
Cotton Price Crash : कोरोना काळात उच्चांकी भावपातळी दाखवणाऱ्या कापसाचे भाव सलग पाचव्या वर्षी कमी झाले. यंदा उत्पादन कमी राहूनही कापसाच्या भावाने अनेक वर्षांतील नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे जागतिक पातळीवर कापडाला मागणी आहे. पण कापडाची मागणी ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात कापसाची मागणी वाढली नाही.
त्याऐवजी मानवनिर्मित धागा, कापसाचा पुनर्वापर करून तयार केलेले कापड आणि मिश्रित धाग्याच्या कापडाला मागणी वाढल्याचे उद्योगांचे म्हणणे आहे. अनेक अहवालही हेच दर्शवीत आहेत. परिणामी, कापसाचे उत्पादन कमी राहूनही दर कमी झाले आहेत. त्यामुळे कापड बाजारातील बदलता ट्रेंड लक्षात घेणे आवश्यक आहे.
देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एखाद्या वस्तूचे उत्पादन कमी झाल्यानंतर त्याचे भाव वाढतात, असा अनुभव साधारणपणे बाजारात येत असतो. ज्या मालाला पर्याय नसतो किंवा कमी प्रमाणात पर्याय उपलब्ध असतात, त्या मालाच्या बाबतीत हा ठोकताळा लागू पडतो. मात्र अनेक शेतीमालाच्या वापराला कमी अधिक प्रमाणात पर्याय उपलब्ध असतात. सोयाबीनला इतर तेलबिया पर्याय ठरू शकतात.
देशात इथेनाॅलमुळे मागील दोन वर्षांत मक्याला चांगला दर मिळाला होता. पण आता इथेनाॅलसाठी तांदूळ आणि पुढील काही महिन्यांत उसाचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मक्याच्या दरवाढीवर मर्यादा येत आहेत. जागतिक पातळीवर साखर निर्मितीसाठी उसाला बीटसारखा पर्याय उपलब्ध आहे.
कडधान्य एकमेकांना काही प्रमाणात पर्याय ठरत आहेत. शेतीमालाला पर्याय किती प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यानुसार त्यांच्या भाववाढीवर मर्यादा येतात. एखाद्या मालाला जर जास्त प्रमाणात इतर माल पर्याय म्हणून वापरला जात असेल तर त्या मालाचे भाव त्या पर्यायी मालासोबत चालताना दिसतात. कापसाच्या बाबतीत तेच घडताना दिसत आहे.
कापसाला पर्याय
मागील काही वर्षांपासून कापसाला इतर प्रकारचे सूत पर्याय ठरत आहेत. विशेष म्हणजे कापड निर्मितीसाठी कापसाऐवजी या सुताचे प्रमाण वाढत आहे. कापड निर्मितीसाठी बांबू, ताग तसेच इतर वनस्पतींपासून तयार होणार धागा यांचा वापर होतो. परंतु त्याचा फार मोठा परिणाम कापसाच्या वापरावर होत नाही. मात्र याच्या उलट स्थिती मानवनिर्मित धाग्याची आहे. हा धागा कापसाच्या मागणीवर मोठा परिणाम करत आहे.
मानवनिर्मित धाग्यामुळे कापसाची मागणी कमी होऊन दरावरही दबाव येत असल्याचे मागील काही वर्षांपासून दिसत आहे. कापड उद्योगाकडून प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहेत. एकतर मानवनिर्मित धाग्याचे कमी भाव आणि दुसरे म्हणजे टिकवणक्षमता.
कापसाला मानवनिर्मित धाग्याचा पर्याय काही आजचा नाही. मानवनिर्मित धागा तयार करण्याचे प्रयोग अगदी १७ व्या शतकात सुरू झाल्याचे संदर्भ आहेत. तर १९ व्या शतकात मानवनिर्मित धाग्यापासून कापड तयार केल्याचे संदर्भ सापडतात. तेव्हापासून मानवनिर्मित धाग्यापासून कापड निर्मिती केली जात आहे.
