Jowar Market : ज्वारीच्या दरात उसळी

Jowar Rate : दुष्काळी स्थितीमुळे यंदा ज्वारीचा पेरा वाढला असला, तरी ओलाव्याअभावी कमी उगवण, तसेच यापुढे सिंचनाचा प्रश्‍न असल्याने उत्पादकता कमीच राहण्याची शक्यता आहे.
Jowar
Jowar Agrowon
Published on
Updated on

अविनाश पोफळे

Pune News : ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातील प्रमुख बाजारपेठांत आवकेत मोठी घट झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदा ज्वारीचा पेरा वाढला असला, तरी ओलाव्याअभावी कमी उगवण, तसेच यापुढे सिंचनाचा प्रश्‍न असल्याने उत्पादकता कमीच राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, ज्वारीच्या दराने मोठी उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. नवीन ज्वारीची आवक होईपर्यंत हे दर असेच ६ हजार ते ७ हजार रुपयांदरम्यान कायम राहतील, असा अंदाज ज्वारीच्या खरेदीदार, निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.

सोलापूर हा ज्वारीचा प्रमुख उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्यात यंदा दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. बार्शी, करमाळा, मंगळवेढ्यासह, नगर जिल्ह्यातील जामखेड, धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ज्वारीच्या राज्यातील प्रमुख बाजारपेठा आहेत. या ठिकाणी ज्वारीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मात्र मागणी कायम असल्याने दराने उच्चांक गाठला आहे.

मागील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ३५०० ते ४५०० रुपये क्विंटलचा दर होता, अशी माहिती जळगाव, बार्शी येथील व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या दरात यंदा २५०० ते ३५०० रुपये इतकी मोठी वाढ झाली आहे. बार्शी बाजार समितीतील खरेदी-विक्रीदार तुकाराम माने म्हणाले, ‘‘सध्या ज्वारी दराने उच्चांक गाठला आहे.

Jowar
Jowar Sowing : राज्यात यंदा आतापर्यंत ज्वारीची दुप्पट पेरणी

हैदराबाद, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सुरत, राजकोट, अहमदाबाद येथे ज्वारी पाठवितो. मात्र आमची खरेदीच सध्या ७५०० रुपये क्विंटलपर्यंत आहे. त्यामुळे तिकडे ज्वारी पाठविणे परवडत नाही. त्यामुळे निर्यात बंद आहे. ४० ते ४५ रुपये किलोदरम्यान दर असल्यास निर्यात करतो.’’

‘‘नवीन ज्वारीची आवक होईपर्यंत दर कमी होणार नाहीत. नवीन मालाच्या आवकेनंतरही दर फारसे घटणार नाहीत. ते ६ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत राहतील. कारण, दुष्काळी स्थितीमुळे यंदा उत्पादकता घटण्याची शक्यता आहे,’’ असेही मान यांनी सांगितले.

चोपडा (जि. जळगाव) येथील ज्वारीचे व्यापारी सतीश पाटील म्हणाले,‘‘ गेल्या वर्षी ज्वारीचे उत्पादन कमी राहिले. त्यामुळे दर वाढले आहेत. नवीन मालाची आवक होण्यास ३ ते ४ महिने बाकी आहेत. त्यामुळे मागणी कायम राहील.

नवीन आवकेनंतर दर ७ हजार रुपये इतका उच्चांकी कायम राहणार नसला, तरी तो ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या खाली येणार नाही. मुंबई, गुजरातमधून चांगल्या मालाला मोठी मागणी आहे. मात्र आवक खूपच कमी आहे.’’

Jowar
Jowar Sowing : रब्बी ज्वारीची ८ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी

राज्यातील ज्वारी दर स्थिती (बुधवारी, ता. २२)

ठिकाण...वाण...किमान...कमाल...सरासरी

सोलापूर...मालदांडी...६१००...६९००...६४५०

जालना...शाळू...२७९६...६५०१...४४००

पुणे...मालदांडी...५६००...६८००...६२००

छत्रपती संभाजीनगर... शाळू...४०००...४४००...४२००

मुंबई... लोकल...३५००...६०००...५०००

परतूर...शाळू...३९००...४४५०...४४००

पाथरी...पांढरी...३०००...४६००...४२००

बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदीचा दर ६ हजार ते ७२०० रुपये क्विंटल आहे. प्रक्रियाखर्च, वाहतूक आदींचा खर्च धरून व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या विक्रीचा दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. यंदा आवक कमी आहे. पेरणीही कमी आहे. त्यामुळे पुढेही आवक कमीच राहील. त्यामुळे दराने उच्च पातळी गाठली आहे.
- तानाजी मिठे, आडतदार, बार्शी बाजार समिती, जि. सोलापूर
मी बार्शी बाजार समितीत सोमवारी (ता. २०) ३० क्विंटल ३६ किलो ज्वारी विकली. त्यातून मला उच्चांकी ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. एकूण २ लाख १२ हजार ४२० रुपये मिळाले. इतका दर यापूर्वी कधीही मिळाला नव्हता.
- विवेकानंद चिपडे, शेतकरी, धस पिंपळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com