Sugar Market Update : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला असला तरी साखरेची मागणी मात्र अपेक्षित नसल्याचे विपरीत चित्र सध्या आहे. एप्रिलच्या तुलनेत मागणी फारशी नसल्याने दरही स्थिरच आहेत. सध्या राज्यात साखरेचे दर प्रति क्विंटल ३३७५ ते ३४७५ रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत.
यंदा मार्चपासून स्थानिक बाजारात साखरेच्या दरात हळूहळू वाढ झाली. तत्पूर्वी साखरेचे दर एमएसपीपेक्षा थोडे अधिक म्हणजे क्विंटलला ३१०० ते ३२०० रुपये होते. उन्हाळा सुरू झाल्यानंतर शीतपेय, आईसक्रीम उद्योगातून मागणी वाढू लागल्यानंतर स्थिर असणाऱ्या दरात ही वाढ होऊ लागली.
एप्रिलमध्ये साखरेला मागणी वाढल्यानंतर दरातही क्विंटलला २०० रुपयांपर्यंत वाढ झाली. यंदा देशभरात उन्हाळा कडक असल्याने मे मध्येही साखरेची मागणी वाढून राहील, अशी अटकळ साखर उद्योगाची होती.
जसा मे महिना सुरू झाला तशी मागणी कमी होऊ लागली. ज्या साखर कारखानदारांनी जादा दर मिळेल या अपेक्षेने साखर विक्रीचे नियोजन केले होते. त्यांना मागणी घटल्याने धक्का बसला. साखर कारखानदारांची साखर विक्रीची इच्छा असूनही दर कमी मिळत असल्याने अडचण निर्माण झाली.
मागणीही फारसी नसल्याने ऐन उन्हाळ्यातही साखर कारखाने साखर विक्रीसाठी धडपडत असल्याचे साखर कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यानंतर मागणी कमी होण्याची शक्यता असल्याने अनेक कारखाने मिळेल त्या दरात साखर विक्री करत आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शीतपेय उत्पादक कंपन्या फेब्रुवारीपासून साखर खरेदीस प्रारंभ करतात. मे मध्येही दुसऱ्या टप्प्यातील खरेदी सुरू असते. पण जितका उत्साह या कंपन्यांनी सुरुवातीला साखर खरेदीला दाखवला. तितके स्वारस्य मे मध्ये या कंपन्यांकडून दाखवले गेले नाही, याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाला असल्याचे व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले.
‘एमएसपी’त वाढच हवी
मार्चनंतर साखर किमतीत वाढ होत असताना मे मध्ये अचानक दरवाढीला ब्रेक लागला. जर मागणी कमी झाली तर दर ३१०० रुपयांपर्यंतही घसरू शकतात, अशी भीती एका साखर कारखानदाराने व्यक्त केली.
यामुळे कारखान्याचे अर्थकारण अडचणीत येऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्राने कोणत्याही परिस्थितीत किमान विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करून साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे या कारखानदाराने सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.