
Ratnagiri News : हापूससह प्रक्रिया उत्पादने रत्नागिरीतून थेट परेदशात निर्यात करण्यासाठीची सुविधा पोस्ट विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. गतवर्षी जिल्ह्यातून ५८८ ग्राहकांनी परदेशात वस्तू पाठवल्या होत्या.
त्याद्वारे १० लाखांचा महसूल मिळाला. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून रत्नागिरीतील मुख्य कार्यालयात डाक निर्यात केंद्र सुरू करण्यात आले आहे. याद्वारे वस्तूंचे व्यवस्थित पॅकिंग करून खासगीपेक्षा पन्नास टक्के कमी दराने वस्तू परदेशात पाठविण्यात येणार आहेत.
शहरातील लक्ष्मीचौक येथील मुख्य कार्यालयात डाक घर निर्यात केंद्राचे उद्घाटन आंबा व्यावसायिक आंनद देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी डाक अधीक्षक एन. टी. कुरलपकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. देसाई यांनीही समाधान व्यक्त करतानाच आंबा पल्प परदेशात पाठविण्यासाठी याचा सर्वाधिक फायदा आम्हाला होईल, असे सांगितले.
आतापर्यंत देसाई यांच्यासह अन्य बागायतदार किंवा स्थानिक नागरिक आपल्या नातेवाईकांना परदेशात वस्तू पाठविण्यासाठी खासगी सेवांचा वापर करत होते. त्याचा खर्च अधिक होत होता. मात्र पोस्ट खात्याकडून परदेशात वस्तू पाठविण्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण केली आहे.
डाक निर्यात केंद्राविषयी बोलताना डाक अधीक्षक कुरलपकर म्हणाले, की परदेशात मोठ्या प्रमाणात वस्तू पाठवल्यात जात आहेत. यामध्ये रत्नागिरीतील देसाई यांच्याकडून पल्पची निर्यात होते.
अशा प्रकारच्या मठ्या ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांना पोस्टाची ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये वस्तूच्या वजनाप्रमाणे पॅकिंगसाठी बॉक्स दिले जाणार आहेत. ग्राहकांची जीएसटी नोंदणी झाली की त्या वस्तू परदेशातील पोस्टापर्यंत व्यवस्थितरीत्या पोहोच केल्या जातील.
प्रत्येक ठिकाणी वस्तूची काळजी घेतली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून गतवर्षी ५८८ लोकांनी परेदशात पार्सल पाठवली. यामध्ये सर्वाधिक आंबा पल्पचा समावेश आहे. अमेरिका, कॅनडा, रशिया, इंग्लड, फ्रान्स या देशांत सर्वाधिक वस्तू गेल्या आहेत. निर्यात केंद्राचा या लोकांना फायदा होणार आहे.
नवी मुंबईतून फळ, भाजीपाला तर सोलापूरात हॅण्डलूमच्या वस्तू निर्यात होतात. कोकणातून फराळ, पल्प, आंबा पाठवणे शक्य आहे. खासगी सेवांपेक्षा पोस्टाचे निर्यातीचे दर ५० ते ६० टक्के कमी राहतील. रत्नागिरीबरोबर चिपळूणलाही हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी साडे सोळा लाखांचा खर्च
पोस्ट खाते कात टाकत असून ग्राहकांच्या मागणीनुसार बदल केले जात आहेत. नेट कनेक्टिव्हिटीमधील अडथळे दूर करण्यासाठी जिल्ह्यातील ३० डाक घर ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आली आहेत. त्यासाठी १६ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे गेले वर्षभर कनेक्टिव्हिटी वेगवान झाली आहे
तसेच पोस्टात टाकलेले टपाल रत्नागिरीतून मंडणगडला पोहोचण्यास दोन दिवस लागत होते. पोस्टाचे स्वतःचे टपाल वाहन असल्यामुळे दुपारपर्यंत टपाल मंडणगडला पोहोचते. आता एसटीवर अवलंबून रहावे लागत नाही. लवकरच राजापूर, देवरुखलाही टपाल वाहन सुरू केले जाणार असल्याचे कुरलपकर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.