Kolhapur News : देशातील कारखान्यांकडे मार्चअखेर शिल्लक असलेल्या बी हेवी मोलॅसिसचे रूपांतर इथेनॉलमध्ये करण्यासाठी आता यंदाच्या तिमाहीपासूनच (मे, जून, जुलै) परवागनी देण्यात आली आहे. पूर्वनियोजनानुसार ऑगस्टपासून परवानगी देण्याचे केंद्र सरकारने ठरवले होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने याबाबत सातत्याने पाठपुरावा करून रूपांतराची परवानगी याच तिमाहीमध्ये करण्याची मागणी केली होती, त्याला यश आले आहे.
नवी दिल्ली येथे नुकतीच महासंघाचे पदाधिकारी, पेट्रोलियम मंत्रालयाचे संचालक तसेच साखर विभागाचे सहसचिव व मुख्य संचालक यांची सहकार विभागाचे सचिव डॉ. आशिष कुमार भूतानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बाबत वरील प्रकारचा मार्ग काढण्याबाबत सूचित करण्यात आले.
साखर उद्योगाच्या विविध समस्यांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्र दिले होते. या पत्रामध्ये साखरेपासून इथेनॉल तयार करणे आणि साखर साठ्याविषयीच्या समस्या मांडण्यात आल्या होत्या.
श्री. शहा यांनी या निवेदनाची दखल घेत बैठक घेऊन समस्या सोडवण्याबाबतची सूचना सहकार सचिव यांना केली आणि यानुसार ही बैठक झाली. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे हेही बैठकीस उपस्थित होते.
बैठकीमध्ये साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मार्चअखेर शिल्लक बी हेवी मोलॅसिसपासून आणखी इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र शासनाने ऑगस्टपासून परवानगी दिली आहे. पण असे केल्यास सहकारी कारखान्यांचे मोठे नुकसान होईल आणि निर्णयाचा काहीच फायदा होणार नाही, अशी भीती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये व्यक्त केली.
तातडीने इथेनॉलनिर्मिती झाल्यास याचा फायदा तेल कंपन्यांनाही होऊ शकेल, असेही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर मार्चअखेर ज्या कारखान्याकडे बी हेवी मोलॅसिस शिल्लक आहे, त्या कारखान्यांना तातडीने इथेनॉल तयार करण्याच्या सूचना देण्यासाठी अन्न मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय आणि साखर महासंघ यांनी एकत्रित बसून पुढील कार्यवाही करावी, असे ठरविण्यात आले.
कारखान्यांकडील मोलॅसिसच्या साठ्याची माहिती घेणे सुरू
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले, की याबाबत आम्ही देशभरातील सहकारी साखर कारखान्यांकडे बी हेवी मोलॅसिसचा किती साठा शिल्लक आहे आणि त्यापासून किती इथेनॉल होईल याबाबतची माहिती घेऊन ती संबंधित विभागाकडे सादर करत आहोत. जेणेकरून यावर तातडीने निर्णय होऊ शकेल आणि त्याचा सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळू शकेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.