Cotton rate: चीनमधील निदर्शनांमुळे कापूस बाजारात उसळी

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात नरमाई आणि भारतातील स्थानिक बाजारात मात्र दर चढे, असे चित्र कालपर्यंत होते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात दरात सुधारणा होत आहे. आज बाजार सुरू झाल्यानंतर दरांनी उसळी घेतली.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात (Cotton Market) नरमाई आणि भारतातील स्थानिक बाजारात मात्र दर चढे, असे चित्र कालपर्यंत होते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात दरात (Cotton Rate) सुधारणा होत आहे. आज बाजार सुरू झाल्यानंतर दरांनी उसळी घेतली. चीनमध्ये दोन प्रांतांत कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय झाल्यामुळे कापूस बाजाराला मोठा आधार मिळाला आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे येत्या काही दिवसांत भारतातील कापूस दरात प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात कापूस दराने जवळपास महिनाभरातील निचांकी पातळी गाठली होती. २८ नोव्हेंबरला कापूस दर ७८.५१ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत नरमले होते. त्यानंतर मात्र कापूस दरात सुधारणा होत गेली. काल ८३.४८ सेंटवर बाजार बंद झाला होता. मात्र आज बाजार सुरु झाल्यानंतर दराने उसळी घेत ८५.२० सेंटचा टप्पा गाठला. जागतिक मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे दर वाढले आहेत.

Cotton Rate
Cotton Rate : शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची आशा

चीनमध्ये आंदोलनाचा भडका

जागतिक कापूस बाजारात चीनकडून होणारी खरेदी हा कळीचा मुद्दा ठरतो. चीन हा कापसाचा मोठा खरेदीदार देश आहे. चीनला होणाऱ्या निर्यातीवर कापसाचे दर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. चीन सरकारने झिरो कोरोना पॉलिसीची कडक अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे तेथील जनतेत असंतोष उफाळून आला.

आधीच लॉकडाऊन आणि कोरोनाच्या इतर निर्बंधांमुळे चीनमधील लोक त्रासून गेले आहेत. या निर्बंधांमुळे आर्थिक आघाडीवर चीनची मोठी पिछेहाट झाली आहे. चीनमधील उत्पादन आणि सेवा क्षेत्रावर फार मोठ्या प्रमाणावर विपरित परिणाम झालेला आहे. चीनच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून फायनान्शिअल मार्केटला जबर तडाखा बसला आहे.

Cotton Rate
Cotton Rate: स्थानिक कापूस बाजारातील तेजी किती दिवस टिकणार ?

चीनमध्ये महागाईचा दर प्रचंड वाढला आहे. बेरोजगारीचे प्रमाण विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे लोकांमध्ये आधीच संतापाची भावना होती. त्यात पुन्हा नव्याने निर्बंध लावण्याची घोषणा सरकारने केल्यामुळे या संतापाचा भडका उडाला. चीनमध्ये एकपक्षीय लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाहीच आहे. त्यामुळे तिथे जनआंदोलन, लोकांचा विरोध या गोष्टी अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात. परंतु अनेक प्रांतांमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. आंदोलनाचे लोण विद्यापीठांपर्यंतही पोहोचले. लोक चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ही निदर्शने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी निदर्शक आणि पोलिसांमध्ये चकमकी उडाल्या. लोकांमधील रोष कमी होताना दिसत नाही. लोक सरकारच्या दडपशाहीला न जुमानता निदर्शने करत आहेत. त्यातच चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन झाले. चीनमध्ये १९८९ मध्ये तियानमेन चौकात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नरसंहार करण्यात आला होता.

सरकारने आंदोलक विद्यार्थ्यांवर रणगाडे घातले होते. त्यात दहा हजाराहून अधिक विद्यार्थी मरण पावले होते. या घटनेनंतर जियांग झेमिन यांनी देशाची घडी पुन्हा सावरली. त्यांच्या नेतृत्वाखाली दशकभरात चीनने आर्थिक आघाडीवर गरूडझेप घेतली. त्यांच्या निधनामुळे चीनच्या गौरवशाली प्रगतीची आणि नेतृत्वाची आठवण लोकांच्या मनात नव्याने ठळक झाली आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या जनतेचा निर्धार अधिक पक्का झाल्याचे दिसत आहे.

अखेर नागरिकांचा रोष लक्षात घेऊन ग्वांगझू आणि चोंगकिंग या शहरांमधील निर्बंध शिथिल केले आहेत. चीन सरकार इतरही शहरांमधील कोरोना निर्बंध कमी करण्याची शक्यता आहे. चीनमधील या घडामोडींमुळे कापसाच्या मागणीवरचे मळभ दूर होण्याची शक्यता आहे. कापसाचा खप आणि किंमत वाढण्यासाठी स्थिती अनुकूल होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाने उसळी घेतली आहे.

देशांतर्गत बाजारात संमिश्र चित्र

मात्र देशांतर्गत कापूस बाजारात आज संमिश्र चित्र होते. काही बाजारांमध्ये दर स्थिर होते, तर काही बाजारांमधील दरात क्विंटलमागे २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. आज राज्यात कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. तर गुजरातमध्ये सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार ६०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले. इतर राज्यांमध्येही कापसाची हीच भावपातळी होती.

देशातील कापूस पुरवठा आणि मागणी लक्षात घेता यंदा सरासरी किमान ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दराने ९० सेंटचा टप्पा पार केल्यानंतर देशातील कापूस बाजारात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच निर्यात पडतळ निर्माण झाल्यास दरातील तेजी कायम राहील, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com