कापूस आणि मानवनिर्मित धाग्याचे मिश्रण करून कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. मानवनिर्मित धाग्यापासून कापड निर्मिती बऱ्याच वर्षांपासून केली जात आहे. पण खरी समस्या सुरू झाली ती कापसाचा वाढत्या उत्पादन खर्चामुळे. निविष्ठांच्या किमती मागील काही वर्षांपासून वाढत आहेत.
त्यामुळे कापसाचा उत्पादन खर्चही वाढत आहे. केवळ भारतच नाही तर जगातील सर्वच देशांमध्ये उत्पादन खर्च वाढल्याचे अहवाल आहेत. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, चीन या देशांमध्ये कापसाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कापसाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना जास्त किमतीची अपेक्षा आहे.
मात्र दुसरीकडे कापसाला पर्याय असलेल्या मानवनिर्मित धाग्याचे भाव कमी आहेत. तसेच कोरोना काळात कापसाचे भाव वाढल्याने मानवनिर्मित धाग्याच्या वापराला जास्त प्रोत्साहन मिळाले. तसेच कापसाचा पुनर्वापर वाढला. त्यामुळे कापसाच्याही भाववाढीवर मर्यादा येत आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बीएमआय रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार, कापसाच्या वाढलेल्या भावामुळे कापडही महाग होत आहे. पण ग्राहकांचा ओढा स्वस्त कापडाकडे आहे. त्यामुळे मानवनिर्मित धाग्यापासून कापड निर्मिती वाढत आहे. याचा परिणाम कापसाच्या मागणीवर होत आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन कमी राहूनही कापसाचे भाव दबावातच राहत आहेत. परिणामी कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
कोरोना काळात या बदलाची सुरुवात झाल्याचे उद्योगाकडून सांगण्यात आले. त्या वेळी पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कापसाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे कापसाचे भाव वाढले होते. काही काळ कापूस खंडीचे भाव १ लाखांच्या दरम्यान पोहोचले होते.
बराच काळ भाव ७५ हजार रुपयांच्या पुढे होते. त्यामुळे जागतिक पातळीवर कापड निर्मितीसाठी स्वस्त पर्यायांना पसंती मिळत गेली. कारण कोरोना काळात ग्राहकांची क्रयशक्तीही कमी झाली होती.
त्यामुळे कापसात मानवनिर्मित धाग्याचे मिश्रण करून कापड निर्मिती करण्याचे प्रमाण वाढले. केवळ कापसापासून कापड निर्मिती करण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कापडाला दरवर्षी ज्या प्रमाणात मागणी वाढली त्या प्रमाणात कापसाला मागणी येत नाही. कापसाऐवजी मानवनिर्मित धाग्याची मागणी जास्त प्रमाणात वाढल्याचे उद्योगांनी सांगितले.
सध्या तयार होणाऱ्या एकूण कापडामध्ये फक्त कापसापासून तयार होणाऱ्या कापडाचे प्रमाण फक्त ३० टक्के आहे. तर मानवनिर्मित धागा मिश्रित आणि कापसाचा पुनर्वापर करून केलेली कापड निर्मिती ७० टक्के होत आहे. याचा परिणाम कापसाच्या दरावर होत आहे. सध्या कापसाच्या धाग्याची, सुताची किंमत मानवनिर्मित धाग्यापेक्षा किमान ५० टक्के जास्त आहे.
तर कापसाचा पुनर्वापर करून तयार केलेल्या सुतापेक्षा चार पटीने जास्त आहे. कापसाच्या धाग्याची सर्वांत कमी किंमत सध्या २२० रुपये प्रति किलो आहे. तर गुणवत्तेच्या मानवनिर्मित धाग्याचे मिश्रण करून तयार गेलेल्या धाग्याचे दर केवळ १५० रुपये किलो आहेत. गुणवत्तापूर्ण कापसाचा धागा तर आणखी महाग आहे. त्यामुळे कापसामध्ये मानवनिर्मित धाग्याचे मिश्रण करून कापड निर्मिती वाढली आहे.
