारतील.
कापसाची सरासरी भावपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान ८ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. पण बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.
देशातील कापूस उत्पादन घटल्याचा आधार कापूस दराला मिळेल. कापसाचे दर सध्याच्या दरावरून सुधारतील. पण मार्च महिन्यात बहुतेक व्यापारी आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. त्यामुळे मार्चमध्ये दरात चढ उतार राहू शकतात.
- सुरेश मंत्री, शेतीमाल बाजार अभ्यासक
मागील काही दिवसांपासून बाजारातील कापूस आवक वाढली आहे. त्यामुळे कापसाचे दरही दबावात आले. मार्च महिन्यात आवकेचा दबाव जास्त राहण्याची शक्यता आहे. याचा दबाव दरावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास मार्चनंतर विक्री करावी. चांगला भाव मिळू शकतो.
- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.