Pomegranate Export : दुष्काळी स्थितीतही डाळिंबाची निर्यात

Pomegranate Production : यंदा कमी पर्जन्यमान, घटलेली भूजल पातळी, वातावरणीय बदलांचा फटका व तापमान वाढ यामुळे कसमादे भागातील शेतकरी यंदा अडचणीत सापडले आहे.
Pomegranate Fruit
Pomegranate FruitAgrowon

Nashik News : यंदा कमी पर्जन्यमान, घटलेली भूजल पातळी, वातावरणीय बदलांचा फटका व तापमान वाढ यामुळे कसमादे भागातील शेतकरी यंदा अडचणीत सापडले आहे. त्यामध्ये सर्वाधिक दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.

त्यात मालेगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने बागा जगविण्यासाठी मोठा संघर्ष शेतकऱ्यांनी केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत बागा जगविण्यासह निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळेच युरोप, आखाती देश, रशिया व बांगलादेशमध्ये यंदा यशस्वीपणे निर्यात झाली.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात २६ हजार ५८ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवडी आहेत. मात्र तेलकट डाग रोग, मर रोग व पाणी टंचाई अशा विविध कारणांमुळे बागा काही शेतकऱ्यांनी काढून टाकल्या.मात्र सटाणा व मालेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांनी या बागा टिकवून ठेवल्या आहेत.

येथे सर्वाधिक अनुक्रमे १०,८९३ व ९,८०० हेक्टर लागवडी आहेत. त्यापैकी अंदाजे १५०० ते २००० एकरवर हस्त बहार उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा दुष्काळाच्या छायेत आव्हानात्मक परिस्थितीत बागा जगविल्या.

Pomegranate Fruit
Pomegranate Crop : पाणीटंचाईचे डाळिंबाच्या अंबिया बहारावर सावट

एवढेच नव्हे तर निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेत घोडदौड कायम ठेवली. त्यामुळे व्यापारी व निर्यातदारांच्या पसंदीला माल उतरला. त्यामुळे निर्यातीच्या कामकाजात सातत्य राखले गेले. डाळिंब फळांचा आकार चमक व रंग यामुळे व्यापारी व निर्यातदारांकडून मागणी होती. त्यामुळेच युरोप, आखाती देश, रशिया, बांगलादेशमध्ये निर्यात झाली.

देशांतर्गत दिल्ली, कोलकाता व बंगळुरू येथेही पुरवठा झाला. प्रतवारीनुसार यंदा किमान ७०, कमाल १४० तर सरासरी १०० रुपये दर मिळाला आहे. सध्या गुजरात राज्यात आवक वाढल्यामुळे मागणी तुलनेत कमी झाली आहे.

Pomegranate Fruit
Pomegranate Farming : ‘डॉलर अर्नर’ला वाचवा

डाळिंबाच्या उत्पादनात सातत्य

शेतकरी डाळिंबाचे मृग, हस्त आणि आंबिया असे तीनही बहार घेत असतात. परंतु संरक्षित पाणी असल्यास हस्त बहार धरणे फायद्याचे ठरते. त्यामुळे पाण्याच्या नियोजनानुसार शेतकरी पीक घेतात.

मात्र यंदा मालेगाव तालुक्यात सरासरी पर्जन्यमान २५ ते ३० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे हस्त बहार घेताना परिस्थिती अडचणीची होती. मात्र पाइपलाइनद्वारे शेत तळ्यात संरक्षित पाणीसाठा करून त्याचा कार्यक्षम वापर सूक्ष्म सिंचनातून केला. याशिवाय शेडनेट, सेंद्रिय आच्छादन वापरून केलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत.

प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन घेतलेली गावे

सातमाने, दुंधे, तळवाडे, वडनेर, अजंग, वडेल, जळकु, येसगाव, शिरसोंडी, विराणे, रावळगाव, कजवाडे, आघार, टिंगरी, डोंगराळे आदी. याशिवाय सटाणा तालुक्यातील वायगाव, लखमापूर येथे ही प्रतिकूल परिस्थितीत उत्पादन घेतले आहे.

यंदा पाण्याची परिस्थिती खूप गंभीर आहे अशा प्रतिकूल परिस्थितीत सिंचनाचे काटेकोर नियोजन केले. काही ठिकाणी पाणी नसल्याने शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी विकत घेऊन बागा जगवल्या. तर काहींनी शेडनेट सेंद्रिय आच्छादनाचा प्रयोग करून बागा टिकवून उत्पादन यशस्वीरीत्या घेतले आहे.
- रवींद्र पवार, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक व संशोधन संघ
सुरुवातीला पानगळीच्या वेळी नर फुलांचे प्रमाण अधिक होते. त्यावेळी वातावरण बदलामुळे मादी फुलांची गळ अधिक झाली. त्यात अवेळी पाऊस व ऋतू बदलाच्या काळात जानेवारी महिन्यात तेलकट डाग रोगामुळे नुकसान झाले. फेब्रुवारी महिन्यातील दव व धुक्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होता. रात्री थंडी व दिवसाचा उन्हाचा चटका यामुळे फळे तडकण्याच्या समस्या आहे. त्यात पाण्याची समस्या हंगामभर सर्वाधिक होती. मात्र लढून हे उत्पादन हाती आले आहे.
- शिवाजी जाधव, डाळिंब उत्पादक शेतकरी, टिंगरी, ता. मालेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com