Nagar News : राज्यात ३० ऑक्टोबरपर्यंत झालेल्या रब्बीच्या पेरणीत गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ लाख ८० हजार हेक्टरने अधिक पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी राज्यात ३० आक्टोबरपर्यंत २ लाख ४० हजार ३२३ हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा सरासरीच्या तुलनेत ज्वारीची २७ टक्के पेरणी झाली आहे. ती गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट आहे. मका, हरभऱ्यासह गव्हाची पेरणी मात्र संथ गतीने होत आहे. यंदा कमी पावसामुळे रब्बी हंगाम संकटात असला तरी ज्वारीची पेरणी मात्र अधिक होण्याचा अंदाज आहे.
रब्बीत ज्वारी, हरभरा हे प्रमुख पीक आहे. मात्र मजुराची टंचाई, कष्टाच्या तुलनेत बाजारात मिळणारा दर परवडणारा नसल्याने अलीकडच्या काळात ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. मुळात ज्वारी हे कोरडवाहू भागातील पीक आहे.
मात्र गेल्या चार-पाच वर्षांत चांगला पाऊस झाल्याने ज्वारीच्या जागी अन्य पिके घेतली गेली. विशेषतः गहु, कांदा अधिक लावला गेला. गेल्यावर्षी राज्यात रब्बीतील उन्हाळ कांद्याची लागवड ३५ लाख हेक्टरच्या पुढे होते. गव्हाची १२ लाख १८ हजार, ज्वारीची साडेतेरा लाख, हरभऱ्याची २९ लाख ५६ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
यंदा मात्र राज्यातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्याचे परिणाम रब्बी पेरणीवर दिसत आहेत. सोलापूर, नगर, पुणे, सातारा, सांगली, जालना, बीड, धाराशिव जिल्ह्यांत ज्वारीला यंदा प्राधान्य दिले जात आहे.
हरभरा, गव्हाच्या पेरणीला फारसा वेग येताना दिसत नाही. हरभऱ्याची सरासरीच्या साडेचार टक्के म्हणजे ९१ हजार हेक्टर, गव्हाची अल्प म्हणजे सहा हजार हेक्टर, मक्याची १७ टक्के म्हणजे १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबिया, कडधान्याची पेरणीही अद्याप अल्पच आहे.
पेरणीला होतोय उशीर...
नगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात अजूनही दहा ते पंधरा टक्क्याच्या पुढे पेरणी गेलेली नाही. केवळ सांगली जिल्ह्यात ३० टक्क्यांपेक्षा अधिक पेरणी झाल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी अधिक पावसामुळे वापसा न झाल्याने रब्बी पेरणीला उशीर झाला होता. यंदा कमी पावसामुळे अनेक भागांत जमिनीत पुरेशी ओल नाही. त्यामुळे जमीन भिजवून पेरावे लागत असल्याने पेरण्यांना उशीर होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे...
- ज्वारीचे सरासरी क्षेत्र ः १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर
- यंदा ३० ऑक्टोबरअखेर ज्वारीची झालेली पेरणी ः ४ लाख ८१ हजार १७ हेक्टरवर
- गेल्यावर्षी ३० ऑक्टोबरअखेर झालेली ज्वारी पेरणी ः १ लाख ९८ हजार ८० हेक्टर
- यंदा ३० आक्टोबरपर्यंत ११.६१ टक्के म्हणजे ६ लाख २६ हजार ५४३ हेक्टरवर रब्बी पेरणी
- गेल्यावर्षी ३० आक्टोबरपर्यंत २ लाख २३ हजार ३२३ हेक्टरवर रब्बी पेरणी
रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र (हेक्टर)
- राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ः ५३ लाख ९६ हजार ९६९
- गहू ः १० लाख ४८ हजार ८०७
- तेलबिया ः ५५ हजार
- मका ः अडीच लाख
- इतर कडधान्ये क्षेत्र ः १ लाख १७ हजार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.