
Pune News: हरभरा उत्पादकांना अडचणीत आणणाऱ्या पिवळा वाटाण्याच्या मुक्त आयातीला केंद्र सरकारने ३ महीन्यांची मुदतवाढ दिली. या काळात आणखी ४ ते ५ लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकते, असा अंदाज आहे. त्यामुळे बाजारात आता शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची आवक आणि पिवळा वाटाणा आयात यामुळे दबाव वाढण्याची शक्यता आहे. बाजारात आवकेचा दबाव असेपर्यंत हरभरा हमीभावापेक्षा कमी दरात विकला जाऊ शकतो, असा अंदाजही अभ्यासकांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने पिवळा वाटाण्याची मुक्त आयातीला ३१ मे २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगाने याविषयी अधिसूचना काढली आहे. म्हणजेच पिवळा वाटाणा आयातीवर कोणत्याही प्रकारचे किमान आयात मूल्य किंवा आयात शुल्क लागणार नाही. तसेच आयात कोटाही नसेल. मात्र आयात करताना इम्पोर्ट माॅनिटरिंग सिस्टमवर त्याची नोंद करावी लागेल. केंद्र सरकारने उडदाच्या मुक्त आयतीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत भारतात कोणत्याही बंधनाशिवाय उडीद आयात होणार आहे.
मागील वर्षभर वाटाण्याच्या मुक्त आयातीमुळे हरभरा आणि तुरीचे भाव कमी होण्यास मदत झाली. हरभऱ्याचा भाव मोठ्या प्रमाणात तुटला होता. आतातर हरभऱ्याचे भाव हमीभावाच्या खाली आले आहेत. तुरही हमीभावाच्या खाली विकली जात आहे. सरकारच्या धोरणामुळे केवळ शेतकरीच नाही तर व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगही अडचणीत आले आहेत.
दिल्ली येथील आयग्रेन इंडियाचे संचालक आणि बाजार विश्लषक राहूल चौहान यांनी सांगितले की, आयातीला मुदतवाढ मिळाल्याने ३१ मेपर्यंत आणखी ४ ते ५ लाख टन पिवळा वाटाणा आयात होऊ शकते. भारताला कॅनडातून मोठ्या प्रमाणात आयात होईल. तसेच रशिया, टर्कि, युक्रेन, लिथुआनिया, लॅटविया आदी देशांमधूनही आयात होऊ शकते.
चीनने नुकतेच कॅनडामधून आयात होणाऱ्या पिवळा वाटाण्यावर १०० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्यामुळे कॅनडाचा चीनकडे जाणारा पिवळा वाटणा भारतात येऊ शकतो, असे अभ्यासकांनी सांगितले. सध्या शेतकऱ्यांचा माल बाजारात येत आहे. आवकेचा दबाव वाढत आहे. आता त्यातच पिवळा वाटाणाही आयात होणार आहे. म्हणजेच हरभरा बाजारावर आता शेतकऱ्यांच्या मालाची आवक आणि पिवळा वाटाण्याची आयात याचा दबाव असणार आहे. हरभऱ्याला सरकारने यंदा ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. आयातीमुळे आवकेचा दबाव असेपर्यंत बाजार हमीभावाच्या खालीच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.