
सांगली ः जिल्ह्यातील मणेराजुरी, बेळंगी या परिसरात सध्या आगाप फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षांची काढणी (Grape Harvesting) सुरू झाली आहे. यंदा प्रतिकूल परिस्थतीतून तयार झालेली द्राक्ष बाजारपेठेत (Grape Market) येऊ लागली आहेत.
सध्या द्राक्षाला प्रतिकिलोस ६० ते ७० रुपये दर (Grape Rate) मिळत आहे. येत्या आठवड्यात द्राक्ष हंगामास गती येईल, अशी शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्षाच्या दरात अपेक्षित सुधारणा झाली आहे.
जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र सव्वा लाख एकर आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आगाप द्राक्ष फळ छाटणी घेण्याची परंपरा आहे. आगाप फळ छाटणी घेतलेली द्राक्ष नाताळ सणापासून विक्रीस येतात. डिसेंबरपासून द्राक्ष हंगामाची थोडीफार लगबग सुरू होते.
जानेवारीपासून द्राक्ष खरेदीसाठी देशभरातील व्यापारी सांगली जिल्ह्यात दाखल होतात; मात्र, यंदाच्या हंगामात पावसाच्या भीतीने फळ छाटणी विलंबाने सुरू झाली. परंतु फळ छाटणीनंतरही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला. परिणामी द्राक्ष फळ छाटणीचे नियोजन कोलमडले. पावसाने उघडीप दिल्यानंतर फळ छाटणी सुरू झाली.
दरम्यान, त्यानंतर द्राक्ष बागेवर नैसर्गिक आपत्तीचे संकट आले नाही. बागेला पोषक वातावरण असल्याने बागा चांगल्या फुलल्या. आगाप फळ छाटणी १२ हजार एकरावर झाली आहे. सध्या कवठे महांकाळ तालुक्यातील काही भागांत, मिरज तालुक्याचा पूर्व भाग, तर तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात आगाप हंगामातील द्राक्षाची काढणी सुरू आहे.
तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बांगलादेश, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई भागांतील व्यापारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ५० हजार एकरावरील द्राक्ष पंधरा दिवसांनंतर काढणीसाठी येतील. जानेवारीच्या मध्यावर हंगामास गती येणार असून द्राक्षाचे दर टिकून राहतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
द्राक्षाचे दर (प्रति किलोचे)
प्रकार ः दर (रुपये)
सुपर सोनाक्का, आर के., एस.एस. ः ६० ते ७०
माणिक चमन ः ५० ते ६०
सोनाक्का ः ५० ते ६०
कृष्णा सीडलेस ः ११० ते १२०
ज्योती सीडलेस ः १२५ ते १३०
यंदाच्या हंगामातील द्राक्ष काढणी सुरू झाली असून व्यापारीही दाखल झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्षाला चांगले दर आहेत. येत्या पंधरा दिवसांत हंगामाची गती वाढेल
- मारुती चव्हाण, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.