

Cotton Procurment : कापूस बाजार अद्यापही दबावातच आहेत. कापूस भाव शेतकऱ्यांना अपेक्षित पातळीवर नाहीत. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने कापूस विकत आहेत. त्यामुळे सध्या बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा जास्त होती. आज वायद्यांमध्येही नरमाई दिसून आली. बाजार समित्यांमध्ये आज कापसाला ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळाला.
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. वायद्यांबरोबरच बाजार समित्यांमधील दरातही चढ उतार दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरही दबावात आहेत. देशातील बाजारात कापूस वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली. आज कापसाचे वायदे ४४० रुपयांनी कमी झाले होते. कापूस वायदे आज ५७ हजार ६४० रुपयांवर होते. बाजार समित्यांचा विचार करता कापूस आवक ४० हजार गाठींच्या दरम्यान आहे.
यंदा कापूस आवक सरासरीपेक्षा तब्बल ८ पटींनी जास्त दिसते. मागील हंगामात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापसाची सरासरी आवक ५ हजार गाठींच्या दरम्यान होती. ती सध्या खूपच जास्त दिसते. जुलै महिन्यात कापूस आवक दरवर्षी कमी होते. त्यामुळे खूपच कमी जिनिंग सुरु असतात. पण यंदा कापूस आवक एप्रिल महिन्यात एरवी असते तेवढी आवक सध्या बाजारात सुरु आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या जिनिंगची संख्या जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापूस दरावरील दबाव कायम आहे. त्याचा परिणाम देशातील बाजारावरही दिसतोय. तरीही कापूस दरात मागील तीन दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु आहेत. आजही कापसाचे सरासरी भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
दुसरीकडे कापूस लागवड गेल्यावर्षीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी आहे. अनेक भागांमध्ये अद्यापही लागवडीयोग्य पाऊस झाला नाही. याचा काहीसा परिणाम बाजारावर जाणवत आहे. पावसामुळे बाजारातील आवक वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात आवक कमी होत जाईल. याचा आधार कापूस बाजाराला मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.