फक्त कापसापासून कापड तयार केल्यास दर जास्त पडतो. त्यामुळे जास्त उत्पन्न असलेल्या ग्राहकांचीच या कापडाला मागणी असते. या कापडाची देशात मागणी कमी प्रमाणात आहे. तर मिश्रित कापडाची मागणी जास्त आहे.
अमेरिका, युरोप, इंग्लंड अशा बाजारांमध्ये या कापडाला मागणी आहे. या देशांना भारतातून निर्यातही केली जात आहे. फक्त कापसापासून स्वस्त कापड निर्मिती केल्यास गुणवत्ता कमी येते. त्याच किमतीत मिश्रित धाग्यापासून तयार केलेले कापड चांगल्या गुणवत्तेचे मिळते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत या कापडाला जास्त पसंती आहे.
कच्च्या इंधनाचे भाव
देशात किंवा जागतिक पातळीवर कापडाला ज्या प्रमाणात मागणी वाढत आहे त्या प्रमाणात कापसाला मागणी वाढली नाही. ही मागणी जास्त प्रमाणात स्वस्त मिश्रित धाग्याकडे गेली. तसेच कापसाचे भाव वाढल्यानंतर कापड निर्मिती करताना कापसाऐवजी या मानवनिर्मित धाग्याचा वापर वाढत गेला. ज्या काळात मानवनिर्मित धागा निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या इंधनाचे भाव वाढले त्या काळात कापसाचेही भाव वाढलेले पाहायला मिळाले.
मागील चार वर्षांत अनेकदा कच्च्या इंधनाचा पुरवठा कमी होऊन दर वाढले. त्यामुळे मानवनिर्मित धागा आणि कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली. पण कापसाचे उत्पादन घटले आणि दर वाढल्यानंतर मात्र मागणी मानवनिर्मित धाग्याकडे वळल्याचे दिसते. त्यामुळे कच्च्या इंधनाचे भाव कापसाच्या दरावर परिणाम करू लागल्याचे दिसते.
देशात कापसाचे उत्पादन कमी झाले पण जागतिक पातळीवर आणि देशातील बाजारातही मानवनिर्मित धाग्यापासून कापड निर्मिती वाढल्याने मागणी कमी राहिली. कापसाच्या दरातील चढ-उतार मानवनिर्मित धाग्याच्या दरातील चढ-उतारानुसार राहिल्याचे कापड उद्योगातील जाणकारांनी सांगितले.
बाजाराची बदलती दिशा
जागतिक पातळीवर कापूस वापराचे बदलत असलेले समीकरण शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्यास बाजाराची दिशा कशी बदलत आहे, याचा कल लक्षात येईल. २०२४-२५ च्या हंगामात देशातील कापूस उत्पादन गेल्या दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचले. मात्र तरीही कापसाचे भाव अनेक वर्षातील नीचांकी पातळीवर आहेत.
याचा संबंध आपल्याला जागतिक बाजारात आणि देशातही कमी असलेली मागणी याच्याशी जोडता येईल. कापसाची मागणी कमी होण्याला प्रामुख्याने मानवनिर्मित धाग्यासह इतर स्वस्त पर्याय हे कारण आहे.
यंदाही कापसाचा बाजार याच पर्यायी उत्पादनांशी सुसंगत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदा जागतिक उत्पादन कमी होण्याचा अंदाज असतानाही सर्वच संस्था कापूस दरात मर्यादित सुधारणांचेच अंदाज देत आहेत. वास्तविक जागतिक पातळीवर दरवर्षी कापडाला मागणी वाढत आहे.
त्या प्रमाणात कापसाला मागणी वाढली तर दरातही चांगली सुधारणा अपेक्षित आहे. मात्र अजून तरी बाजारातील कोणतेच घटक त्यासाठी अनुकूल नाहीत. त्याचे कारण म्हणजे कापड निर्मितीसाठी कापसाला असलेले स्वस्त पर्याय. आता कापूस बाजाराचे आडाखे बांधताना या पर्यायी उत्पादनांच्या बाजारातील घडामोडीही तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतील, हे लक्षात घेतले पाहिजे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.