
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage Due To Heavy Rain) झाल्यामुळे महागाईत (Inflation) आणखी भर पडण्याची शक्यता आहे. म्हणजे अन्नधान्याच्या किंमती (Food Grain Rate) वाढू शकतात. खराब पीक (Damaged Crop) आणि चढ्या किंमती या दोन्हींचा फटका भारतातील लाखो ग्रामीण गरीबांना बसण्याची शक्यता आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने यासंबंधीची बातमी दिली आहे. अन्नधान्यच नाही तर भाज्या, दूध, कडधान्ये आणि खाद्यतेलाच्या किंमती (Edible Oil Rate) सुद्धा वाढत आहेत. आणि आगामी काळात हे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, सप्टेंबर महिन्यात सरासरी भाववाढ ७.४१ टक्के इतकी होती, ती आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे. कारण मागच्या वर्षी याच महिन्यात निर्देशांकात वाढ झाली होती. पण धान्य, भाजीपाला आणि दूध यांच्या किंमती दबावात राहतील. भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या (Reserve Bank of India) मते, सप्टेंबर महिन्यापासून सरासरी भाववाढ कमी व्हायला सुरुवात झालीय. मात्र भाववाढ कमी करण्यासाठी दीर्घकाळ सातत्य ठेऊन प्रयत्न करायला हवेत.
महागाई वाढण्यासोबतच अन्नधान्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. मात्र त्या तुलनेत मजुरी वाढलेली नाहीये. दरम्यान, वाढतं उत्पन्न आणि खपातील तेजी यामुळे एप्रिल-मार्च या चालू आर्थिक वर्षात ७ टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने १३ ते १९ ऑक्टोबर दरम्यान जो पोल घेतला होता त्यानुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत आर्थिक वाढ मंदावली असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात मजुरी करणारे पोपट पवार सांगतात, हाताला काम तर मिळतंय पण मजुरीत काही वाढ झालेली नाही. म्हणजे त्यांचे मालक त्यांची मजुरी वाढवायला तयार नाहीत. ४३ वर्षांचे पोपट पवार म्हणाले, "खाद्यतेलापासून भाजीपाल्यापर्यंत सगळ्याचं वस्तुंचे भाव वाढलेत, अगदी दुधाचे दर सुद्धा वाढलेत. आता जी मजुरी मिळते त्यात घरखर्च चालवणं अवघड झालंय. जी काही बचत होती ती कोरोनाच्या काळात संपून गेली."
पुणे जिल्ह्यातील कोठारणी गावातील भात उत्पादक शेतकरी बबन पिंगळे म्हणाले, "डिझेलच्या आणि खतांच्या किंमती वाढल्यात. त्यामुळे उत्पादन खर्चात सुद्धा वाढ झालीय. त्यामुळे मजुरी वाढवायची कशी? याव्यतिरिक्त आम्हाला घरखर्चही असतो."
पिंगळे सांगतात, "आम्ही फक्त भाताचं पीक घेतो. बाकीच्या गोष्टी तर आम्हाला विकतच घ्याव्या लागतात. आम्हाला सुद्धा महागाईची झळ बसतेय. आता अशा वातावरणात भाताचं उत्पादन किती होणार हे सांगणं सुद्धा अवघड आहे. अवकाळी पावसाने आमच्या भातशेतीचं नुकसान झालंय."
मोफत अन्नधान्य योजना सुरू ठेवणं कितपत शक्य?
वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बॅँकेला व्याजदर वाढवावे लागतील. या वर्षाच्या अखेरीस काही राज्यांमध्ये निवडणूका येऊ घातल्यात. अशा परिस्थितीत तिथल्या ग्रामीण भागात ज्या समस्या आहेत त्यावर सरकारला उत्तरं देणं भाग आहे. त्यामुळे मागच्या महिन्यात केंद्र सरकारने मोफत अन्न कार्यक्रम योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवलाय. पण व्यापाऱ्यांच्या मते, सरकारी गोदामात अन्नधान्याची कमतरता आहे आणि अशात हा कार्यक्रम जास्त काळ पुढे खेचता येणार नाही. एक ऑक्टोबर अखेर पर्यंत सरकारी गोदामात २२.७ दशलक्ष टन इतका गव्हाचा साठा आहे. एका वर्षांपूर्वी हाच साठा ४६.९ दशलक्ष टन इतका होता.
पण सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गोदामात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अन्नधान्याचा पुरवठा कमी असल्यामुळे स्थानिक बाजारात दर वाढले आहेत. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक पातळीवर गव्हाचे दर चढे आहेत, त्यामुळे गव्हाची आयात करणंही शक्य नाहीये. मध्यंतरी काळात खाद्यतेलाचे दर उतरले होते. आता परत दरांनी उसळी घेतलीय. पामतेल उत्पादक देशात अतिवृष्टी झाल्याने तिथलं उत्पादन विस्कळीत झालं आहे. तर काळ्या समुद्राच्या प्रदेशातून सूर्यफूल तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे, असे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे (SEA) कार्यकारी संचालक बीव्ही मेहता यांनी रॉयटर्सला सांगितले.
दरम्यान, दूध पावडर आणि बटरची निर्यात वाढल्याने दुग्धजन्य उत्पादनांचा साठा संपत आला आहे, असे नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी सांगितले. या सगळ्याचा परिणाम म्हणून आघाडीच्या दूध उत्पादक संस्थांनी दुधाचे दर वाढवल्याचंही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, "दुधाचं उत्पादन वाढलं असलं तरी, दुग्धजन्य पदार्थांचा साठा कमी होत असल्याने दर कमी होण्याची शक्यता नाही."
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.