
Onion Market Update जळगाव ः खानदेशात कांदा आवक (Onion Arrival) किंचित कमी झाली असून, दरही (Onion Rate) ६०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.
कांद्याची आवक सध्या धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर (ता. साक्री) धुळे, जळगाव, चाळीसगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील बाजारात होत आहे. जळगाव येथील बाजारात (Onion Market) मागील काही दिवसांत लाल कांद्याची आवक सुमारे १०० प्रतिदिन एवढी कमी झाली आहे.
चाळीसगाव, अडावद येथेही आवक काहीशी कमी झाली आहे. जळगाव येथील बाजारात साक्री, चोपडा, यावल, जळगाव भागातून कांद्याची आवक होत आहे. या बाजारात कांद्याला किमान ६०० व कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.
सध्या आगाप लागवडीच्या उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये लाल कांद्याची लागवड केली होती. या कांद्याची काढणी अनेक भागात सुरू आहे. काही भागात शेतकऱ्यांनी काढणी रोखली आहे.
कारण सध्याचे दर संबंधितांना परवडणारे नाहीत, असे सांगितले जाते. परंतु अनेकांनी काढणी करून कांद्याची बाजारात पाठवणूक सुरू केली आहे. या कांद्याचे दर स्थिर आहेत.
ऑक्टोबरध्ये काही दिवस लाल कांद्याला कमाल २००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. जळगाव येथील बाजारात सध्या प्रतिदिन ४०० क्विंटल एवढी कांद्याची आवक होत आहे.
पांढऱ्या कांद्याची अत्यल्प आवक यात आहे. धुळे येथील बाजारातही सध्या प्रतिदिन ६०० क्विंटल एवढी आवक होत आहे. अडावद, किनगाव येथील बाजारात यापेक्षा कमी आवक होत आहे.
धुळे, शिरपूर, चोपडा, यावल भागातील काही शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर येथेही कांद्याची पाठवणूक करीत आहेत. तेथे दर्जेदार कांद्याला २२०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दर मिळाले आहेत. इंदूर बाजार समिती २४ तास सुरू असते.
यामुळे तेथे हव्या त्या वेळी कांद्याची पाठवणूक केली जात आहे. उन्हाळ कांद्याची लागवड मागील आठवड्यात अनेकांनी पूर्ण केली आहे. या क्षेत्रातून एप्रिलमध्ये कांद्याची काढणी सुरू होईल. दरम्यानच्या काळात कांद्याची आवकही बाजारात कमी राहील, असेही संकेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.